महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळे आहेत. या स्थळांमध्ये वाघरुळ येथील श्री जगदंबा माता मंदिर हे विशेष महत्त्वाचे मानले जाते. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर वसलेले हे मंदिर या भागातील समृद्ध इतिहासाचे आणि संस्कृतीचे एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेल्या या मंदिरात जगदंबा माता आणि रेणुका माता या दोन शक्तीपीठांचे दर्शन एकाच ठिकाणी घडते. या स्थानाला सुमारे पावणेतीनशे वर्षांचा इतिहास आहे. जागृत आणि संघर्षाच्या काळात धैर्य देणाऱ्या या स्थानामुळे या गावची ओळख ‘देवीचे वाघरुळ’ म्हणून झालेली आहे.
जालना जिल्ह्यातील वाघरुळ हे गाव राजकीय, भौगोलिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर वसलेल्या या गावाला ऐतिहासिक वारसा आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात येथे एक लष्करी तळ होता. त्यावरून या स्थानाचे सामरिक महत्त्व स्पष्ट होते. तसेच, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या काळात १७ सप्टेंबर १९४८ रोजी या गावाजवळील घाटीमध्ये निजामाच्या सैन्याविरुद्ध मोठा संघर्ष झाला होता. अशा या गौरवशाली मातीमध्ये वसलेल्या वाघरुळ गावात व परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
गावाजवळील एका डोंगराच्या माथ्यावर श्री जगदंबा देवीचे प्राचीन मंदिर स्थित आहे. या मंदिरात एकाच वज्रपीठावर रेणुका माता आणि जगदंबा माता अशा दोन्ही देवींच्या मूर्तींची स्थापना केलेली आहे. येथील देवता अत्यंत जागृत असून त्या भाविकांच्या नवसाला पावतात, अशी लोकांची श्रद्धा आहे.
मंदिराच्या प्राचीनतेचा पुरावा गावात असलेल्या एका ऐतिहासिक विहिरीवरून मिळतो. या विहिरीवर शके १६८४ म्हणजेच इ.स. १७६२ सालातील एक शिलालेख कोरलेला आहे. याच कालखंडात डोंगरावरील मंदिराचे बांधकाम झाले असावे, असा अंदाज वर्तवला जातो. गावातील मूळ मंदिर हे या डोंगरावरील मंदिरापेक्षाही अधिक जुने आणि प्राचीन आहे, असा दावा ग्रामस्थ करतात. सन १९९८ मध्ये या मंदिराचा मोठा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या स्थापनेबाबतची आख्यायिका अशी की पूर्वी जगदंबा देवी गावाच्या मध्यवर्ती भागातील मंदिरात राहत होती. मात्र, काही कारणांमुळे त्या ठिकाणचे पावित्र्य नष्ट होऊ लागले. त्यावेळी देवीने पुजाऱ्याच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला.
सूर्योदयाच्या वेळी आपल्याला एका गाड्यात बसवून डोंगराच्या दिशेने न्यावे आणि ज्या ठिकाणी गाड्याचे चाक मोडेल, त्याच जागी आपली स्थापना करावी, अशी आज्ञा देवीने दिली. देवीच्या दृष्टांतानुसार दुसऱ्या दिवशी गाडा जोडण्यात आला आणि देवीची पाषाण मूर्ती त्या गाड्यात ठेवून तो डोंगराकडे नेण्यात आला. डोंगर माथ्यावर पोहोचल्यावर एका विशिष्ट ठिकाणी गाड्याचे चाक मोडले आणि त्याच ठिकाणी मंदिराची उभारणी करण्यात आली. येथे जगदंबा देवीची स्थापना होत असताना त्यांच्या बाजूला रेणुका देवीचा तांदळा देखील स्थापित करण्यात आला.
वाघरुळ गावापासून काही अंतरावर डोंगराच्या माथ्यावर असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी आता पक्की सडक तयार केलेली आहे. मंदिराच्या समोरच गर्द वृक्षांच्या सावलीत एक मोठे वाहनतळ उपलब्ध आहे. मंदिराच्या परिसरात एक प्राचीन दीपमाळ व भाविकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी आसनांची सोय आहे.
मंदिर परिसरात स्थानिक देवतांची लहान मंदिरे, प्रवाशांसाठी पाणपोई आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक मोठे सभागृह आहे. मंदिराच्या चोहोबाजूने तटबंदी बांधलेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारात एक साधी स्वागत कमान आहे. मंदिराचे मुख्य प्रांगण रस्त्याच्या पातळीपेक्षा थोडे उंचावर आहे, त्यामुळे प्रवेशद्वारातून तीन पायऱ्या चढून यावे लागते. या पायऱ्यांच्या मध्यभागी एका वज्रपीठावर सिंहाचे देखणे शिल्प आहे. प्रांगणात शिरल्यावर उजव्या बाजूला एक लहान मंदिर दिसते. या मंदिरात स्थानिक देवतेची शेंदूर लावलेली पाषाण मूर्ती आहे. या लहान मंदिराच्या छतावर गोलाकार घुमटासारखे शिखर असून त्यावरील आमलकावर सोनेरी कळस बसवलेला आहे.
सन १९९८ मध्ये मंदिराचा मोठा जीर्णोद्धार करण्यात आला. यावेळी मंदिराच्या समोरच्या भागात एका दुमजली सभामंडपाचे बांधकाम झाले. मंदिराची मुख्य रचना सभामंडप आणि गर्भगृह अशा दोन भागात विभागलेली आहे. संपूर्ण मंदिर सुमारे दोन फूट उंच असलेल्या एका चौथऱ्यावर उभे आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराला तीन पायऱ्या आहेत आणि या द्वाराला नक्षीदार लाकडी दारे बसवलेली आहेत.
सभामंडपाच्या आत आल्यावर प्रत्येकी चार गोलाकार खांबांच्या दोन रांगा दिसतात. या खांबांवर मजबूत तुळया आहेत. सभामंडपाचे संपूर्ण छत या तुळया आणि भिंतींच्या आधारावर तोललेले आहे. या छतावर दुसऱ्या मजल्याचा एक सज्जा असून त्यावरील खांबांवर देखील छत आहे. या छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे, मात्र त्यात उजेड आणि हवा येण्यासाठी खिडक्या आहेत. भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी सभामंडपात स्टीलचे कठडे लावून रांगांची व्यवस्था केलेली आहे.
सभामंडपाच्या पुढे हेमाडपंती स्थापत्य शैलीतील पाषाणी बांधकाम असलेले प्राचीन गर्भगृह आहे. गर्भगृहात वज्रपीठावर अष्टभुजा महिषासूर मर्दिनी स्वरूपातील जगदंबा देवीची काळ्या पाषाणातील तेजस्वी मूर्ती आहे. ही देवी सिंहावर आरूढ असून तिच्या हातात विविध आयुधे आहेत. देवीने जमिनीवर पडलेल्या राक्षसावर भाल्याने वार केल्याचा प्रसंग या मूर्तीतून साकारला आहे. सन १९९८ च्या जीर्णोद्धारावेळी या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. जगदंबा देवीच्या मूर्तीच्या अगदी बाजूला रेणुका देवीची तांदळा स्वरूपातील शेंदूर लावलेली पाषाण मूर्ती आहे.
विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या देवींच्या डोक्यावर चांदीचे सुंदर मुकुट आहेत. वज्रपीठावर उजव्या बाजूला पितळी सिंह शिल्प आणि मोरपिसांचा कुच्चा आहे. गर्भगृहात देवीसाठी एक शयनमंचक देखील आहे. गर्भगृहाचे छत अष्टकोनी आहे व त्याच्या मध्यभागी चक्राची नक्षी कोरलेली आहे.
गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गासाठी गर्भगृहाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला मंदिरातून बाहेर पडण्यासाठी दोन स्वतंत्र दरवाजे दिलेले आहेत. सभामंडपाच्या बाहेरील बाजूने वरच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्यांचा जिना आहे. सभामंडपाच्या छतावर सुरक्षेसाठी चोहोबाजूने कठडा बांधलेला आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरामध्ये चारही बाजूंना देवकोष्टके आहेत. शिखराच्या सर्वात वरच्या भागात एकावर एक असे दोन आमलक, त्यावर कळस आणि धर्मध्वज आहे. या मुख्य मंदिरापासून जवळच एक प्राचीन हनुमान मंदिर देखील आहे.
डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाघरुळ गावात हेमाडपंती स्थापत्य शैलीतील एक प्राचीन शिवमंदिर आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, हेच जगदंबा देवीचे मूळ मंदिर होते. देवीने जेव्हा डोंगरावर स्थलांतर केले, तेव्हा या मंदिरात शिवपिंडीची स्थापना करण्यात आली. या मंदिराच्या समोर एक स्वतंत्र नंदी मंडप आहे. मंदिराच्या प्रांगणात एक प्राचीन दीपमाळ आणि कोरीव पाषाणात बांधलेली पायऱ्यांची बारव आहे. या बारवेच्या कमानीवर शके १६८४ असा उल्लेख असलेला शिलालेख पाहायला मिळतो, जो या स्थानाच्या प्राचीनतेची साक्ष देतो.
वाघरुळच्या जगदंबा माता मंदिरात शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र हे दोन मुख्य वार्षिक उत्सव अत्यंत उत्साहात साजरे होतात. चैत्र पौर्णिमा आणि पौष पौर्णिमेला देवीच्या जत्रा असतात. सन १९९८ मध्ये नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यापासून मंदिरात मांसाहारी नैवेद्य, बोकड किंवा कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. भाविक आता देवीला वरण-भात, पुरणपोळी किंवा डाळबाटी यांसारखा गोड भंडाऱ्याचा नैवेद्य दाखवतात. भाविक देवीची खणानारळाने ओटी भरतात आणि तिला सौभाग्याचे अलंकार अर्पण करतात. मार्गशीर्ष महिन्यात येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. उत्सवाच्या काळात मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण आणि गोंधळ यांसारखे धार्मिक कार्यक्रम पार पडतात. कार्यक्रमांनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या मंदिरात चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी आणि श्रावण महिना यांसह वर्षभरातील सर्व सण साजरे होतात. दर मंगळवार आणि शुक्रवारी तसेच अष्टमी, पौर्णिमा आणि अमावस्येला मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते. मंदिराच्या वतीने वर्षभरातील प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन केले जाते. दररोज सकाळी पाच वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.