जागृत मारुती मंदिर

गौडगाव बु., ता. अक्कलकोट, जि. सोलापूर

हनुमान अर्थात मारुती हा सप्तचिरंजीवांपैकी एक व शक्तीची देवता आहे. तसेच, अनन्यसाधारण भक्ती करून परमेश्वराचे दास कसे व्हावे, याचा आदर्श घेण्यासाठीही मारुतीकडे पाहिले जाते. मारुतीच्या पराक्रमामुळे त्याच्या भक्तांमध्ये आबालवृद्धांचा समावेश असतो. समाजाला शक्तीच्या उपासनेचा मार्ग दाखवण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी स्वतः ११ ठिकाणी हनुमान अर्थात मारुतीची मंदिरे स्थापन केली. त्याच प्रमाणे त्यांच्या प्रेरणेने असंख्य ठिकाणी मारूतीची मंदिरे उभारण्यात आली. त्यापैकीच एक मंदिर गौडगावमध्ये आहे. येथील दक्षिणमुखी व जागृत मारुतीचे वेगळेपण म्हणजे तो शेंडीधारी आहे. शेंडीधारी मारुतीची मूर्ती दुर्मिळ समजली जाते.
सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामास उपास्य मानून समाजात धार्मिक क्रांती घडवून आणली. बलोपासना हे त्यांच्या समर्थ संप्रदायातील उपासनेचे एक महत्त्वाचे अंग होते. समर्थ रामदास स्वामी हे साक्षात् श्रीरामास आपले गुरू मानत असत, तर हनुमान हे त्यांचे कुलदैवत होते. समर्थांनी एका षट्‌पदीत ‘हनुमंत आमुची कुळवल्ली’ असे म्हटले आहे. त्यांनी शक्ती आणि युक्तीचे प्रतीक असलेल्या रामभक्त हनुमानाचा आदर्श समाजासमोर ठेवला. समर्थ रामदास स्वामी इ.स. १६४४ मध्ये सातारा परिसरात आले. येथील कराड तालुक्यातील मसूर, शहापूर, उंब्रज, चरेगाव असे ते कृष्णातीरी भ्रमण करीत असत. या परिसरात म्हणजे १६४४ ते १६५४ या दहा वर्षांत त्यांनी ही ११ मारूती स्थाने स्थापिली.
समर्थांनी चाफळ येथे प्रताप मारूती व दास मारूती, तसेच पारगाव मारूती, मसूर मारूती, शहापूर मारूती, बत्तीस शिराळे मारूती, शिंगणवाडी खडीचा मारूती, मनपाडळे मारुती, माजगाव मारुती आणि बहे बोरगाव मारुती अशा ११ मंदिरांची स्थापना केली. याशिवाय समर्थांनी टाकळी, सज्जनगड, शिवथरघळ, मिरज, महाबळेश्वर, वाई, टेंभू, शिरगाव, सिंहगड, तंजावर आणि हिमालयातील प्रसिद्ध बद्रिनाथाच्या मंदिरातही मारुतीची स्थापना केली अशी लोकधारणा आहे. गौडगाव येथील मंदिरातील हनुमानाची स्थापनाही समर्थांनी केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गौडगाव बु. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे जागृत मारुतीचे मंदिर आहे. मंदिर ४०० वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. या मंदिराभोवती दोन आवारभिंती आहेत. पहिल्या भिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या वरील देवकोष्टकात श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या मूर्ती आहेत. या देवकोष्टकाच्या उजवीकडे महालक्ष्मीची मूर्ती व डावीकडे विरभद्रेश्वर व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. या प्रवेशद्वारापासून दुसऱ्या तटबंदीतील प्रवेशद्वारापर्यंत भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड टाकून मंडप बांधलेला आहे. दुसऱ्या तटबंदीतील प्रवेशद्वाराला स्तंभशाखा आहेत. प्रवेशद्वाराच्या वर सज्जावर गदाधारी मारुतीची मोठी मूर्ती आहे. या मारुतीच्या खांद्यावर श्रीराम व लक्ष्मण बसलेले आहेत.
या प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या दोन्ही बाजूने ओवऱ्या आहेत. येथील दगडी भिंतीत नवग्रहांच्या मूर्ती आहेत. याबाबत असे सांगितले जाते की पूर्वी मारुतीची प्राणप्रतिष्ठापना करताना समर्थ रामदास स्वामींच्या मनात मूर्तीसमोरील आवारात नवग्रहाची स्थापना करण्याचा विचार होता पण त्यावेळी ती स्थापना झाली नाही. समर्थ रामदास स्वामींचा अपूर्ण संकल्प विश्वस्त समितीने या मूर्तींची स्थापना करून पूर्ण केली आहे. सभामंडपातून पाच पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात भाविकांच्या सुविधेसाठी दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार व द्वारशाखा या पितळी पत्र्याने मढविलेल्या आहेत. त्यावर मयूर नक्षीसह विविध कलाकुसर आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुतीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर शेंदूरचर्चित मूर्ती आहे. गदाधारी मारूतीचे तोंड एकाबाजूला वळलेले असल्याने त्याचा केवळ एकच डोळा दिसतो. शेंडीधारी मारुतीच्या शरीराभोवती शेपटी आहे. या मूर्तीच्या डावीकडे शिवपिंडी आहे. मूर्तीच्या बाजूने असलेल्या पितळी पत्र्यावर नक्षीकाम आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती स्थापत्यशैलीचे आहे.
हनुमानाला इच्छादेवता मानले जाते. त्यात हनुमानाचे मंदिर दक्षिणमुखी असले, तर ते अधिकच जागृत असते असे म्हणतात. गौडगावचे हे मंदिर तसेच आहे. त्यामुळे मंगळवारी आणि शनिवारी येथे भाविकांची गर्दी असते. शनीची पीडा टाळायची असेल, तर हनुमानाची उपासना केली जाते. त्यासाठी या जागृत मारुती मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी आहे. येथील हनुमान जयंती उत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. या उत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच कुस्त्यांचेही आयोजन केले जाते. शनी अमावास्येच्या दिवशीही या मंदिरात विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या जागृत मारुतीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • अक्कलकोटपासून ११ किमी, तर अक्कलकोट रेल्वे स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • अक्कलकोट येथून एसटी तसेच रिक्षांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • मंदिरात अन्नछत्र मंडळ, तसेच भक्तनिवास आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४२२४५८८९८, ९४२०२६१८८१
Back To Home