जटाशंकर मंदिर

डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली

शैव पूजनाच्या हजारो वर्षांच्या परंपरेत कालांतराने शिवलिंग पूजनाची परंपरा सुरू झाली. हजारो वर्षांच्या स्थित्यंतरात त्यात बदल होत गेले. शिवलिंगाचे स्वरूप, आकार, आणि प्रतिमा बदलत गेल्या. गुप्तकाळात एकमुखी, त्रिमुखी, चतुर्मुखी, सहस्रमुखी अशी शिवलिंगे निर्माण झाली. एकमुखी शिवलिंगातील शिवप्रतिमेत डोक्यावर बांधलेल्या जटांसह खांद्यावरच्या जटा दाखवल्या जाऊ लागल्या. त्यामुळे या शिवलिंगास जटाशंकर म्हटले जाऊ लागले. गुप्तकालीन एक प्रसिद्ध एकमुखी शिवलिंग मध्य प्रदेशात खोह येथे आहे. असेच शिवलिंग कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा गावातील मंदिरात आहे.

हे मंदिर किती प्राचीन आहे, याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. तरीही शिवपिंडी गुप्तकालीन म्हणजे अंदाजे दीड हजार वर्षांपूर्वीची असावी, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. एकमुखी शिवलिंगाच्या उत्पत्तीबाबत पुराण कथांमध्ये अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका आख्यायिकेनुसार, एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण यावरून वाद झाला. तेव्हा इतर देवांनी अग्निस्तंभ निर्माण करून सांगितले की जो त्याचा आदि-अंत शोधून काढेल तो श्रेष्ठ. ब्रह्मदेव हंस रूपात आकाशाकडे गेले, तर विष्णू वराह रूपात पाताळाकडे गेले. काही केल्या दोघांना अग्निस्तंभाचा आदि-अंत सापडला नाही. तेव्हा महादेव लिंगोद्भव रूपात प्रकट झाले व त्यांनी ब्रह्मा व विष्णू यांच्यात समेट घडवून आणला.

हे मंदिर हिंगोली आणि नांदेड या दोन प्रमुख जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर डोंगरकडा येथे स्थित आहे. महामार्गालगत असूनही मंदिराचा मुख्य परिसर काहीसा आत, डोंगराच्या सानिध्यात असल्याने येथे एक नैसर्गिक शांतता अनुभवास येते. मंदिराजवळ डाव्या बाजूला प्रशस्त वाहनतळ आहे, तर उजव्या बाजूला मंगल कार्यालयाची भव्य इमारत आहे. तेथे पूजा साहित्याची दुकाने आहेत. मंदिरास भक्कम तटबंदी आहे. तटबंदीच्या वरील बाजूला देवकोष्ठके आहेत. त्यांमध्ये गणपती, सरस्वती, लक्ष्मी, खंडोबा व इतर देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. तटबंदीतील प्रवेशद्वार दुमजली आहे. प्रवेशद्वारास तीन पायऱ्या व त्यास लागून चंद्रशिळा आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार द्वारशाखा आहेत, तर ललाटबिंबावर गणपती आहे. प्रवेशद्वारावरील महिरपी तोरणात मध्यभागी शिवशिल्प व त्याच्या दोन्ही बाजूला गजराज शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या छतावर चार स्तंभांवर शिखर व कळस असलेल्या मेघडंबरीत ध्यानस्थ महादेवाची मूर्ती आहे.

मंदिराचे प्रशस्त प्रांगण संगमरवरी फरशीने आच्छादलेले आहे. प्रांगणात षटकोनी दीपमाळ आहे. तसेच प्रांगणात भक्त निवास, देवस्थानचे कार्यालय, अन्नछत्र, व सेवेकऱ्यांची निवासस्थाने आहेत. येथे पृथ्वीची प्रतिकृती व त्यावर उंच स्तंभ आहे. स्तंभावर चतुर्मुख ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. मुख्य मंदिरासमोर नंदीमंडप आहे. नंदीमंडपात नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीमंडपात चार स्तंभ आहेत. त्यावरील चौकोनी शिखरावर कळस आहे. नंदीमंडपाला लागून मागील बाजूला गणपतीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे.

सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपापुढे दुसरा नंदीमंडप व त्यात नंदीशिल्प आहे. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारात द्वारशाखांवर खालील बाजूस गजराज शिल्पे आहेत, तर वर पानाफुलांची नक्षी आहे. अंतराळात पार्वतीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. पार्वती मूर्तीच्या पायाजवळ चिंतामणी पाषाण आहे. या पाषाणावर हात ठेवून भाविक कौल लावतात. अंतराळातून बाहेर पडण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूला दोन दरवाजे आहेत. पुढे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची रचना अंतराळाच्या प्रवेशद्वारासारखीच आहे. गर्भगृहात वज्रपीठावर एकमुखी शिवपिंडी आहे. अडीच फूट उंच व दीड फूट व्यासाच्या शिवपिंडीच्या दोन्ही बाजूस दोन नक्षीदार स्तंभिका आहेत. या स्तंभिकांवर नंदी तोरण आहे. तोरणात वर मध्यभागी कीर्तिमुख आहे. गर्भगृहाच्या छतावर सात थरांचे शिखर आहे. प्रत्येक थरात देवकोष्ठके आहेत. पाचव्या, सहाव्या व सातव्या थरात उरुशृंगी प्रकारची लघुशिखरे आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक आहे. आमलकावर कळस व ध्वजपताका आहे. या मंदिराच्या बाजूला विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे. गर्भगृहात वज्रपीठावर विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय प्रांगणात ज्ञानेश्वर महाराज व श्रीदत्तात्रेय यांची मंदिरे आहेत.

महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. यानिमित्ताने परिसरात तीन दिवसांची जत्रा असते. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी शिवपिंडीस लाख बेलपत्रांचा अभिषेक केला जातो. जत्रेत विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. कुस्त्यांची दंगल, बैलगाड्यांची शर्यत इत्यादी क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. यात्रेनिमित्त मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रेनिमित्त हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. कार्तिक पौर्णिमेस देवाचा डाळशिंगार केला जातो. असे सांगितले जाते की त्यापुढील सात दिवस भगवान शंकर ‘ध्यानात’ जातात. या सात दिवसांत गर्भगृहातील पूजा-अर्चा काही प्रमाणात मर्यादित असते किंवा शांतता पाळली जाते. सात दिवसांनी पुन्हा विधिवत पूजा करून देवाला जागे केले जाते. यावेळी दीपमाळेवर दीप उजळवून दीपोत्सव साजरा केला जातो. ही परंपरा राज्यात इतर मंदिरांत क्वचितच पाहायला मिळते. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेस देवाचा रथोत्सव व द्वितीयेस पालखीसोहळा साजरा केला जातो. श्रावणातील सर्व सोमवारी मंदिरात हजारो भाविक बेलपत्र वाहण्यासाठी येतात. चैत्र पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, आषाढी व कार्तिकी एकादशी इत्यादी सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • कळमनुरी येथून ४४ किमी अंतरावर
  • हिंगोली येथून ६३ किमी अंतरावर
  • कळमनुरी व हिंगोली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : रावसाहेब अडकिणे, अध्यक्ष, मो. ९७६५७६७३२०,
  • चंद्रशेखर कुलकर्णी, मो. ७७९८०३८६७६

जटाशंकर मंदिर

डोंगरकड़ा, कलमनुरी, जिला. हिंगोली

Back To Home