महाराष्ट्र ही संतांची आणि देवतांची पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते. या पवित्र भूमीतील विदर्भ प्रांत आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशासाठी विशेष प्रसिद्ध आहे. विदर्भाच्या काळ्या कसदार मातीत अध्यात्माची मुळेही खोलवर रुजलेली आहेत. संत गजानन महाराजांचे शेगाव असो, लोणारचे जागतिक कीर्तीचे सरोवर असो किंवा सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान; यामुळे विदर्भातील बुलडाणा जिल्हा पर्यटनाच्या आणि अध्यात्माच्या दृष्टीने अनेक अंगांनी समृद्ध आहे. याच बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात, सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत आणि खानदेश-विदर्भाच्या सीमेवर वसलेले पिंपळगाव देवी हे गाव आणि येथील ग्रामदेवता श्री जगदंबा माता यांचे स्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
पिंपळगाव देवी हे नावच या गावाचे वेगळेपण सिद्ध करते. विदर्भात पिंपळगाव नावाची अनेक गावे आहेत. त्यांमध्ये पिंपळगाव राजा किंवा पिंपळगाव नाथ इत्यादी नावांचा समावेश आहे.
परंतु या गावाला मिळालेली ‘देवी’ ही उपाधी या गावाची ओळख आणि अस्तित्व पूर्णपणे या जगदंबा मातेच्या मंदिराभोवती केंद्रित असल्याचे स्पष्ट होते. या मंदिरात जगदंबा देवीसोबत अंबाबाई व निंबाबाई या देवींच्या मूर्ती विराजमान आहेत. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी या तीन बहिणींच्या मूर्ती येथे आढळल्या होत्या. तेव्हापासून या देवी पंचक्रोशीचे रक्षण करत आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील देवी विदर्भातील अनेक कुटुंबांच्या कुलस्वामिनी म्हणून पूजल्या जातात.
जगदंबा म्हणजे विश्वाची माता. येथील देवी अत्यंत जागृत आहे. ती भक्तांच्या हाकेला धावून जाते, अशी तिची ख्याती आहे. विशेषतः अपत्यप्राप्तीसाठी अनेक दाम्पत्ये येथे येऊन देवीला साकडे घालतात. नवस बोलण्याची आणि तो फेडण्याची येथील पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे. नवस बोलताना हिरव्या रंगाच्या कापडात नारळ व देवीची ओटी बांधली जाते. यास स्थानिक भाषेत भार असे संबोधले जाते. मंदिराच्या भिंतींवर असे हजारो भार बांधलेले दिसतात. नवस पूर्ण झाल्यावर या भाराच्या ओटीचे गावातील नैसर्गिक जलस्रोतांमध्ये भक्तिभावाने विसर्जन केले जाते.
यादव साम्राज्याचा अस्त, मोगल-निजाम राजवट आणि नंतर मराठ्यांची सत्ता अशा अनेक राजकीय स्थित्यंतरांच्या काळातही भक्तांच्या श्रद्धेमुळे आणि दुर्गम स्थानामुळे हे देवस्थान तग धरून राहिले. १७ व्या शतकात सिंदखेड राजा येथील लखुजी जाधवांच्या काळात या भागातील मंदिरांचे पुनरुज्जीवन झाले, त्यामुळे मंदिराच्या रचनेवर मराठाकालीन स्थापत्यशैलीचा काही अंशी प्रभाव दिसून येतो. ब्रिटिश काळातील वऱ्हाड प्रांताच्या गॅझेटिअरमध्येही या मंदिराची नोंद आहे.
मोताळा तालुक्याला प्राचीन मंदिरांचा मोठा वारसा लाभला आहे. तारापूरचे प्राचीन अंबामाता मंदिर, रोहिणखेडचे कोळेश्वर मंदिर, कोथळी येथील हेमाडपंती शिवमंदिर आणि राजूर घाटातील रामेश्वर मंदिर या प्राचीन मंदिर शृंखलेतील पिंपळगाव देवी येथील हे मंदिर या पंक्तीतील महत्त्वाचे मंदिर आहे. गावातील बसस्थानकानजीकच्या चौकापासून काही अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. येथील परिसर अत्यंत शांत व प्रसन्न आहे. मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. मंदिरासमोरील जागेत एक प्रशस्त सभागृह आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन प्राचीन दीपमाळा आहेत. दुमजली प्रवेशद्वाराजवळ आसरा मातांचे स्थान आहे.
सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात यज्ञकुंड आहे. भाविकांच्या रांगेच्या व्यवस्थापनासाठी सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे कठडे बसवण्यात आले आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात छोट्या चौथऱ्यावर देवींचे तीन शेंदूरचर्चित तांदळे आहेत. या मंदिरातील भिंतींवर देवीसमोर बोललेल्या नवसांचे नारळ बांधण्यात येतात. मंदिराच्या गर्भगृहावर उंच शिखर आहे. शिखराच्या उभ्या तीन चौकोनी स्तरांवर मोठा आमलक व त्यावर कळस आहे. शिखरावरील देवकोष्टकांमध्ये विविध देव-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोरच असलेल्या कडुलिंबाच्या वृक्षाखाली छोटे शिवलिंग आहे.
मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव आणि पौष पौर्णिमेची यात्रा हे दोन प्रमुख उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रीमध्ये नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, काकडा आरती, हरिपाठ, कीर्तन आणि भागवत कथेचे आयोजन होते. नवमीला होमहवन होऊन उत्सवाची सांगता होते. पौष पौर्णिमा ते अमावस्या असे पंधरा दिवस चालणारी येथील दुसरी यात्रा विदर्भ आणि खानदेशातील भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत देवींच्या तांदळ्यांना विशेष सजवले जाते. यात्रेत प्रसाद, खेळणी आणि मनोरंजनाची साधने यांची रेलचेल असते. विशेषतः येथील प्रसिद्ध रेवडीची चव चाखण्यासाठी खवय्ये गर्दी करतात.