सप्तचिरंजिवांपैकी एक असलेला हनुमान हे शक्ती आणि भक्तीचे मूर्तरूप मानले जाते. मारूती, बजरंग, बलभीम, रामदूत, केसरीनंदन, आंजनेय, वायुपुत्र, पवनसुत, वज्रांग, संकटमोचन, महावीर, महारुद्र, हनुमंत आदी नावांनी पूजला जाणारा हनुमान हे अनेकांचे आराध्यदैवत आहे. हनुमान ही मूळची आर्येतरांची देवता आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून हनुमानाची पूजा गावोगावी केली जात असल्याचे दिसते. हनुमानाचे असेच एक प्रसिद्ध मंदिर मूर्तिजापूर तालुक्यातील देवरण येथे आहे. या मंदिरातील हनुमानाची प्रतिष्ठापना सतराव्या शतकात करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी बुद्धी आणि बळाची देवता असलेल्या रुद्रावतार हनुमानाची उपासना महाराष्ट्रात प्रचलित केली. त्यांनी स्वतः स्थापन केलेली मारूतीची ११ मंदिरे सुप्रसिद्ध आहेत. समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांच्या ‘श्रीसमर्थावतार’ या ग्रंथानुसार, समर्थ जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब या त्यांच्या जन्मगावी १६४०मध्ये आले. तेथे मातेची भेट घेतल्यानंतर ते दक्षिणेस तीर्थाटनास गेले व तेथून १६४४मध्ये ते कृष्णातिरी आले. पुढील अनेक वर्षे ते सातारा, कोल्हापूर या भागात होते. २२ जानेवारी १६८२ रोजी ते रामरूपात विलिन झाले. या कालखंडात त्यांचे वास्तव्य हे कृष्णा तीरावरील परिसरात होते. मात्र हनुमान उपासनेशी त्यांचे जडलेले नाते एवढे घट्ट होते की महाराष्ट्रातील अनेक ठिकाणची हनुमान मंदिरे त्यांनीच स्थापन केली, असे सांगण्यात येते.
हे मंदिर असलेले देवरण या गावाचा परिसर पूर्वी ‘देवारण्य’ म्हणून ओळखला जात असे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की येथे रामदास स्वामींचे काही काळ वास्तव्य होते. पूर्वी येथे त्यांचे गुरूकुल व व्यायामशाळा होती. त्याच प्रमाणे येथील हनुमानाची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी केली आहे. ही हनुमानाची मूर्ती पाषाणापासून नव्हे, तर शेणापासून बनवण्यात आली होती. ‘जागृत महारूद्र मारुती संस्थान’ म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. गावच्या वेशीवरच हे प्राचीन मंदिर वसले आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीत मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराला एक मुख्य व दोन लहान दरवाजे आहेत. येथून मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो. मोठा सभामंडप व दोन गर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचे प्रवेशद्वार साधेसे आहे व त्यावरील भागात गर्भगृहात असलेल्या मारूतीची प्रतिमा आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजवीकडे मारुतीचे व डावीकडे श्रीराम, लक्ष्मण व सीता यांचे गर्भगृह आहेत. सभामंडपापासून ही गर्भगृहे उंचावर आहेत. सभामंडपातून सहा पायऱ्या चढून मारूतीच्या गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात मध्यभागी मारूतीची भली मोठी मूर्ती आहे. या शेणाच्या मूर्तीवर शेंदूराचे लेपन केलेले आहे. चांदीचा मुकुट परिधान केलेल्या या मूर्तीला डोळे, नाक व ओठ आहेत. या गर्भगृहाला बाहेरून प्रदक्षिणा मार्ग आहे.
गर्भगृहाच्या समोरील बाजूस सभामंडपात उंच अधिष्ठानावर श्रीराम, लक्ष्मण व सीता यांचे गर्भगृह आहे. या गर्भगृहात त्यांच्या वैशिष्टपूर्ण संगमरवरी मूर्ती आहेत. या मूर्तींवर दररोज विविध अलंकार व वस्त्रे लेवविली जातात. मारूतीच्या गर्भगृहाजवळ असेच उंच अधिष्ठानावर शंकराचे मंदिर आहे. या मंदिराची रचनाही मारुतीच्या गर्भगृहाप्रमाणे आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस चौथऱ्यावर नंदीची मूर्ती व गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी आहे. पिंडीच्या मागील भिंतीतील देवकोष्टकामध्ये पार्वती मातेची मूर्ती आहे.
येथील जागृत मारूती रिक्त हस्ते माघारी पाठवत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध भागांतील भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंगळवारी तसेच शनिवारी भाविकांची संख्या अधिक असते. येथे महाशिवरात्र व रामनवमीसह विविध सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हनुमान जयंती हा येथील मुख्य उत्सव असतो. या उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवसापासून येथे अखंड रामायण तसेच सुंदराकांडचे पठण करण्यात येते. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी जन्मोत्सव झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. दहा हजारांहून अधिक भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात.