जकम्मा देवी मंदिर

मुचंडी, ता. जत, जि. सांगली

वैदिक देव, पौराणिक देव आणि ऐतिहासिक देव अशा पूजनीय देवतांच्या तीन श्रेणी आहेत. या देवतांच्या रंजक आख्यायिका या दंतकथा किंवा इतिहासाचे चमत्कृतीपूर्ण दैवतीकरण यातून आलेल्या असतात. बहुतांश आख्यायिका या त्यांचे कार्य अधोरेखीत करणाऱ्या असतात. ऐतिहासिक देवतांच्या श्रेणीत शांततेसाठी आपले आयुष्य त्यागणाऱ्या राजघराण्यातील जकम्मा दरीदेव या बहीणभावांचा समावेश होतो. जकम्मा देवीचे मंदिर महाराष्ट्रात (मुचंडी, ता. जत) आहे, तर दरीदेवाचे मंदिर कर्नाटकमध्ये (कनमडी, ता. तिकोटा) आहे. ही दोन मंदिरे एकमेकांपासून १०० मीटर अंतरावर आहेत.

या मंदिरांबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी एका राजघराण्यात ईश्वर (दरीदेव) जयंती (जकम्मा देवी) असे दोघे भाऊबहिण होते. जयंती ही शांतताप्रिय असल्याने युद्धाच्या विरोधात होती. त्यामुळे तिने आपल्या भावाकडून कधीही युद्ध करण्याचे वचन घेतले होते. बहिणीच्या वचनासाठी त्याने शेजारील राजांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. परंतु एकदा शेजारील राजाने ईश्वर राजावर आक्रमण केले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ईश्वराला युद्ध करावे लागते. त्यात ईश्वर विजय झाला. परंतु भावाने आपल्याला दिलेले वचन मोडले याचे वाईट वाटून जकम्माने जलसमाधी घेतली. याच ठिकाणी जकम्मा देवीचे मंदिर आहे. बहिण गेल्याच्या दुःखातून ईश्वरानेही समोरच्या डोंगरात घोडा दवडला तो डोंगरातील दरीत नाहीसा झाला. यामुळे त्यास दरीदेव नावाने संबोधले जाऊ लागले.

जकम्मा देवी दरीदेवाची मंदिरे ही बहामनी काळानंतरची, सुमारे ४०० वर्षांपूर्वीची आहेत. असे सांगितले जाते की पुणे येथील सोन्याचांदीचे व्यापारी नारायण सावकार यांच्या नवसाला देव पावला म्हणून त्यांनी ही मंदिरे बांधली. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जकम्मा देवी मंदिराजवळून एक नदी वाहते. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ सभोवताली पूजा साहित्याची दुकाने आहेत. येथून मंदिराकडे जाताना मंदिराच्या पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या प्रांगणात एक चौथरा त्यावर सुमारे तीस फूट उंचीची दगडी दीपमाळ आहे

मुखमंडप, सभामंडप गर्भगृह अशी जकम्मा देवी मंदिराची संरचना आहे. यातील मुखमंडप सभामंडप अलिकडील काळात बांधलेले आहेत गर्भगृह प्राचीन आहे. महिरपी कमानीने जोडलेले दोन गोलाकार नक्षीदार स्तंभ त्यावरील छत असे मुखमंडपाचे स्वरूप आहे. मुखमंडपाच्या छतावर चार नक्षीदार स्तंभ त्यावरील छतावर शिखर कळस असलेल्या मेघडंबरीत जकम्मा देवीची मूर्ती आहे

मंदिराच्या खुल्या स्वरूपाच्या सभामंडपात दहा चौकोनी नक्षीदार स्तंभ त्यावर छत आहे. वितानावर कमळ फुलांची नक्षी आहे. छताला पितळी घंटा नवसाचे पाळणे टांगलेले आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना महिरप कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपास सभोवती स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून दर्शन रांगेचे व्यवस्थापन अशा प्रकारे केले आहे की प्रथम गर्भगृहास प्रदक्षिणा घडून मग दर्शनासाठी गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर येता येते. द्वारशाखांवर खालील बाजूला चतुर्भुज भैरव द्वारपाल, वर वेलबुट्टी पुष्पलता नक्षी आणि ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. तोरणावर दोन्ही बाजूला अश्वमुख शिल्पे मध्यभागी पुष्पलता नक्षी आहे. मंडारकावर कमळ फुलांची नक्षी आहे. गर्भगृहात वज्रपिठावर जकम्मा देवीची मूर्ती आहे

सभामंडपाच्या छतावर चहुबाजूंनी बाशिंगी कठडा आहे. त्यातील देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे गोलाकार वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. त्यावरही असलेल्या देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखरात शीर्षभागी अमलक त्यावर कळस आहे. जकम्मा देवी मंदिरापासून दरीदेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नदीपात्र ओलांडण्यासाठी पूल आहे. डोंगरमाथ्यावर असलेल्या मंदिराला पायथ्यापासून किल्लेवजा तटबंदी आहे. तटबंदीत सुमारे चाळीस फूट उंच दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना त्याच्या छतावर चारही कोनांवर पशू शिल्पे आहेत. मध्यभागी घुमटाकार शिखर त्यावरील आमलाकावर कळस आहे. या मंदिरावर बहामनी काळातील वास्तुशिल्पकलेची छाप आहे.

पायथ्यापासून मंदिरापर्यंत कोरीव पाषाणात बांधलेल्या सुमारे १३५ पायऱ्या आहेत. यातील प्रत्येक पायरीवर नारळ फोडण्याचे नवस केले जातात. दरीदेव मंदिराच्या समोरील बाजूला चार स्तंभ असलेला सभामंडप आहे. सभामंडपात अंतराळाच्या प्रवेशद्वारासमोर पितळी घोडा आहे. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर सुवर्णपटल आच्छादन असून त्यावर द्वारपाल शिल्पे इतर नक्षी आहे. अंतराळापुढे गर्भगृह गर्भगृहाच्या मागील भिंतीत देवाची पाठ असल्याचे सांगितले जाते. याच भिंतीतून दरीदेव दरीत अदृश्य झाले होते, अशी आख्यायिका आहे. येथे देवाच्या पाठीची पूजा केली जाते. मखरात देवाचा मुखवटा आहे. वज्रपिठावर उजव्या बाजुला देवाची अश्वारूढ सुवर्ण मूर्ती डाव्या बाजूला अश्वारूढ रजत मूर्ती आहे. सुवर्ण मूर्तीवर छत्र धरलेला पाचफणी नाग आहे. देवास उंची वस्त्रे अलंकारांनी सजवलेले असते.

मंदिरासमोर हे मंदिर बांधणारे नारायण सोनार यांचे समाधी मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात अनेक इमारती आहेत. त्यांचा वापर भक्तनिवास, धर्मशाळा निवारा कक्ष म्हणून केला जातो. प्रांगणात एका चौथऱ्यावर सुमारे साठ फूट उंचीचा चार मजली टेहळणी बुरूज आहे

जकम्मा दरीदेव मंदिरांत चैत्र पौर्णिमा ते चैत्र वद्य अष्टमी असा आठ दिवसांचा वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. या दरम्यान दोन्ही मंदिरांतील देवांची पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत साजरी होते. जत्रोत्सवात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश कर्नाटक राज्यांतून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात

उपयुक्त माहिती

  • जत येथून १६ किमी, तर सांगली येथून १०३ किमी अंतरावर
  • जत येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
Back To Home