जगदंबा देवी मंदिर

नागरतास, ता. मालेगाव, जि. वाशिम

‘दीव्यति इति देवी’ अशी देवी शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते. यातील ‘दिव्’ या धातूचा अर्थ क्रीडा करणे असा आहे. भारतीय अध्यात्मशास्त्रानुसार अनंतकोटी ब्रह्मांडाच्या सृष्टी, स्थिती व लय या रुपांची क्रीडा देवी करीत असते. ही देवी विश्वाचे आदिकारण मानली जाते, म्हणून तिला जगन्माता किंवा जगत्-अंबा असे म्हटले जाते. नागरतास येथील मंदिरात या जगदंबा देवीची स्वयंभू मूर्ती वसलेली आहे. लोकश्रद्धेनुसार ही देवी नवसाला पावणारी आहे. या मंदिर संस्थानात आदिशक्ती आदिमायेच्याच तुळजाभवानी व रेणुकामाता या रुपांचीही मंदिरे आहेत.

जगदंबा ही विदर्भ-मराठवाड्यातील अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. तिच्याबरोबरच रेणुका आणि तुळजाभवानी अशा तीन शक्तीदेवतांचे एकत्रित दर्शन या मंदिरांत होत असल्याने या स्थानास महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील जगदंबा देवीचे मंदिर सुमारे ४०० वर्षे प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या स्थापनेविषयीची आख्यायिका अशी की सतराव्या शतकात, शिवकाळापूर्वी या भागात कासारवाडी नावाची एक वस्ती होती. तेथे दशरू घुणसे नावाचे एक गृहस्थ राहात असत. एकदा ते त्यांच्या पडिक जमिनीची नांगरणी करीत असताना जमिनीत त्यांना जगदंबा व अन्य देवींच्या मूर्ती मिळाल्या. दशरू घुणसे यांनी आपल्या जमिनीत देऊळ बांधून त्यांची स्थापना केली. तेव्हापासून त्यांचे आडनाव देवळे असे पडले, तर या गावाचे नाव नागरतास असे पडले, असे सांगण्यात येते.

येथे विविध वृक्ष आणि बागबगीचाने नटलेल्या विस्तीर्ण अशा परिसरामध्ये जगदंबा देवीचे हे मंदिर वसलेले आहे. मंदिराच्या परिसरास मोठे प्रवेशद्वार आहे. येथे उजव्या बाजूला चिंचेचा प्राचीन वृक्ष आहे. त्याच्या तळाशी हनुमंताची देवळी आहे. नजीकच एका चौथऱ्यावर काही उपदेवतांचे शेंदूरचर्चित पाषाण आहेत. ते मुळात प्राचीन मंदिरातील अवशेष असल्याचे सांगण्यात येते. समोरच उंच अधिष्ठानावर जगदंबा मातेचे टुमदार मंदिर उभे आहे. मंदिराच्या शेजारी दोन मोठे दीपस्तंभ व दोन तुलसीवृंदावने आहेत. येथे देवीची ध्वजकाठीही आहे.

सभामंडप आणि त्यातच गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या बाह्यभिंतींवर उभ्या भौमितिक आकारांची सुंदर सजावट केलेली आहे. त्यात अनेक लहानमोठ्या देवळ्या व छोटी जालवातायने आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावरही कोरीव नक्षीकाम केलेले आहे. येथील दर्शनी भिंतीवर, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस कोरीव कलश आकारांनी तयार केलेले उंच स्तंभ आहेत. सभामंडपातील आतील भिंतीमध्ये अनेक छोटे कोनाडे आहेत. छताकडील भागावर गुहाचित्रांप्रमाणे दिसणारी यक्ष, घोडेस्वार, योद्धे यांची उठावशिल्पे कोरलेली आहेत. हे या मंदिराच्या सजावटीचे एक वैशिष्ट्य ठरते. गर्भगृहात उंच अधिष्ठानावर जगदंबा देवीची तांदळा स्वरूपातील शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे. या तांदळा स्वरूप मूर्तीस पितळी डोळे बसवलेले आहेत. कपाळी मोठा मळवट व कुंकू आहे. नाकाच्या ठिकाणी छोटीशी नथ घातलेली आहे. मूर्तीच्या मस्तकी नक्षीदार मुकूट आहे. तसेच गळ्यात अनेक मोत्याच्या माळा, मंगळसूत्र आदी अलंकार आहेत. मूर्तीस भरजरी साडी नेसवलेली आहे. देवीची ही मूर्ती स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. देवीच्या पादुका मूर्तीसमोर आहेत. डाव्या बाजूला एका देवकोष्ठकात एक देवी आहे. तिची मूर्तीही तांदळा स्वरूपाची आहे. मंदिराचे शिखर चारही बाजूंनी वर निमुळते होत गेलेले आहे. त्यावर अनेक छोटे स्तंभ आणि देवकोष्ठके आहेत. शीर्षस्थानी मोठा कलश आहे.

मंदिरासमोर होमहवन करण्यासाठी एक मंडप आहे. मुख्य मंदिरापासून काही अंतरावर तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे. आधुनिक शैलीत बांधलेल्या या मंदिरास मोठा खुला सभामंडप आहे. मंदिरातील देवीची मूर्ती ही काळ्या पाषाणातील आहे. या मूर्तीच्या मस्तकी चांदीचा मुकूट आहे. तिचे डोळे पाणीदार आहेत आणि गळ्यात दागिन्यांबरोबरच कवड्यांची माळ आहे. उजव्या बाजूला एक तलवार आहे. या मंदिराचा आतील भागही उंच घुमटाकार आहे. येथून मधल्या द्वारातून बाजूच्या रेणुका मातेच्या मंदिरात प्रवेश होतो. रेणुका मातेची मूर्ती ही काळ्या पाषाणातील व तिच्या बाजूला बालरूपातील परशुराम यांची मूर्ती आहे. या दोन्ही मूर्तींच्या मस्तकी चांदीचे मुकूट आहेत. येथील तुळजाभवानीची मूर्ती तुळजापूरहून, तर रेणुकामातेची मूर्ती माहूरहून काळ्या पाषाणात घडवून आणण्यात आल्या आहेत.

या परिसरात विठ्ठल-रुक्मिणीचे स्वतंत्र मंदिर आहे. या मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या शेजारी परंतु वेगवेगळ्या अधिष्ठानावर असलेल्या काळ्या पाषाणातील साजिऱ्या मूर्ती विराजमान आहेत. या मंदिरात गणपती, आसरा माता आणि इसामाता अशा दैवतांची स्थाने आहेत. मंदिर परिसरात देवीची ओटी भरण्यासाठीचे सामान आणि प्रसादाची दुकाने आहेत.

या जगदंबा माता मंदिर संस्थानात चैत्र आणि शारदीय असे दोन्ही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. नवरात्रात रोज रात्री देवीचा गोंधळ होतो. सकाळ-संध्याकाळ आरती होते आणि दोनवेळा अन्नदान केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • मालेगाव येथून ७ किमी अंतरावर
  • वाशिम येथून २७ किमी अंतरावर
  • मालेगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे

जगदंबा देवी मंदिर

नागरतास, मालेगांव, जिला. वाशिम

Back To Home