मराठवाड्याच्या पावन भूमीमध्ये जालना जिल्हा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. याच जिल्ह्याच्या ईशान्य भागात वसलेला जाफराबाद तालुका आपल्या प्राचीन मंदिरांसाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यातील कोणद या गावात आई जोगेश्वरी देवीचे प्राचीन व जागृत मंदिर आहे. हे मंदिर परिसरातील हजारो भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान असून मराठवाड्याच्या मंदिर परंपरेतील एक महत्त्वाचा दुवा मानले जाते. चैत्र पौर्णिमेला येथे भरणारी यात्रा आणि त्या निमित्ताने काढली जाणारी देवदेवतांची सोंगे हे या मंदिराचे सर्वात मोठे धार्मिक व सांस्कृतिक आकर्षण आहे.
जालना जिल्ह्याचा इतिहास पाहता, जहागीरदार जफर खान याच्या नावावरून या शहरास जाफराबाद हे नाव पडले आहे. औरंगजेबाने जफर खान याला ही ११५ गावांची जहागीरी बहाल केली होती, तसा उल्लेख अनेक ऐतिहासिक संदर्भांमध्ये पाहायला मिळतो. भौगोलिकदृष्ट्या हा तालुका अतिशय सुजलाम सुफलाम आहे, कारण येथून पूर्णा आणि धामणा या दोन महत्त्वाच्या नद्या वाहतात. येथील काळी आणि सुपीक जमीन मिरचीच्या पिकासाठी विशेष प्रसिद्ध आहे. ज्यामुळे या भागाची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. याच तालुक्यात अनेक प्राचीन मशिदी आणि मंदिरे आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहेत.
या सर्वांमध्ये कोणद येथील जोगेश्वरी देवीच्या मंदिराला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले असून हे मंदिर प्राचीन काळापासून भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू राहिलेले आहे.
जोगेश्वरी देवी मंदिराच्या स्थापनेबाबतची आख्यायिका अशी की प्राचीन काळी कोणद गावामध्ये रेणुका देवीचे एक निस्सीम भक्त राहत होते. त्यांची देवीवर इतकी भक्ती होती की ते दरवर्षी न चुकता माहूर गडावर देवीच्या दर्शनासाठी पायी जात असत. अनेक वर्षे ही वारी केल्यानंतर जेव्हा ते वृद्ध झाले, तेव्हा त्यांना ही कठीण यात्रा करणे अशक्य होऊ लागले. आपल्या भक्ताची ही अवस्था पाहून देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला. भक्ताने देवीला विनंती केली की आता मला गडावर येणे शक्य नाही, तरी आपणच माझ्या गावी येऊन वास्तव्य करावे. देवीने ही विनंती मान्य केली, मात्र एक अट घातली. देवी म्हणाली की मी तुमच्या मागोमाग येईन, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही मागे वळून पाहाल, त्याच ठिकाणी मी पाषाण रूपात स्थिर होईन. भक्ताने ही अट मान्य केली आणि तो गावाच्या दिशेने चालू लागला. गावाजवळ आल्यावर देवी आपल्या मागे येते आहे की नाही, हे पाहण्याच्या ओढीने भक्ताचा संयम सुटला आणि त्याने मागे वळून पाहिले.
कबूल केलेल्या अटीचा भंग झाल्यामुळे देवी त्याच ठिकाणी पाषाण रूपात स्थानापन्न झाली आणि तेथेच गावकऱ्यांनी मोठे मंदिर उभारले.
गावाच्या मुख्य वस्तीपासून काही अंतरावर हे मंदिर अतिशय शांत आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्की सडक आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीमध्ये एक भव्य प्रवेशद्वार आहे, ज्यातून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिराच्या समोर पाषाणात बांधलेला एक उंच आणि चौथरा असून त्यावर असलेली गोलाकार दीपमाळ लक्ष वेधून घेते. याशिवाय प्रांगणामध्ये तुलसी वृंदावन आहे. मंदिराची वास्तू मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशा तीन भागांमध्ये विभागलेली आहे.
प्रांगणातून चार पायऱ्या चढून उंच जगतीवर असलेल्या मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा असला तरी उजेड आणि हवा खेळती राहण्यासाठी भिंतींमध्ये अनेक खिडक्यांची रचना आहे. सभामंडपात पुढे प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना करण्यात आली असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर कासव शिल्प आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना सुंदर स्तंभनक्षी आणि वरच्या बाजूला महिरपी तोरण आहे. या तोरणाच्या दोन्ही बाजूंना पद्मफुलांची म्हणजेच कमळाच्या फुलांची नक्षी कोरलेली आहे व ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी एका वज्रपीठावर जोगेश्वरी देवीची तांदळा स्वरूपातील पाषाण मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी सुरक्षिततेसाठी कठडा आहे. गर्भगृहाच्या अगदी वरच्या बाजूला तीन थरांचे नक्षीदार आणि चौकोनी आकाराचे शिखर आहे. या शिखरावर अनेक देवकोष्टके कोरलेली आहेत. शिखराच्या सर्वात वरच्या भागात एकावर एक असे दोन आमलक आणि त्यावर कळस आहे.
जोगेश्वरी मंदिराच्या परिसरातच काही अंतरावर महादेवाचे एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात आजही अनेक प्राचीन शिल्पे आणि बांधकामाचे अवशेष विखुरलेल्या अवस्थेत आहेत.
त्यामुळे या स्थानाचे प्राचीनत्व सिद्ध होते. कोणद येथील या मंदिरामध्ये धार्मिक उत्सवांची एक मोठी परंपरा आहे. चैत्र पौर्णिमा हा या मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या जत्रेचे सर्वात मुख्य आणि खास आकर्षण म्हणजे विविध देवीदेवतांच्या सोंगांची काढली जाणारी मिरवणूक होय. यामध्ये अनेक स्थानिक कलाकार गणपती, मारुती, काली माता अशा विविध रूपांतील मुखवटे आणि वेषभूषा करून सहभागी होतात. ही मिरवणूक पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक गर्दी करतात. याशिवाय शारदीय नवरात्रोत्सवामध्ये सलग दहा दिवस मंदिरात उत्साहाचे वातावरण असते. या काळात दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची विशेष आरती केली जाते. नवरात्रीमध्ये जागरण, गोंधळ, भक्तिगीते आणि आराधी नृत्यांचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. आराधी नृत्य ही महाराष्ट्रातील, विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाची लोककला आहे. देवीची उपासना करणाऱ्या आणि तिच्या चरणी स्वतःला वाहून घेतलेल्या भक्तांना ‘आराधी’ असे संबोधले जाते. याशिवाय महाशिवरात्री, श्रावण महिना, मकर संक्रांत, दसरा आणि दिवाळी या सणांच्या वेळी सुद्धा मंदिरात भाविकांची वर्दळ असते. विशेषतः सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी दर्शनासाठी स्थानिक भाविकांची गर्दी असते.