पार्वतीचे एक रुप असलेली हिंगुलांबिका देवी ही हिंगुळजा व हिंगळा देवी म्हणून प्रसिद्ध आहे. महादेवाचा अपमान सहन न झाल्याने सतीने दक्षाच्या यज्ञकुंडात आहुती दिली. तेव्हा महादेवाने सतीचे पार्थिव खांद्यावर घेऊन तांडव केले. विष्णूच्या सुदर्शन चक्राने सतीच्या मृतदेहाचे ५१ तुकडे होऊन पृथ्वीवर विविध ठिकाणी पडले व त्या ठिकाणी शक्तिपिठे निर्माण झाली. देवीचे कुंकू लावलेले कपाळ ज्या ठिकाणी पडले ते हिंगुळजा देवी प्रमुख शक्तीपीठ पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात हिंगुळजा नदीच्या तीरावर आहे. या देवीची भारतात अनेक उपपिठे आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध मंदिर सोलापूर शहरातील गणेशपेठेत आहे.
हिंगुळजा वा हिंगुलांबिका ही भावसार समाजाची कुलदेवता आहे. हे मंदिर भावसार समाजाने तीनशे वर्षांपूर्वी बांधल्याचे सांगितले जाते. पूर्वी मंदिरात देवीच्या पितळी मूर्तीची पूजा केली जात असे. १८८९ साली पंढरपूर येथून काळ्या पाषाणातील मूर्ती घडवून तिची मंदिरात स्थापना केली गेली. पुढे ही प्राचीन मूर्ती झिजल्याने १२ जून २०२३ रोजी नव्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली व जुनी मूर्ती धुळे येथील शासकीय मूर्ती संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.
देवीची अख्यायिका अशी की परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा निःक्षत्रीय केली तेव्हा पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील हिंगुळजा देवी मंदिरात भाव व सार नावाचे दोन क्षत्रीय राजे आपल्या कुटुंबकबिल्यासह लपून बसल्याचे परशुरामांस समजले. परशुरामाने मंदिरात प्रवेश करून त्या राजांचा वध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हिंगुळजा देवी प्रकट झाली व परशुरामाला तसे न करण्यास सांगितले. परंतु आपण पृथ्वी निःक्षत्रीय करण्याची शपथ घेतली असल्याने कुणाही क्षत्रियाला जिवंत सोडणार नसल्याचे परशुरामांनी देवीला सांगितले. तेव्हा भाव व सार राजांनी आपली शस्त्रे टाकून दिली असल्याने ते क्षत्रिय राहिले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्राण हरण करू नये, असे देवीने परशुरामास सांगितले. देवीचा तर्क मान्य करून परशुरामाने भाव व सार राजांना त्यांच्या कुटुंबासह सोडून दिले. तेव्हापासून आपल्या कुळाचे रक्षण करणाऱ्या हिंगुळजा देवीला भावसार समाजाने आपली कुलदेवता मानली.
हे मंदिर शहरातील गणेशपेठ या गजबजलेल्या परिसरात रस्त्यालगत आहे. मंदिरासमोर फरशी आच्छादित प्रांगण आहे. प्रांगणात मंदिरासमोर चौथरा व चौथऱ्यावर दीपमाळा आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल शिल्पे व वर उभ्या धारेच्या नक्षी आहेत. ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती, प्रवेशद्वाराच्या वर महिरपी तोरण, मंडारकास चंद्रशिळा व कीर्तीमुख आहे.
बंदिस्त सभामंडपात प्रकाश व हवा येण्यासाठी खाली व वर अशा वातायनांच्या दोन रांगा आहेत. उजव्या व डाव्या बाजूच्या भिंतींत आणखी दोन दरवाजे आहेत. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मुख्य प्रवेशद्वारासमोर चौथऱ्यावर सिंह शिल्प व मध्यभागी जमिनीवर यज्ञकुंड आहे. सभामंडपात अंतराळाच्या दोन्ही बाजूला दोन मेघडंबरी आहेत. त्यापैकी डाव्या बाजूच्या मेघडंबरीत गणपती व उजव्या बाजूच्या मेघडंबरीत शिवपिंडी आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारास आडव्या रांगेत सहा गोलाकार स्तंभ आहेत. हे सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वारावरील स्तंभ व कमानी धातू अच्छादीत आहेत. त्यांवर विविध प्रकारची नक्षी व सिंहशिल्पे आहेत. अंतराळाच्या भिंतीवरील सज्जावर विविध देवीदेवतांची शिल्पे आहेत. अंतराळात मध्यभागी गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंती सुवर्णधातू आच्छादित आहेत. त्यांवर विविध प्रकारचे नक्षीकाम आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर अष्टदुर्गा नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारावर मयूर तोरणात गजलक्ष्मीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारास चांदीच्या नक्षीदार झडपा व त्याखाली चांदीचे मंडोरक आहे.
गर्भगृहात वज्रपिठावरील नक्षीदार मखरात हिंगुलांबिका देवीची काळ्या पाषाणातील अष्टभुजा मूर्ती आहे. देवीच्या हातात ढाल, तलवार, गदा, त्रिशूल, भाला, डमरू आदी शस्त्रे व डाव्या हातात नरमुंड आहे. देवी दैत्याच्या देहावर उभी आहे. मूर्तीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट व अंगावर विविध अलंकार व वस्त्रे आहेत. मूर्तीच्या मागील सुवर्ण प्रभावळीत मध्यभागी किर्तीमुख व दोन्ही बाजूला पानाफुलांची तोरणनक्षी आहे. गर्भगृहात वज्रपिठासमोर देवीच्या धातूच्या दोन मूर्ती आहेत. गर्भगृहात उजेड व हवा येण्यासाठी गवाक्ष आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. सभामंडपाच्या छतावर प्रवेशद्वाराच्या वरील देवकोष्टकात महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. देवकोष्टकावर आडव्या रचनेचे शिखर व दोन्ही बाजूला दोन लघूशिखरे आहेत. गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर, शीर्षभागी स्तूपिका व स्तूपिकेवर कळस आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिंगुलांबिका देवी मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवी रथात बसून ग्रामप्रदक्षिणेला निघते. परिसरातील शेकडो भाविक या मिरवणुकीत सहभागी होतात. चैत्र नवरात्री व शारदीय नवरात्री उत्सवात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी देवीला खणा-नारळाची ओटी भरून साडी-चोळी व आभूषणे अर्पण केली जातात. प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस मंदिरात नवचंडी यज्ञाचे आयोजन केले जाते. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा व अमावस्या आदी दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते.