मुंबई-गोवा महामार्गावर पेणपासून सात किलोमीटर अंतरावर असलेले वाशी हे गाव जगदंबा भवानीच्या (वरसूबाय) अस्तित्वाने पावन झालेले एक पवित्र स्थान असल्याची मान्यता आहे. अलिबाग तालुक्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई व पुणे जिल्ह्यातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. दर मंगळवारी सायंकाळी या मंदिरात देवीची महाआरती होते. या आरतीचा मान मिळविण्यासाठी दोन वर्षांपर्यंतची आगाऊ नोंदणी असते. महाआरतीच्या दिवशी ज्याचा मान असेल त्याच्या हस्ते देवीची पुजा-अर्चा व अभिषेक होतो. इच्छित मनोरथ पूर्ण करणारी आणि भक्तांच्या नवसाला पावणारी, अशी या देवीची सर्वत्र ख्याती आहे.
जगदंबा भवानी देवीचे वाशी येथील हे मंदिर एक हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. या मंदिराची अख्यायिका अशी की पूर्वीच्या काळी मोघलांप्रमाणेच पोर्तुगिजांनीही महाराष्ट्रातील देव देवतांची मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला होता. वाशी येथील जगदंबा भवानीची ख्याती सर्वत्र होती. म्हणून त्यांनी हे मंदिर उध्वस्त करण्याचे ठरवले. पोर्तुगिज सैन्य धरमतरमार्गे वाशी गावाजवळ आले असता रक्तपिपासू भुंग्यांच्या थवा निर्माण होऊन या सैन्यावर तो तुटुन पडला. त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली व हे मंदिर सुस्थितीत राहिले.
दुसऱ्या अख्यायिकेनुसार, १७ जुलै १९४७ रोजी मुंबई-रेवस प्रवासी वाहतूक करणारी रामदास बोट रेवस बंदराजवळील खडकावर आदळून बुडाली. त्यात सुमारे ६०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता व केवळ 75 प्रवासी वाचले होते. त्यात वाशी गावचे एक प्रतिष्ठित नागरीक मंगलदास पद्मजी पाटील होते. त्यांनी त्यावेळी सांगितलेली हकीगत अशी की बोट बुडू लागताच अनेक जण पोहण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामध्ये तेही होते. वादळ, मोठ्या लाटा यांचा सामना करीत ते थकून गेले होते. परंतु किनारा अजून खूपच लांब होता. मृत्यू समीप दिसत असताना त्यांनी जगदंबा अंबा भवानीचा धावा केला. तेवढ्यात त्यांच्या समोरून एक ओंडका वाहत जाताना त्यांनी पाहिले आणि त्याच्या साह्याने ते सुखरूप किनाऱ्याला लागले. घरी परतल्यानंतर त्यांनी प्रथम या देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर गावकऱ्यांना हा प्रकार सांगितला.
मंदिरात असलेल्या पूर्वीच्या नक्षीदार लाकडी खांबांना वाळवी लागल्याने मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरले. मुख्य गर्भगृह आणि देवीच्या मूर्तीचे स्थान तेच ठेवून २०१० मध्ये झालेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. वाशी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे. दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची रचना आहे. सुमारे १२ एकराच्या विस्तिर्ण तलावाशेजारी हे मंदिर स्थीत आहे. दर्शमंडपातील पाच पायऱ्या चढून मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. बंदिस्त स्वरुपाच्या या सभामंडपात प्रकाश व हवा खेळती राहावी यासाठी मोठ्या खिडक्या आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजुला प्रदक्षिणा मार्ग सोडून अंतराळ व गर्भगृहाची रचना आहे. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या देवकोष्टकांमध्ये गणपती व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या लाकडी द्वारशाखांवर नक्षीदार कलाकुसर आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही स्तंभशाखांवर गदाधारी द्वारपाल मूर्ती, उत्तरांगावर भवानी जगदंबा हे नाव व त्याबाजूला नक्षीकाम आहे.
गर्भगृहात एका संगमरवरी मखरातील वज्रपिठावर देवीची सुमारे चार फूट उंचीची चतुर्भुज पाषाणी मूर्ती आहे. शेंदुरचर्चित असलेल्या या मूर्तीवर चांदीचा मुकुट व अंगावर विविध अलंकार आहेत. या मंदिराच्या गर्भगृहावर सुमारे ८० फूट उंचीचे शिखर व त्यावर कळस आहे. त्यामुळे पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरून हे शिखर नजरेस पडते. मंदिर परिसरात विठ्ठल-रुक्मिणी, पादुका मंदिर, श्रीराम, गणपती व महादेव अशी मंदिरे आहेत. यापैकी महादेवाचे मंदिर सोळाव्या शतकातील आहे. त्यामुळे हा परिसर देऊळ आळी म्हणून प्रसिद्ध आहे.
देवी भक्तांच्या हाकेला धावते, त्यांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी ख्याती आहे. अनेक भक्तगण देवीसमोर गाऱ्हाणी मांडतात आणि देवीला नवस बोलतात. नवरात्र आणि यात्रा उत्सवात नवस फेडणाऱ्यांची गर्दी जास्त असते. यामध्ये भाविकांकडून नवसपूर्तीनिमित्त वजन तुला केली जाते. अनेक भाविक पाच ते दहा दिवसांचा उपवास करून नवस फेडण्यासाठी वाद्यांच्या गजरात, देवीचे गुणगान गात यावेळी मंदिरात येतात. श्री जगदंबा भवानी देवीच्या मंदिरात दररोज पहाटे पाच वाजता व सायंकाळी सात वाजता आरती होते. या दरम्यान मंदिर भाविकांसाठी खुले असते. तसेच दर मंगळवारी सायंकाळी सात वाजता महाआरती असते. नऊरात्रीच्या नऊ दिवसात हजारो भाविक रांगा लावून देवीचे दर्शन घेतात. मंदिरातील होमकुंडात यावेळी अनेक ब्राह्मणांच्या हस्ते पुजापाठ व मंत्रघोषात होम प्रज्वलीत केला जातो. नवव्या दिवशी देवीची पालखी निघते. नवरात्र उत्सवानंतर चैत्र शुक्ल पौर्णिमेला देवीची यात्रा भरते.