नाशिक शहरापासून जवळच असलेल्या उपनगर भागात इच्छामणी गणेश मंदिर आहे. मनातली इच्छा पूर्ण करणारा व नवसाला पावणारा अशी या गणेशाची ख्याती आहे.
शिक्षक असणारे चंद्रकांत जोशी ऊर्फ दादा महाराज जोशी यांनी विविध ठिकाणी २१ गणेश मंदिरे बांधण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, नाशिक आणि मध्य प्रदेशातील भोपाळ या सहा ठिकाणी गणपती मंदिरे बांधली. त्यातील नाशिक येथील `इच्छमणी गणेश मंदिर’ हे एक आहे. मंदिराची स्थापना हिंदू नववर्ष सुरू होणाऱ्या दिवसापासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १९८६ मध्ये झाली. या मूर्तीची प्रतिष्ठापना दादा महाराज जोशी यांच्या हस्ते करण्यात आली. २००७ मध्ये मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले.
हे मंदिर अलीकडच्या काळात बांधण्यात आले असल्याने त्यात विटा व सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. या मंदिराचा मनोरा अतिशय उंच असून त्यावर मंदिराचा कळस आहे. सुबक नक्षीकामामुळे मंदिराचे सौंदर्य खुलते. मंदिराच्या आवारात उद्यान आहे. उद्यानाच्या पुढे आल्यावर प्रशस्त सभामंडप पाहायला मिळतो. गर्भगृहात गणेशाची सुंदर संगमरवरी मूर्ती आहे. गणेशाच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत. या तीनही मूर्तींवर चांदीची छत्री बसविण्यात आली आहे.
या मंदिरात अनेकदा भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होतात. विनायकी व संकष्टी चतुर्थीला ५१ वेळा अथर्वशीर्ष पठण केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवसापासून नामसप्ताह आयोजित केला जातो. येथे गणेशजन्म सोहळा साजरा केला जातो. या दिवशी १०१ जोडप्यांच्या हस्ते गणेश याग करण्यात येतो. यावेळी मंदिरावर विद्युत रोषणाई, तसेच फुलांची सजावट करण्यात येते. सणासुदीच्या दिवसांत भागवत कथा, रामायण, महाभारतावरील प्रवचनांचे आयोजन केले जाते. आतापर्यंत बाबामहाराज सातारकर, सद्गुरू वामनराव पै, शंकर महाराज अभ्यंकर आदी दिग्गजांची कीर्तने, प्रवचने या मंदिरात झाली आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच मंदिर संस्थांनकडून वर्षातून दोन वेळा रक्तदान शिबिर, दिवाळीमध्ये फराळ वाटप असे सामाजिक उपक्रमही राबवले जातात. दररोज सकाळी व संध्याकाळी आरती होते. सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत या मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेता येते. अनेक भाविक येथे गणेशाला दररोज अभिषेक करण्यासाठी येतात. मंदिर परिसरातील उद्यानात लहान मुलांसाठी अनेक खेळणी ठेवण्यात आली आहेत. परिसरात पूजेचे साहित्य व प्रसाद विक्रीची दुकाने आहेत. मनातील इच्छा देवाला बोलून दाखवल्यावर ती पूर्ण झाल्याचा प्रत्यय आल्याचे अनेक भाविकांकडून सांगण्यात येते.