हिरामाता मंदिर

जामठी (बुद्रुक), ता. मूर्तीजापूर, जि. अकोला

भारतामध्ये आदिम लोकसमुहाच्या आदिधर्मातून अवतरलेल्या आणि कालांतराने उन्नयन होऊन उच्च धर्मात समाविष्ट झालेल्या अनेक लोकदेवता आहेत. ग्रामभागांतील कृषिप्रधान व निसर्गसंवादी जीवनाच्या भौतिक व भावनिक गरजांनुसार अवतरलेल्या या लोकदेवतांची विविध स्वरूपात आजही पूजा केली जाते. महाराष्ट्रातील अनेक लोकदेवतांपैकी स्त्रीदेवता या ग्रामदेवता वा कुलस्वामिनी म्हणून पूजल्या जातात. जामठी येथील हिरामाता ही देवता जामठीसोबतच अकोल्याची ग्रामदेवता मानली जाते. विदर्भातील अनेक कुटुंबांची आराध्यदेवता असलेली हिरामाता ही आदिशक्तीचे रूप असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
जामठी या गावाची ओळख आज या हिरामातेच्या मंदिरामुळे आहे. येथील निसर्गरम्य वातावरणात हिरामातेचे प्राचीन मंदिर वसलेले आहे. लोकधारणेनुसार येथील देवीचे ठाणे जागृत आहे. याबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीमध्ये ही देवी अनघड तांदळ्याच्या स्वरूपात प्रकट झाली. तिच्या या प्राकट्यकथेवरून ही देवी मुळात देवीउपासनेच्या तांत्रिक संप्रदायाशी संबंधित असल्याचा जाणकारांचा कयास आहे. असे सांगण्यात येते की येथील मंदिरातील देवी दिवसातून तीन वेळा आपले रूप बदलते. सकाळी ती बालिका स्वरूपात असते. दुपारी ती तरुणीच्या रूपात, तर रात्री वृद्धेच्या स्वरूपात दिसते. या देवीने यापूर्वी अनेकांना दृष्टांत, तसेच दर्शनही दिल्याच्या कथा या परिसरात सांगण्यात येतात.
हिरामातेच्या येथील मंदिराविषयीचा ठोस इतिहास अज्ञात आहे. परंतु वेगवेगळ्या कालखंडात या मंदिराचे जीर्णोद्धार होऊन त्यास सध्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते. जामठी बु. या गावाच्या वेशीवर एका टेकडीवजा जागेत हे मंदिर स्थित आहे. रस्त्यापासून २५ ते ३० पायऱ्या चढून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणातील फरसबंदी व मंदिर परिसरातील वृक्षराजीमुळे हा परिसर स्वच्छ, सुंदर व आल्हाददायक भासतो. मंदिराच्या रस्त्याकडील बाजूला दोन दीपस्तंभ आहेत. उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराची सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी संरचना आहे. सभामंडप व अंतराळात पूर्वेकडे असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश करता येतो. सभामंडपाचे प्रवेशद्वार दगडी बांधणीचे व कमानीकृती आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभशाखा व त्यांमध्ये दीपकोष्टके आहेत. द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. अंतराळाच्या कमानीकृती द्वारशाखांवरही नक्षीकाम व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे.
या मंदिराच्या काहीशा लहान असलेल्या सभामंडपात भलेमोठे दगडी स्तंभ आहेत व हे सर्व स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात हवनकुंड व देवीचे वाहन असलेल्या सिंहाच्या दोन मूर्ती आहेत. सभामंडप व अंतराळामध्ये सुमारे पाच फूट रुंदीची एक मोठी दगडी भिंत आहे. या भिंतीतील चिंचोळ्या मार्गातून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात गर्भगृहापुढे मोठी स्टेनलेस स्टिलची जाळी लावलेली आहे. येथून भाविकांना गर्भगृहातील हिरामाता देवीच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहात एका मोठ्या वज्रपिठावरील मखरात देवीची तांदळा स्वरूपातील स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्तीचे डोळे व भूवया चांदीच्या आहेत.
या मंदिराच्या अंतराळ व गर्भगृहाच्या भिंती या बाह्यबाजूने शिल्पांकित आहेत. त्यावर सामान्य नागरिकांपासून ते सैनिक व देवदेवतांच्या शिल्पांचा समावेश आहे. मंदिराच्या छतावर बाशिंगी कठडा व त्यावर घुमटाकार मुख्य शिखर आहे. शिखराच्या अग्रभागी दोन आमलक व कळस आहेत. या शिखराच्या चारही बाजूंनी लहान लहान नक्षीदार शिखरे आहेत. मंदिर परिसरात हनुमान व शंकराची स्थाने आहेत.
येथील हिरामाता ही नवसाला पावणारी व हाकेला धावून येणारी आहे, अशी तिच्या भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे अकोला, अमरावती, वाशिम जिह्याच्या विविध भागांतील शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. चैत्रातील व शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजलेला असतो. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान अष्टमीच्या दिवशी येथे मोठा होम केला जातो. याशिवाय हनुमान जयंतीचा उत्सवही येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावेळी या परिसरास जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. या दिवशी भाविकांना महाप्रसादाचेही वाटप केले जाते.

उपयुक्त माहिती

  • मूर्तीजापूर येथून २० किमी अंतरावर
  • मूर्तीजापूर येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home