मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील चांदवड हे शहर रेणुका मातेच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. या रेणुका मातेच्या मंदिरापासून काही अंतरावर वडबारे या निसर्गसमृद्ध गावात व डोंगराच्या कुशीत इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. गणेशाची येथील मूर्ती स्वयंभू असून हा गणेश भाविकांची इच्छापूर्ती करतो, अशी गणेश भक्तांची श्रद्धा आहे.
ऐतिहासिक संदर्भांनुसार, पूर्वी हा गणपती ‘वडबारे गावचा गणपती’ म्हणून ओळखला जायचा. गावाबाहेरील डोंगराच्या पायथ्याशी हे पुरातन मंदिर होते. कालौघात त्याची पडझड झाल्यामुळे तेथील शेंदूरचर्चित गणेशाची मूर्तीही मातीखाली गेली होती. चांदवड येथील डॉ. साळगांवकर रुग्णांवर उपचार करण्यासाठी परिसरातील अनेक गावांमध्ये जात असत. १९७२ मध्ये वडबारे येथे डोंगर वाटेने जात असताना एका चिंचेच्या झाडाखाली ते विसाव्यासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांना अर्धवट जमिनीबाहेर आलेल्या दगडातून गणेशमूर्तीचा भास झाला. त्यांनी तेथील माती बाजुला केली असता ती शेंदूरचर्चित गणेशाची मूर्ती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. डॉ. साळगावकर हे गणेशभक्त होते. त्यांनी याबाबत वडबारे ग्रामस्थांना कल्पना दिली असता येथे गणेशाचे स्थान निर्माण करायचे, असे सर्वानुमते ठरले. या मूर्तीसाठी आसन करून तेथेच त्यांनी पूजा-अर्चा सुरु केली. त्यानंतर ग्रामस्थांनी येथे सुंदर मंदिराचे निर्माण करून त्यात या मूर्तीची स्थापना केली. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ही गणेश मूर्ती १२०० वर्षे वा त्याहून प्राचीन असावी.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही वडबारे गावात हे गणेशाचे स्थान असल्याचा संदर्भ आढळतो. शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये सुरतेवर टाकलेल्या दुसऱ्या छाप्यानंतर मोहीम फत्ते करून ते परतीच्या मार्गावर असताना या भागातील साल्हेर बळकावण्यासाठी मोघलांनी वेढा घातला होता. हा वेढा मराठ्यांनी चतुराईने फोडला. एवढेच नव्हे तर अनेक मोघल अधिकाऱ्यांना मराठ्यांनी कैद केले. हे छत्रपती शिवाजी महाराजांना समजल्यावर या वीरांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी महाराजांनी सुरतेहून परत येताना हा मार्ग निवडला. सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकवस्तीपासून दूर असलेल्या डोंगराळ भागात म्हणजेच वडबारे येथे असलेल्या प्राचीन गणेश मंदिरात मुक्काम केला होता, असा ऐतिहासिक संदर्भ या स्थानाबाबत आढळतो.
मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड येथे असलेल्या रेणुका माता मंदिरापासून पायी दहा मिनिटांवर असलेले हे इच्छापूर्ती मंदिर नव्याने सुशोभित करण्यात आले आहे. महामार्गापासून जवळच असल्याने या मंदिरात दर्शनासाठी भाविकांचा कायमच राबता असतो. स्वच्छ, टापटीप आणि निसर्गरम्य परिसरात हे अद्ययावत मंदिर स्थित आहे. संगमरवरी दगड व ग्रेनाईटचा वापर करून मंदिराचे बांधकाम केल्यामुळे त्याचे रुप खुलून दिसते.
सभामंडप व त्यासमोर असलेल्या गाभाऱ्यातील मोठ्या चौथऱ्यावर गणेशाची मूर्ती स्थानापन्न आहे. सभामंडप प्रशस्त असून त्यात एक शुभ्र मुषकाची मूर्ती लाडू घेऊन उभी आहे. संपूर्ण गाभारा सोनेरी पत्र्यावर नक्षीकाम करून सजविलेला दिसतो. येथील गणेश मूर्ती ४ फुट उंच आणि ३ फुट रुंदीची आहे. मूर्तीच्या डाव्या हातांत लाडू व गदा तर उजव्या हातांपैकी एक हात मांडीवर सोडलेला आणि दुसऱ्या हातात परशु आहे.
गणेश मंदिरात मंगळवारी व संकष्टी चतुर्थीला हजारो भाविकांची गर्दी असते. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला श्रींचे अभिषेक केले जाते. अंगारिका चतुर्थीला या परिसराला जत्रेचे स्वरुप येते. यासाठी मंदिर प्रशासनाने मंदिरासमोर विकसित केलेल्या सुंदर उद्यानातून भाविकांना मंदिरात जाण्यासाठी व येण्यासाठी असे स्वतंत्र मार्ग तयार केले आहेत. गणेश जयंतीला मंदिरात मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा होतो. यावेळी श्रीगणेश अथर्वशीर्ष सहस्त्र आवर्तने होतात. या उत्सवासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. या गणेशाला पूर्वी नाव नव्हते. ‘बारीतील गणपती’ किंवा ‘वडबारे गावचा गणपती’ असे म्हटले जायचे. परंतु भाविकांना या जागृत स्थानाचे अनेक अनुभव आल्याने व अनेक भाविकांची या गणेशाच्या भक्तीने इच्छापूर्ती झाल्याने या स्थानाचे १९७१-७२ साली इच्छापूर्ती गणेश मंदिर, असे नामकरण करण्यात आले.
भाविकांच्या सोयीसाठी येथे भक्तनिवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय आलेल्या भाविकांना स्वच्छ पाणी, बसण्यासाठी उद्यान व त्यात लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य अशा सुविधा मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आल्या आहेत. सकाळी व सायंकाळी या मंदिरात गणेशाची आरती केली जाते. यावेळी ग्रामस्थांसोबत अनेक बाहेरील भक्तही उपस्थित असतात.