
मुंबईच्या वेशीवरील वाशी येथे असलेले जागृतेश्वर शिव मंदिर हे नवी मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक जागृत व प्रसिद्ध स्थान आहे. असे सांगितले जाते की येथील स्वयंभू शिवपिंडी ही जमिनीतून वर आलेली आहे. या माहात्म्यामुळे दररोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिरात वासोबा या देवाचे स्थान आहे. त्यावरून या गावाला वाशी हे नाव पडल्याचे सांगितले जाते. भक्तांच्या हाकेला धावून जाणारा आणि इच्छापूर्ती करणारा हा देव आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
नवी मुंबईतील बेलापूर हे प्राचीन काळापासून त्याच्या व्यूहात्मक स्थानामुळे एक महत्त्वाचे केंद्र होते. वाशी हे छोटे गाव बेलापूर किल्ल्यावरील सत्ताधीशांच्या राज्याचा एक भाग होते. महाराष्ट्राचे दूरदृष्टीचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी १९६६ मध्ये नवी मुंबईच्या रचनेची मुहूर्तमेढ रोवली. १९७२ मध्ये नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर विकसित करण्यात आले. यानंतर प्रथम १९७३ मध्ये बांधण्यात आलेल्या ठाणे खाडी पुलामुळे वाशी मुंबईस
जोडली गेली. त्यामुळे या गावास आधुनिक स्वरूप व महत्त्व प्राप्त झाले. अशा या शहरात दोन शतकांहून अधिक वर्षांचा इतिहास असलेले जागृतेश्वराचे स्थान आहे. येथील खाडी किनाऱ्यावरील तलावाकाठी जागृतेश्वराचे प्राचीन मंदिर स्थित आहे.
या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सुमारे २५० वर्षांपूर्वी वाशीतील खाडी किनाऱ्यावर ग्रामस्थांना एक शिवपिंडीच्या आकाराचा पाषाण दिसला. तेथे खोदकाम सुरू केले असता हा पाषाण आत आत जाऊ लागला. त्यामुळे खोदकाम थांबवून त्यांनी त्या पिंडीच्या आजूबाजूला भिंती घालून मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वर्षांनी येथे मंदिर बांधण्यात आले. असे सांगतात, की समुद्राला कितीही भरती आली अथवा मोठे उधाण असेल तरीही या मंदिराच्या भिंतीपर्यंत आजतागायत पाणी आलेले नाही. त्यामुळे जागृतेश्वर हा समुद्राच्या कोपापासून गावचे रक्षण करतो, अशी भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली. या श्रद्धेमुळे या मंदिरात जागृतेश्वराच्या दर्शनासाठी नेहमी भाविकांची गर्दी असते.
सुमारे अडीच एकरच्या भव्य प्रांगणात एका मोठ्या तलावाकाठी जागृतेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराकडे येण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. आवारभिंतीमध्ये असलेल्या मुख्य कमानीतून आत प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराभोवती उद्यान विकसित केलेले आहे. त्यामध्ये हिरवेगार गवत व अनेक शोभेची झाडे आहेत. भाविकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी बाके आहेत. पूर्वी हे मंदिर कौलारू होते. कालौघात अनेकदा या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. २०१५ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. १० नोव्हेंबर २००७ मध्ये देवाची आळंदी येथील शांतीब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर यांच्या हस्ते जीर्णोद्धाराचे भूमिपूजन झाले होते व २५ मार्च २०१५ रोजी तुंगारेश्वर येथील बालयोगी सदानंद महाराज यांच्या हस्ते येथील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशपूजन झाले.
नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या एका पिंपळाच्या प्राचीन झाडाखाली
दगडात कोरलेले जुने नागशिल्प आहे. मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या पायऱ्यांवरील चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदी व कासव मूर्ती आहे. सभामंडप हा खुल्या स्वरूपाचा व प्रशस्त आहे. येथील खांबांना जाणीवपूर्वक जुने रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते लक्षवेधी झाले आहेत. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला असलेल्या नक्षीदार संगमरवरी देवकोष्टकांत गणपती व ग्रामदेवता वासोबा देवाचे स्थान आहे.
येथील अंतराळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. सभामंडपातून अंतराळात प्रवेश केल्यानंतर समोर सहा ते सात फूट खोलगट गोलाकार भाग आहे. हेच येथील गर्भगृह आहे. यात उतरण्यासाठी अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळून पायऱ्या आहेत. या गर्भगृहाच्या मध्यभागी जागृतेश्वराची स्वयंभू पिंडी आहे. त्यावर नागाने छत्र धरलेले आहे व शिवलिंगावरील गलंतिकेतून त्यावर अभिषेक होत असतो. अंतराळात गर्भगृहाच्या पुढे, वरच्या बाजूला आणखी तीन मंदिरे आहेत. त्यापैकी मध्यभागी असलेल्या मंदिरात विठ्ठल–रखुमाई व बाजूला संत
ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या मूर्ती आहेत. डावीकडे राधा–कृष्ण व उजवीकडील मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मू्र्ती आहेत. या मंदिराला मुखमंडप, सभामंडप, दोन लहान शिखरे आणि गर्भगृहावर मुख्य उंच शिखर व त्यावर कळस आहे.
मुख्य मंदिराच्या परिसरात मरीआई आणि शीतलादेवीचे मंदिर आहे. मरीआई–शीतलादेवीच्या मंदिराच्या डावीकडे हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस मध्यभागी राम–लक्ष्मण–सीतेच्या मूर्ती असून दोन्ही बाजूंना त्यांना वंदन करत असलेल्या हनुमानाचे शिल्प आहे. गर्भगृहात डावीकडे गणेशाची मूर्ती आहे. मध्यभागी हनुमानाची शेंदूरचर्चित उभी मूर्ती आहे. उजवीकडे शनिदेवाचे स्थान आहे. मंदिर परिसरात एक दत्त मंदिरही आहे. येथे गजानन महाराज, स्वामी समर्थ, दत्तगुरू आणि साईबाबांच्या मूर्ती आहेत.
दररोज सकाळी ७ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत
भाविकांना जागृतेश्वराचे दर्शन घेता येते. सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत ग्रामस्थांकडून येथे हरिपाठ केला जातो. अनेक वर्षांपासून ही परंपरा येथे सुरू आहे. या मंदिरात दररोज अभिषेक, रुद्राभिषेक, पूजा, शांतीपूजन आदी धार्मिक विधी केले जातात. महाशिवरात्रीच्या सात दिवस आधी येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यादरम्यान रात्री ११ वाजेपर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम होतात. या सातही दिवस भाविकांना अन्नदान करण्यात येते. गोकुळाष्टमीच्या आधीही सात दिवस येथे कार्यक्रम होतात. त्यादरम्यानही गोपाळकृष्णाचे अखंड नामस्मरण, अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होतात. गोकुळाष्टमीला कृष्णजन्माच्या अध्यायाचे वाचन होते. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो. माघ महिन्याच्या अमावस्येच्या दोन दिवस आधी येथे शीतलादेवी–मरीआईची जत्रा भरते. जत्रेच्या आदल्या दिवशी देवीचा जागरण–गोंधळ होतो. दुसऱ्या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. या दिवशी येथे अभिषेक, पूजा, भजन, कीर्तन, आगरी–कोळी समाजाच्या पारंपरिक भक्तिगीतांचे गायन आदी कार्यक्रम होतात. याशिवाय रामनवमी, हनुमान जयंती, तुकाराम बीज हे उत्सवही साजरे होतात.