इंदाई देवी मंदिर

इंदवे, ता. साक्री, जि. धुळे 

इंदाई देवी ही एक स्थानिक देवी असली तरी ते यमाई देवीचे एक रूप समजले जाते. राज्यातील अनेक घराण्यांची कुलदेवता असलेली आदिशक्ती यमाई देवी हिचे मूळपीठ सातारा जिल्ह्यातील औंध गावात आहे. शिवशक्तिस्वरूपिणी यमाई देवी म्हणजे शिव आणि पार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप, अशी मान्यता आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये यमाई देवीची विविध रूपातील अनेक मंदिरे आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचे प्रसिद्ध स्थान इंदवे येथे आहे. देवीच्या नावावरून या गावाला इंदवे हे नाव पडल्याचे सांगितले जाते

मंदिराची अख्यायिका अशी की शेकडो वर्षांपूर्वी या ठिकाणी वीज पडून इंदाई देवीची मूर्ती प्रकट झाली देवीच्या पायाखालून गरम पाण्याचे झरे वाहू लागले. त्यांनतर राष्ट्रकूट राजघराण्याने या ठिकाणी खोदकाम करून कुंड बांधले. येथील गरम पाण्याच्या कुंडाशेजारी असलेल्या तलावाचे खोदकाम यादव राजा सिंगनदेव याने बाराव्या शतकात केल्याचे सांगितले जाते. पूर्वी कपड्यात तांदूळ बांधून येथील गरम पाण्याच्या कुंडात ठेवले असता ते लगेच शिजत असत. आजही या कुंडातील पाण्याने अंघोळ केली असता अनेक आजार बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

इंदवे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी इंदाई देवीचे हे मंदिर आहे. आवारभिंतीत असलेल्या स्वागत कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रशस्त प्रांगणात पेव्हरब्लॉकची फरसबंदी केलेली असल्यामुळे हा परिसर स्वच्छ सुंदर भासतो. मंदिराशेजारी लोखंडी स्तंभांवर गजपृष्ठ आकाराचे छत असलेला मंडप आहे. या मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एक वर खाली असे दुहेरी छत असलेले यज्ञकुंड आहे. याशिवाय सभामंडपातही मध्यभागी यज्ञकुंड कासवमूर्ती आहे. भाविकांच्या सुविधेसाठी सभामंडपात दर्शनरांगेची व्यवस्था केलेली आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रकाश हवा येण्यासाठी खिडक्यांची व्यवस्था आहे. सभामंडपातील भिंतींवर विविध देवता संतांची चित्रे रेखाटलेली आहेत आणि छताकडील बाजूला उठाव शैलीतील चक्राकार नक्षीकाम केलेले आहे

गर्भगृहात मध्यभागी वज्रपिठावर इंदाई देवीची चतुर्भुज मूर्ती आहे. महिषासुरमर्दिनी रूपातील ही देवी वाघावर बसलेली आहे. देवीच्या एका हातात खड्ग, दुसऱ्या हातात त्रिशूल, तिसऱ्या हातात अमृत कलश चौथ्या हातात असूर धरलेला आहे. देवीच्या दोन्ही बाजूस देवीच्या शक्ती, रिद्धीसिद्धी देवींच्या मूर्ती आहेत आणि त्यांच्या हातातही खड्ग ढाल आहेत. तिन्ही देवींच्या मूर्ती उंची वस्त्रे अलंकार ल्यालेल्या आहेत. देवींच्या डोक्यावर मुकुट त्यावर छत्र आहेत. मूर्तीच्या मागे चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे. त्यावर मयूर पानाफुलांची नक्षी आहे. गर्भगृहातील तिन्ही बाजूंच्या भिंतीलगत गणपती, शैलपुत्री, चंद्रघंटा, कुष्मांडा, कात्यायनी, महाकाली, विष्णू, श्रीकृष्ण, महादेव आदी देवतांच्या प्राचीन मूर्ती आहेत. या मूर्ती मंदिराच्या प्रांगणात असलेल्या मोठ्या कुंडात सापडल्याचे सांगितले जाते

मंदिराच्या छतावर कठडा गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर आहे. शिखराच्या चारही भिंतींवर मयुरपंख नक्षी आहे. शीर्षभागी पंचकुंभी कळस ध्वज पताका आहेत. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या गरम पाण्याच्या चौकोनी कुंडात उतरण्यासाठी दोन बाजूने पायऱ्या उर्वरीत दोन बाजूला सुरक्षा कठडे आहेत. जिल्ह्यातील हे एकमेव गरम पाण्याचे कुंड आहे.

येथून पुढे महादेवाचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले प्राचीन मंदिर आहे. शिवमंदिराच्या पडझड झालेल्या सभामंडपात काही नक्षीदार स्तंभ काही स्तंभांच्या पायाचे दगड मंदिराच्या प्राचीन वैभवाची साक्ष देत उभे आहेत. छत विरहित सभामंडपाच्या जमिनीवर मध्यभागी यज्ञकुंड आहे. गर्भगृहात वज्रपिठावर नंदी त्याच्या समोर शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग जलधार धरलेले अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. भिंतीत असलेल्या हस्तावर पंचमुखी गणेशाची शेंदूर चर्चित मूर्ती आहे. या मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर, त्यावर आमलक कळस आहे. प्रांगणात अनेक प्राचीन वीरगळ आहेत

मंदिरात चैत्र शारदीय नवरात्री हे मुख्य वार्षिक उत्सव साजरे होतात. चैत्र जत्रोत्सवानिमित्त होणाऱ्या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येथे येतात. वार्षिक उत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जागृत इंदाई देवी नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावून येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे

उपयुक्त माहिती

  • साक्रीपासून ३४ किमीतर धुळे येथून ६७ किमी अंतरावर
  • नंदूरबार, साक्री दोंडाईचा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : दिनकरराव पाटील, अध्यक्ष, मो. ९७६४७०९९२०
Back To Home