मराठवाड्यातील हिंगोली भागात सन १८०३ साली इंग्रज आणि मराठे यांच्यात, तर १८५७ च्या उठाव काळात नागपूरच्या गादीचे वारस, त्यांचे सैन्य आणि स्थानिक बंडखोर यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५६ साली राज्य पुनर्रचनेत मराठवाड्याचा भाग म्हणून हिंगोली महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आला. १९६० साली हिंगोली हा परभणी जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. १ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा निर्माण झाला. याच जिल्ह्यातील कवठा गावातील उंच टेकडीवर जगदंबा देवीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर मराठवाड्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
हे देवस्थान सुमारे १३५० वर्षे प्राचीन असल्याचे येथील ग्रामस्थ व मंदिराचे विश्वस्त सांगतात. कयाधू नदीच्या पाणलोट क्षेत्रात असल्याने सेनगाव तालुका कृषी व प्रशासकीय दृष्ट्या पूर्वीपासून अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. तालुक्यातील कवठा गावाजवळील डोंगर माथ्यावर हे मंदिर आहे. पूर्वी येथे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील भव्य मंदिर होते. परंतु सन १९७० मध्ये ते पडले. त्यानंतर येथील मूर्तीवर पत्र्याचे छप्पर बांधण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी या जागी नव्याने मंदिर उभारण्यात आले. महाराष्ट्र सरकारतर्फे या मंदिराचा तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देऊन गौरव करण्यात आलेला आहे.
गावापासून जवळ उंच डोंगरावर हे मंदिर स्थित आहे. डोंगर माथ्यापर्यंत येण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेला प्रशस्त पायरीमार्ग आहे. सुमारे दीडशे पायऱ्या असलेल्या पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूला भक्कम सुरक्षा कठडे आहेत. डोंगरावर सर्वत्र वृक्ष संवर्धन केलेले असल्याने सर्वत्र हिरवळ जाणवते. मंदिरास भक्कम किल्लेवजा तटबंदी आहे. या तटबंदीत प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारात आत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रशस्त प्रांगणात तटबंदीला लागून भाविकांना बसण्यासाठी आसने व तटबंदीजवळ दीपस्तंभ आहे. तटबंदीलगतच्या आसनांवर काही वानर शिल्पे आणि प्रांगणात यज्ञकुंड आहे. प्रांगणात पॅगोडा पद्धतीचे एक लहान मंदिर आहे. या मंदिराचे छत तीन थरात आहे. मंदिरात स्थानिक देवतांच्या पाषाणमूर्ती आहेत.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी जगदंबा देवी मंदिराची रचना आहे. मंदिरास समोर, डाव्या व उजव्या बाजूला असे एकूण तीन मुखमंडप व तीन प्रवेशद्वारे आहेत. मुखमंडपात एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले चार नक्षीदार स्तंभ व त्यांवरील तुळईवर छत आहे. छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. वितानावर चक्रनक्षी आहेत.
मंदिर उंच चौथऱ्यावर स्थित असल्यामुळे सभामंडपाच्या प्रवेशद्वारात प्रत्येकी सहा पायऱ्या आहेत. प्रवेशद्वार साधेसे असून बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात मध्यभागी गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहाच्या चार बाजूंना चार नक्षीदार स्तंभ आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. या स्तंभदंडावर उभ्या धारेच्या नक्षी आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी हस्त व हस्तांवर तुळई आहेत. सभामंडपाचे छत स्तंभांवरील तुळई व भिंतीवर तोलले आहे. येथील वितानावर चक्रनक्षी आहेत.
गर्भगृह सभामंडपापेक्षा उंच आहे व येथील प्रवेशद्वारास दोन पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. गर्भगृहात वज्रपीठावर जगदंबा देवीची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. विविध अलंकार व वस्त्रे ल्यायलेल्या या देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. वज्रपीठावर आणखी एक शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती व खंडोबाची तसबीर आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. तिन्ही मुखमंडपांच्या छतावर पॅगोडा पद्धतीची तीन थरांची शिखरे आहेत. सभामंडपाच्या छतावर चहूबाजूला सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे.
शारदीय नवरात्रोत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याशिवाय मंदिरात चैत्रोत्सव, कार्तिक पौर्णिमा, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, श्रावण मास इत्यादी सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ, प्रवचन, भागवत कथा वाचन, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवांच्या वेळी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी मंदिरात भाविकांची विशेष वर्दळ असते.