निर्गुण निराकार, सर्वव्यापी महादेवाला भोळा सांब असे म्हटले जाते, तसेच त्याला जगाचा ईश्वर म्हणजेच जगदीश्वर देखील म्हटले जाते. महादेवाला स्थानदेवता व गुणदेवता म्हणूनही पूजले जाते. महादेवाला उत्तरेश्वर, दक्षिणेश्वर, पूर्वेश्वर अशा दिशांचा उल्लेख करणाऱ्या नावांनी देखील संबोधले जाते. महादेवाला नगराच्या अथवा गावाच्या नावाने ईश्वर असा प्रत्यय लावून आळवले जाते. अशाच प्रकारे शिवपिंडी पाण्याखाली आहे म्हणून जलेश्वर नावाने प्रसिद्ध पावलेल्या महादेवाचे एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर हिंगोली शहरात आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर सुमारे चारशे ते पाचशे वर्षे प्राचीन असावे असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतात. परंतु जनसामान्यात प्रचलित आख्यायिकेनुसार हे मंदिर हजारो वर्षे प्राचीन म्हणजेच पांडवकालीन आहे. याबाबत अशी आख्यायिका प्रचलित आहे की वनवास काळात पांडव त्याकाळी घनदाट अरण्याचा भाग असलेल्या हिंगोलीत आले. तेव्हा त्यांचा सामना जंगासुर राक्षसाशी झाला. भीम व जंगासुर यांचे सहा महिने कुस्ती युद्ध चालले. कुस्तीमुळे जमिनीवर मोठमोठे खड्डे पडल्याने येथे तलावाची निर्मिती झाली. युद्धात जंगासुर मारला गेला तेव्हा भीमाने या तलावात शिवलिंगाची स्थापना केली.
आजचे जलेश्वर मंदिरातील शिवलिंग तेच असल्याचे सांगितले जाते. औढा नागनाथ मंदिरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर जागेश्वर शिवमंदिर असल्याचा उल्लेख ‘शिवस्तोत्र रत्नावली’ या ग्रंथात आहे. हेच ते मंदिर असल्याचे येथील महंत सांगतात. या मंदिरात पुरी संप्रदायाची महंत परंपरा चालत आली आहे. सध्या या परंपरेतील सातवे महंत पुरी महाराज मंदिराचा कारभार पाहतात.
सुमारे २७ एकराच्या तलावात एका बाजूला हे मंदिर उभे आहे. अलीकडील काळात मंदिरापर्यंत जाणारा मार्ग विकसित करण्यात आला आहे. मंदिरास तटबंदी आहे. या तटबंदीत लोखंडी जाळी असलेले साधेसे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्रांगणात व परिसरात पार बांधलेले वृक्ष आहेत. मंदिरासमोर लोखंडी स्तंभांवर सिमेंट पत्र्याचे छत असलेला रंगमंडप आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाचे वाढीव बांधकाम १९४० साली करण्यात आले असल्याचे येथील महंत सांगतात. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात स्तंभांच्या चार रांगा आहेत. सभामंडपात नित्य पूजेसाठी अनेक शिवपिंडी व नंदीशिल्पे आहेत. येथे भाविक नित्य अभिषेक करतात.
सभामंडपाला लागून एका बंदिस्त कक्षात यज्ञकुंड आहे. येथे उत्सवांच्या वेळी व विशिष्ट मुहूर्तावर यज्ञाचे आयोजन केले जाते.
पुढे सभामंडपापेक्षा काही फूट खोल अंतराळ आहे. अंतराळात उतरण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूने प्रत्येकी तीन पायऱ्या आहेत. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर वज्रपीठावर नंदीची मूर्ती आहे. नंदीमूर्तीच्या दोन्ही बाजूला पाषाणी स्तंभ आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारात ललाटबिंबावर श्रीगणेशशिल्प आहे. गर्भगृह सभामंडपापेक्षा सुमारे बारा फूट खोल असून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी आहे. तलावातील पाणी वाढते तेव्हा ही शिवपिंडी श्रावण ते माघ मासापर्यंत, म्हणजेच सुमारे सहा महिने पाण्याखाली असते. त्यावेळी या शिवपिंडीचे पूजन बंद होते व त्या कालावधीत सभामंडपात असलेल्या शिवपिंडीवर भाविक अभिषेक करतात.
जलेश्वर मंदिराच्या गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या खालील पहिल्या थरात चारही बाजूंना प्रत्येकी दोन देवकोष्ठके आहेत,
तर दुसऱ्या थरात प्रत्येकी एक देवकोष्ठक आहे. शिखराच्या तिसऱ्या थरात अष्टदिशांना असलेल्या देवकोष्ठकांमध्ये विविध देवी-देवतांची शिल्पे आहेत. शिखराच्या चौथ्या थरात अष्टदिशांना आठ आमलक आहेत. त्यांच्या मध्ये असलेल्या मुख्य आमलकावर चारही बाजूंनी नागशिल्पे आहेत. मुख्य आमलकावर कळस व ध्वजपताका आहे.
मंदिराच्या बाजूला बंदिस्त सभामंडप व त्यामध्ये मध्यभागी लहानसे गर्भगृह असलेले नृसिंहलक्ष्मी मंदिर आहे. येथील नृसिंहलक्ष्मीची गंडकी पाषाणातील मूर्ती प्राचीन असल्याचे सांगितले जाते. याच मंदिरात सभामंडपातील दोन स्वतंत्र देवकोष्ठकांत भगवती देवी व गणपतीची मूर्ती आहे. मंदिराचा परिसर विस्तीर्ण तलावामुळे हिरवागार झाला आहे. येथे हिंगोली शहर व परिसरातील अनेक पर्यटक निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. तलावात उतरण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेल्या पायऱ्यांचा घाट आहे. या तलावात सात प्रकारची कमळे फुलत असत, असे सांगितले जाते.
महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पहाटे सूर्योदयापूर्वीच महादेवाचा लघुरुद्राभिषेक करून उत्सवाची सुरुवात होते. दिवसभरात हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. उत्सवानिमित्त मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात शिवलीलामृत व शिवस्तोत्राचे सामुदायिक पठण केले जाते. श्रावणातील सर्व सोमवारी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळते. यावेळी गर्भगृहातील शिवपिंडी पाण्याखाली बुडत असल्याने सभामंडपातील शिवपिंडीवर अभिषेक केला जातो. देवाला बेलपत्र, फुले, दही, दूध, तूप, मध, गंगाजल व गुलाबजलाचा अभिषेक केला जातो. वर्षभरातील सर्व सण व उत्सवांच्या वेळी तसेच सोमवार, पौर्णिमा व अमावस्येला दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते.