जटायू मंदिर टाकेद

ता. इगतपुरी, जि. नाशिक


इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील जटायू मंदिर प्रसिद्ध आहे. हे प्राचीन मंदिर असून जटायूचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. तसेच हे धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र आहे. याच ठिकाणी रामाने जमिनीत बाण मारून जटायूसाठी गंगेचे पाणी आणल्याची समजूत प्रचलित आहे. तेव्हापासून हे ठिकाण ‘सर्वतीर्थ टाकेद’ या नावाने ओळखले जाते.

पुराणातील कथेनुसार, ऋषी कश्यप यांची पत्नी आणि दक्ष प्रजापतीची मुलगी विनता हिला गरुड आणि अरुण हे दोन पुत्र होते. सम्पाती आणि जटायू हे अरुणचे पुत्र. जटायू हा राजा दशरथाचा मित्र होता. त्यामुळे रावणाने सीतेचे अपहरण केले, तेव्हा आपल्या पुत्रवधूसमान असलेल्या सीतेचे रक्षण करण्यासाठी जटायूने रावणाला रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी जटायू आणि रावण यांच्यात तुंबळ युद्ध झाले आणि रावणाने जटायूचे पंख छाटून त्याला रक्तबंबाळ केले. त्यानंतर सीतेच्या शोधात निघालेल्या रामाला जखमी, मरणासन्न अवस्थेतील जटायू दिसला. त्याने रामाला सीतेच्या अपहरणाची सविस्तर माहिती दिली. जटायू रामासाठी पितृतुल्य होता. रामाने जटायूची मान आपल्या मांडीवर घेऊन जटायूला अखेरची इच्छा विचारली. रावणाबरोबर युद्ध केल्याने जटायूला तहान लागली होती. त्यामुळे त्याने रामाकडे पृथ्वीवरील सर्व तीर्थांचे पुण्य सामावलेले पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली. जटायूला गंगेचे पाणी पाजण्यासाठी म्हणून रामाने जमिनीत बाण मारून गंगेचे पाणी आणले आणि ते जटायूला पाजले. हे पाणी प्यायल्यानंतर जटायूने रामाच्या मांडीवरच प्राण सोडला. रामाने बाण मारल्यापासून पाण्याची अखंड धार या ठिकाणी सुरू असल्याचे मानले जाते. ही घटना नाशिक जिल्ह्यातील टाकेद येथे घडली आणि रामाने पृथ्वीवरील सर्व तीर्थांचे पुण्य सामावलेले पाणी येथे आणले. त्यामुळे येथील कुंडाला ‘सर्वतीर्थ’ असे नामाभिधान प्राप्त झाले.

मुख्य रस्त्यापासून हे मंदिर काहीसे खालच्या बाजूस असल्यामुळे येथे जाण्यासाठी पायऱ्या उतरून जावे लागते. येथे एका खांबावर जटायूचे मोठे शिल्प आहे आणि त्यासमोर मंदिर आहे. छोटेखानी असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर रक्षकांच्या प्रतिमा आहेत. मंदिरात प्रवेश केल्यावर राम आणि रामाच्या मांडीवर प्राण सोडणाऱ्या जटायूच्या मूर्ती पाहावयास मिळतात. जटायू मंदिराच्या समोरच सर्वतीर्थ महाकुंड आहे. या कुंडात स्नान करण्यासाठी व येथील तीर्थ घेण्यासाठी शेकडो भाविक दररोज या ठिकाणी येतात. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात श्रीराम, दत्त, शंकर आणि हनुमान यांची मंदिरे आहेत. येथे जटायू मंदिराच्या बाजूला एक शिवपिंड आहे. या शिवपिंडीच्या मधोमध गोलाकार खड्डा असून जमिनीच्या आत, एका हाताच्या अंतरावर शिवलिंग आहे. हे लिंग केवळ भाग्यवंतांच्याच हाताला लागते, असा समज आहे. मात्र हे लिंग हाती लागल्यास मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

सर्वतीर्थ टाकेद येथे महाशिवरात्रीला नाशिक जिल्ह्यातील सर्वांत मोठी यात्रा भरते. ही यात्रा दोन दिवस चालते. महाशिवरात्रीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला ‘माघी अमावस्या’ म्हणतात. शास्त्रानुसार या दिवशीच्या स्नानाला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी सर्व पवित्र नद्यांचे आणि गंगेचे पाणी अमृतासमान होत असल्याची समजूत आहे. त्यामुळे या दिवशी या नद्यांमध्ये किंवा गंगेमध्ये स्नान केल्यास अश्वमेध यज्ञ केल्यानंतर मिळणाऱ्या पुण्याइतके पुण्य मिळत असल्याचे मानले जाते. टाकेद येथे प्रभू श्रीरामाने प्रत्यक्ष गंगा आणल्याची समजूत असल्याने अर्थातच माघी अमावस्येच्या दिवशी येथील कुंडात स्नान करून पुण्य मिळवण्यासाठी भाविक गर्दी करतात.

दर बारा वर्षांतून एकदा नाशिकमध्ये कुंभेमळ्याचे आयोजन केले जाते. कुंभमेळ्यासाठी म्हणून मंदिर परिसरामध्ये साधूसंतांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवासाला ‘रामचरण निवास’ म्हणतात. कुंभमेळ्याच्या वेळी हा निवास साधूंना उपलब्ध करून दिला जातो. तसेच या संपूर्ण परिसरात भाविकांच्या निवासाची व खानपानाचीदेखील व्यवस्था उपलब्ध आहे. येथे कार्यक्रमासाठी एक सभागृहही आहे. त्यात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती:

  •  नाशिकपासून ४८ किमी., तर घोटीपासून २० किमी. अंतरावर
  •  टाकेदसाठी नाशिक, घोटीहून एसटीची सुविधा उपलब्ध
  •  खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाण्याची सोय
  • परिसरात निवासाची व खानपानाची सुविधा उपलब्ध
  •  संपर्क : मंदिर कार्यालय : ९०७५१२७४१४
Back To Home