आदिशक्ती भगवतीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेले हिंगलाज देवीचे शक्तिपीठ पाकिस्तान व बलुचिस्तान सीमेवर आहे. असे सांगितले जाते की, एका भाविकाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवी तेथून नाशिकमधील निफाड तालुक्यातील खेडे या गावात आली. निफाडमधील हे मंदिर १३ व्या शतकातील आहे. हिंगलाज देवीची मूर्ती स्वयंभू असून हे जागृत स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की हिंगलाज मातेचे मूळ स्थान पाकिस्तान सीमेवरील हिंगला नदीकाठी हिंगला डोंगरावर आहे. तेथे देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक जात असत. त्यापैकीच एक होते डोंगरपुरी महाराज. डोंगरपुरी महाराज हिंगलाज देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी जात असत. तब्बल ९५ वर्षे डोंगरपुरी महाराजांनी देवीची पायी वारी केली. वार्धक्यामुळे आता पायी वारी करणे दिवसेंदिवस त्यांना कठीण वाटू लागले. त्यासाठी त्यांनी मनोमन ठरवले की, देवीला आपण आपल्या नगरात घेऊन जायचे. निश्चय पक्का करून त्यांनी देवीची आराधना सुरू केली. हिंगलाज देवीनेही प्रसन्न होऊन डोंगरपुरी महाराजांसोबत त्यांच्या गावी जाण्याची विनंती मान्य केली. डोंगरपुरी महाराजांनी वळून मागे न पाहण्याच्या अटीवर देवी त्यांच्यासोबत मार्गक्रमण करू लागली. त्र्यंबकेश्वर, नाशिक, पिंपळगाव मार्गे कारस गावी (सध्याचे खेडे हे गाव) आले तेव्हा तेथील विनता नदीला महापूर आला होता. आता पुढचा प्रवास कसा करायचा यासंदर्भात मातेचा विचार घ्यावा, या उद्देशाने डोंगरपुरी महाराज मागे वळले आणि तेव्हाच तेथे दिव्य प्रकाश पडून देवी मूर्तीच्या रूपात स्थित झाली. देवी येथून पुढे येणार नसेल तर आपणही पुढे जायचे नाही, हा विचार करून डोंगरपुरी महाराजांनी आता जेथे मंदिर आहे तेथेच शास्त्रोक्त पद्धतीने हिंगलाज मातेच्या या स्वयंभू मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर १२२८ मध्ये स्वतः डोंगरपुरी महाराजांनी दगडी चिऱ्यांच्या साह्याने देवीचे मंदिर बांधले.
असे सांगितले जाते की देवीची काही वर्षे सेवा केल्यानंतर डोंगरपुरी महाराजांनीही या मंदिरासमोर संजीवन समाधी घेतली. समाधी स्थानाची रचनाही काळ्या चिरेबंदी दगडात हेमाडपंथी स्वरूपाची आहे. हिंगलाज देवीला स्नान घातल्यानंतर ते तीर्थ डोंगरपुरी महाराजांच्या समाधी स्थानावर जाईल, अशी रचना या मंदिरात करण्यात आली होती.
प्रशस्त परिसरात असलेले हिंगलाज माता मंदिर मोठे असले तरी साधे आहे. मुख्य मार्गाला लागून असलेल्या या मंदिर परिसरात सर्वत्र पेव्हर ब्लॉक लावल्यामुळे हा परिसर स्वच्छ व सुंदर भासतो. मंदिरासमोर दीपमाळ आहे. सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. गर्भगृहात देवीची मूर्ती कुमारिका स्वरूपात काळ्या पाषाणाची आहे. मातेच्या कपाळावर ज्योतिर्लिंग स्वरूपात तिसरा डोळा आहे. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ असा मातेचा शृंगार केला जातो. मूर्तीला चार भुजा असून त्यातील तीन हातांमध्ये आयुधे, तर एक हात आशीर्वाद देत आहे.
चैत्र नवरात्र, श्रावण शुद्ध चतुर्दशी, आश्विन नवरात्र आणि पौष पौर्णिमा हे चार उत्सव येथे साजरे होतात. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या बुधवारी येथे देवीची भव्य जत्रा असते. त्यावेळी मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. नवरात्रोत्सवाच्या काळात शेकडो स्त्री-पुरुष मंदिरात घटी बसतात. असे सांगितले जाते की वर्षभरात साधारणतः ४ ते ५ लाख भाविक देवीच्या दर्शनाला येतात. राज्य शासनाने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा दिला आहे.
ही देवी परिसरातील दशनाम गोसावी, तेली, साळी, फुलमाळी, कुंभार, ब्रह्मक्षत्रिय (ठाकूर), कोकणस्थ ब्राह्मण, काही मराठा समाज, बेलदार, भावसाल (रंगारी), सिंधी, धनगर, रावल, पटेलीया, कुमावत, वंजारी, न्हावी, गुजराती, पांडव, कहार या समाजाची कुलस्वामिनी आहे. या मंदिरात गणेशादियाग, नवचंडी, महारुद्र, लघुरुद्र, नारायण नागबळी, कालसर्प शांती व देवी मातेचे कुलधर्म कुलाचार अशा विविध विधी व पूजा केल्या जातात.