जोगाई माता मंदिर 

कापडणे, ता. धुळे, जि. धुळे 

हिंदू धर्मात शैव वैष्णव पंथाइतकेच महत्व शाक्त पंथास आहे. शाक्त पंथात जोगाई ही एक पूजनीय देवता आहे. आठवी मातृका योगेश्वरी हिच जोगाई आहे. ती योगाची अधिपती देवता असल्याची मान्यता आहे. दीड हजार वर्षांपूर्वी शाक्त पंथाचा उदय झाला तेव्हापासून जोगाईची पूजा केली जाते, असे अभ्यासकांचे मत आहे. आंबेजोगाई येथे मूळ पीठ असलेल्या जोगाईचे एक प्राचीन प्रसिद्ध मंदिर कापडणे गावात आहे. ही जागृत देवी १३ कुळांची कुलदेवता आहे ती नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे

योगेश्वरी देवी ही शिवशंकराच्या तेजापासून निघालेली शक्तीस्वरूप देवता मानली जाते. तिच्या नावाचा अपभ्रंश जोगेश्वरी असा झाला. तिलाच जोगाई वा जुगाई असेही संबोधले जाते. मुंबईत या जोगेश्वरीचे एक महत्त्वाचे ठाणे आहे. मराठवाड्यातील अंबेजोगाई येथे जोगाई या नावाने ती स्थित आहे. अंबेजोगाई येथील देवीचे मंदिर यादव काळातील, तेराव्या शतकातील आहे. असे सांगितले जाते की कापडणे गावातील ग्रामस्थ आबाजी बाबाजी पाटील हे अंबेजोगाई येथील जोगाई देवीचे निःसीम भक्त होते. ते दरवर्षी अंबेजोगाई येथे देवीच्या दर्शनासाठी पायी जात. तेव्हा आपल्याही गावात जोगाई देवीचे मंदिर असावे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार त्यांनी भात नदीच्या काठावर मंदिर बांधले अंबेजोगाई येथून देवीची मूर्ती आणून या मंदिरात तिची प्राणप्रतिष्ठापना केली.

अलिकडील काळात मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यास आधुनिक स्वरूप देण्यात आलेले आहे. गावापासून काही अंतरावर असलेल्या या मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. या मंदिराभोवती भक्कम आवारभिंत आहे. आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात आवारभिंतीलगत वृक्षराजी भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मंदिरासमोर एक चौकोनी एक अष्टकोनी अशी दोन तुलसी वृंदावने आहेत. सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे त्यास मुक्त प्रवेशद्वार आहे. सभामंडपास डाव्या उजव्या बाजूला कठडा आहे. दोन्ही बाजूच्या कठड्यात प्रत्येकी तीन नक्षीदार अष्टकोनी स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. येथील छताला पितळी घंटा टांगलेली आहे वितानावर नक्षी आहे. सभामंडपात उजव्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग शेजारी पितळी त्रिशूल आहे. शिवपिंडीसमोर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या सभामंडपात तुलसी वृंदावन आहे मध्यभागी एका चौथऱ्यावर सिंहाचे शिल्प आणि त्यापुढे कासव शिल्प आहे. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत

पुढे सुमारे तीन फूट उंच अष्टकोनी जगतीवर अष्टकोनी गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर तीन पायऱ्या आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर मध्यभागी पद्मासनी जोगाई देवीची मूर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये आयुधे अंगावर विविध अलंकार आहेत. देवीच्या डोक्यावर मुकुट आहे. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीत दोन्ही बाजूला खाली मयूर, मध्यभागी गजराज वर पानाफुलांच्या नक्षी आहेत. देवीची जुनी मूर्ती जीर्ण झाल्याने नव्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. नव्या मूर्तीच्या उजव्या बाजूला वज्रपिठावर देवीची प्राचीन मूर्ती डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात प्रकाश हवा येण्यासाठी खिडक्या आहेत

गर्भगृहाच्या बाहेरून प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गावर बाह्य बाजूला असलेले आठ चौकोनी स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे अष्टकोनी शिखर आहे. शिखरातील चारही थरांत प्रत्येकी आठ देवकोष्टके त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. देवकोष्टकांवर शिखर नक्षी प्रत्येक दोन देवकोष्टकांच्या मधे स्तंभ नक्षी आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस ध्वजपताका आहे

चैत्र शुद्ध चतुर्दशी हा देवीचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी राज्याच्या विविध भागातून भाविक देवीच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी जावळ शेंडी उतरवण्यासाठी मोठी गर्दी होते. यात्रेनिमित्त बोकडाचा बळी देण्याची प्रथा येथे बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी देवीला पुराणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यात्रेनिमित्त विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास तात्पुरत्या बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. शारदीय नवरात्रौत्सव हा येथील दुसरा मुख्य वार्षिक उत्सव असतो. यावेळी दहा दिवस मंदिरात भजन, संगीत, जागरण, गोंधळ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सलग दहा दिवस देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी असते. याशिवाय चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, पौर्णिमा, अमावस्या, सोमवार, मंगळवार, अष्टमी आदी दिवशी मंदिरात भाविकांची वर्दळ असते.

उपयुक्त माहिती

  • धुळे शहरापासून २० किमी अंतरावर
  • धुळे येथून एसटीची सु्विधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
Back To Home