इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस अर्थात ‘इस्कॉन’कडून जगभरात कृष्णभक्तीचा प्रसार सुरू आहे. यात अर्थातच मुख्य योगदान आहे संस्थेने उभारलेल्या भव्य मंदिरांचे. या मंदिरांमुळे भाविक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ‘इस्कॉन’शी जोडले जात आहेत. पुण्यातही कात्रज-कोंढवा बायपास रस्त्यावर इस्कॉनचे असेच एक भव्य मंदिर उभे आहे आणि येथील वैदिक संस्कृतीच्या प्रसाराचे काम लक्षणीय ठरते आहे. त्यामुळे हे फक्त मंदिरच नव्हे, तर एव्हीसीसी अर्थात न्यू वेदिक कल्चर सेंटर म्हणूनही नावारूपाला येत आहे.
२०१३ मध्ये या मंदिराची उभारणी पूर्ण झाली आणि या वास्तूला पुणे शहरातील सर्वांत भव्य मंदिर ठरण्याचा मान मिळाला. तब्बल सहा एकर इतका या मंदिराचा परिसर आहे. मंदिराच्या उभारणीला सात वर्षे लागली आणि ४० कोटींचा खर्च झाला. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालेला मंदिराचा उद्घाटन सोहळाही पुणेकरांसाठी संस्मरणीय ठरला.
संपूर्ण मंदिराच्या बांधकामासाठी संगमरवराचा वापर झाला आहे. प्रत्येक खांब आणि भिंती कोरीवकामाने सजल्या आहेत. प्रत्येक खांबावर दोन गोपी कोरलेल्या आहेत आणि तळाशी हत्तीच्या प्रतिमा आहेत. संगमरवरी भिंतीवर पडणाऱ्या विद्युत दिव्यांच्या प्रकाशामुळे मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते.
येथे राधाकृष्ण आणि व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांची मुख्य मंदिरे आहेत. त्यापैकी राधाकृष्ण अर्थात राधा वृंदावनचंद्र मंदिराची वास्तुशैली उत्तर भारतीय पद्धतीची आहे आणि त्याच्या बांधकामात लाल दगड आणि संगमरवराचा वापर करण्यात आला आहे. व्यंकटेश्वर मंदिर दाक्षिणात्य वास्तुशैलीतील आहे. तिरुमलातील बालाजी मंदिराच्या धर्तीवर कोटा दगडांचा वापर करून याची उभारणी करण्यात आली आहे. सभागृहात श्री श्री गौर निताई मंदिरदेखील आहे. ‘इस्कॉन’चे संस्थापक प. पू. भक्तिवेदांत श्री प्रभुपाद यांची प्रतिमा येथे प्रतिष्ठापित आहे. मुख्य सभागृहाच्या छतावर मोठमोठी शिल्पे; तर बाहेरील भिंतींवर पौराणिक कथांवर आधारलेली भित्तीचित्रे आहेत. त्यात कृष्णलीलांवर आधारलेल्या दृश्यांचा समावेश आहे. मंदिराचा घुमट कमळाच्या आकाराचा आहे आणि त्यावर राधा व कृष्णाच्या सुंदर प्रतिमा आहेत.
मंदिरात रोज संध्याकाळी ढोल व इतर वाद्यांच्या साथीने नामसंकीर्तन आणि भजन केले जाते. जन्माष्टमी, रामनवमी, गोवर्धन पूजा, शरद पौर्णिमा, होळी, विजयादशमी येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवांमध्ये भाविक हजारोंच्या संख्येने सहभागी होतात.
मंदिरात रोज भगवद्गीता आणि श्रीमद्भागवताचे अभ्यास वर्ग घेण्यात येतात. मंदिरात येणाऱ्यांना मनःशांतीसाठी १० मिनिटांचा ध्यान योग शिकवला जातो. विद्यार्थ्यांचे आध्यात्मिक समुपदेशनही येथे केले जाते. त्यामध्ये जीवनाचा उद्देश आणि प्रगतीचा मार्ग याविषयी चर्चा करून मार्गदर्शन केले जाते. तरुणांसाठी व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यावसायिकांसाठी तणाव व्यवस्थापन, नेतृत्व, कौशल्यविकास आदींची प्रशिक्षण शिबिरेही नियमितपणे घेतली जातात. त्याचप्रमाणे धर्माबाबत विविध प्रश्नमंजुषा कार्यक्रमांचेही आयोजन येथे केले जाते. या कार्यक्रमांसाठी मंदिरात सर्व सुविधांनी युक्त असे सभागृह आहे. त्यामुळे हे मंदिर आध्यात्मिकतेसह वैयक्तिक व सामाजिक विकासाचे केंद्रही बनले आहे. येथे आध्यात्मिक पुस्तकविक्रीचे दालन आहे. वेद, उपनिषद आणि इतर आध्यात्मिक ग्रंथांवर आधारलेली शेकडो पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
मंदिरात दररोज प्रसाद म्हणून खिचडी दिली जाते. ‘इस्कॉन’तर्फे येथे शाकाहारी पदार्थांचे गोविंदा रेस्टॉरंटही सुरू आहे. मंदिरात सकाळी ८ वाजता दर्शन आरती होते. दुपारी १२ ते १ या वेळेत राजभोग दर्शन असते. सोमवार ते शुक्रवारी व रविवारी सकाळी ४.३० ते ५, सकाळी ७.३० ते दुपारी १.३० आणि सायंकाळी ४.३० ते रात्री ८.४५ या वेळेत भाविकांना देवदर्शन करता येते. शनिवारी हीच वेळ सकाळी ४.३० ते ५, सकाळी ७.३० ते रात्री ८.४५ पर्यंत आहे.