हटकेश्वर मंदिर

हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली

वसमत तालुक्यातील हट्टा गावी वसलेले श्री हटकेश्वर मंदिर हा मराठवाड्याचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठेवा समजला जातो. सुमारे ४०० ते ५०० वर्षांची प्राचीन परंपरा लाभलेले हे मंदिर ‘सुवर्णलिंगाचा देव’ म्हणून ओळखले जाते. ‘हाटक’ म्हणजे सोने; स्कंद पुराणातील कथेनुसार साक्षात ब्रह्मदेवाने ज्याची सुवर्ण रूपात स्थापना केली, असे हे हटकेश्वर रूप भक्तांच्या हाकेला धावून जाणारे जागृत दैवत मानले जाते. छत्तीसगड आणि गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातील हटकेश्वराचे हे स्थान दुर्मिळ मानले जाते.

संस्कृतमध्ये ‘हाटक’ या शब्दाचा अर्थ सोने किंवा सुवर्ण असा होतो. हटकेश्वर म्हणजे ‘सुवर्ण लिंगाचा देव’. स्कंद पुराणातील नागर खंडात हटकेश्वराची कथा आहे, ती अशी की एकदा महादेव दारुकावनात नग्न अवस्थेत (दिगंबर रूपात) भिक्षाटन करत होते. त्यांच्या तेजस्वी आणि मोहक रूपाला पाहून ऋषीपत्नी त्यांच्याकडे आकर्षित झाल्या. हे पाहून तेथील ऋषींना क्रोध अनावर झाला आणि त्यांनी शिवाला शाप दिला की ज्या लिंगामुळे (सौंदर्यामुळे) हा मोह निर्माण झाला आहे, ते लिंग गळून पडेल. ऋषींच्या शापामुळे शिवाचे लिंग पृथ्वीवर पडले आणि ते पाताळात खोलवर रुतले. यामुळे तिन्ही लोकांत हाहाकार माजला. शेवटी ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी शिवाची प्रार्थना केली. शिवाने सांगितले की जोपर्यंत या लिंगाची पूजा होत नाही, तोपर्यंत ते शांत होणार नाही. ब्रह्मदेवाने त्या लिंगाची सुवर्ण (सोने) रूपात स्थापना केली आणि त्याची पूजा केली. सोन्याचे (हाटकाचे) लिंग म्हणून ते ‘हटकेश्वर’ या नावाने प्रसिद्ध झाले.

हे मंदिर सुमारे चारशे ते पाचशे वर्षे प्राचीन आहे. अलीकडील काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या भागात आध्यात्मिक कार्य केलेल्या ओंकारनाथ महाराजांनी कार्ला, हट्टा, एरंडेश्वर, आरळ, त्रिधारा, अनसिंग, रांजणी या सात गावांतील प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. हटकेश्वराचे मंदिर त्यापैकीच एक होय. गावातून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. या कमानीच्या सज्जावर मध्यभागी पद्मफुलावर उभ्या वेणूवादक गोपाळकृष्णाची मूर्ती आहे. कृष्णाच्या डाव्या व उजव्या बाजूला दोन गोमाता शिल्पे आहेत. शीर्षभागी आडव्या ओळीत तीन आमलक व त्यावर कळस आहेत. मंदिरास सुमारे बारा फूट उंचीची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूस प्रत्येकी तीन गोलाकार स्तंभ आहेत. या स्तंभांवर वरील मजल्याचा सज्जा आहे. सज्जावर गोपाळकृष्णाची मूर्ती आहे. तसेच सज्जावरील शिखरावर चारही कोनांवर हंस शिल्पे आहेत. प्रांगणात तटबंदीला लागून ओवऱ्या, धर्मशाळा, अन्नछत्र, स्वयंपाकघर, सेवेकऱ्यांची निवासस्थाने व रथकक्ष आहे. रथकक्षात उत्सवकाळात वापरला जाणारा रथ आहे. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेशद्वाराला लागून तटबंदीवर जाण्यासाठी जिना आहे. महादेव मंदिराच्या डाव्या बाजूला प्रांगणात चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावनात चार दिशांना चार गजराज व त्यांच्या पाठीवर बसलेल्या माहुतांची शिल्पे आहेत. हे तुळशी कुंड चार गजराजांच्या उंचावलेल्या सोंडेवर तोलले आहे.

प्रांगणात महादेव मंदिरासमोर सिंहकमान आहे. सिंहकमानीत स्तंभपादावर उभे असलेले दोन गोलाकार स्तंभ महिरपी तोरणाने जोडलेले आहेत. या स्तंभांवरील सज्जावर सिंह शिल्प आहे. सिंहकमानीपुढे मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चौथऱ्यावर चार गोलाकार स्तंभांवर छत असलेले नंदीमंडप आहे. नंदीमंडपातील चारही स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत. स्तंभांवर गोलाकार शिखर आहे. या शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे. नंदीमंडपात चौथऱ्यावर नंदीची पाषाण मूर्ती आहे.

दुमजली सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी हटकेश्वर मंदिराची रचना आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार प्रांगणापेक्षा काहीसे उंचावर आहे. प्रवेशद्वारात द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे. तसेच ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या वर बाह्य बाजूला वरील मजल्याचा सज्जा आहे. सज्जावर बारा लाकडी स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत. सभामंडपाच्या आतील सज्जातून बाह्य बाजूच्या सज्जात येण्याकरिता प्रवेशद्वार आहे. सभामंडपास उजव्या व डाव्या बाजूच्या भिंतीत आणखी दोन दरवाजे आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात प्रत्येकी पाच चौकोनी लाकडी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर सज्जा आहे. या सज्जावर जाण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ जिना आहे.

पुढे सुमारे पाच फूट खोल अंतराळ आहे. सभामंडपात अंतराळाच्या बाजूने स्टेनलेस स्टीलचा कठडा आहे. कठड्याजवळ मेजावर हटकेश्वर महादेवाचा पितळी मुखवटा आहे. गर्दीच्या वेळी भाविकांना येथूनच देवाचे दर्शन घ्यावे लागते. सभामंडपापेक्षा खोल असलेल्या अंतराळात उतरण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी पाच पायऱ्या आहेत. गर्भगृह अंतराळापेक्षा खोल आहे. तिथे खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. गर्भगृहाच्या छतावर सहा थरांचे षटकोनी शिखर आहे. शिखराच्या खालील पाच थरात प्रत्येकी सहा रिकामी देवकोष्ठके आहेत. शिखरावर शीर्षभागी आमलक आहे. या आमलकावर कळस व ध्वजपताका आहे.

महादेव मंदिराच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. गर्भगृहात वज्रपीठावर वीर मारुतीची मूर्ती आहे. हनुमान मंदिराच्या बाजूला वैष्णोदेवी मंदिर आहे. अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप व गर्भगृह असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर यज्ञकुंड आहे. गर्भगृहात वज्रपीठावर वैष्णोदेवीची द्विभुज मूर्ती आहे.

या मंदिराशेजारी ओंकारनाथ महाराजांची गादी असलेला कक्ष आहे. येथे गादीवर ओंकारनाथ महाराजांची पितळी मूर्ती आहे. याच वास्तूत ओंकारनाथ अनेक वर्षे वास्तव्यास होते, असे सांगितले जाते. बाजूलाच ओंकारनाथ महाराज समाधी मंदिर आहे. त्यात ओंकारनाथांची ध्यानस्थ मूर्ती आहे. मूर्तीसमोर जमिनीवर शिवपिंडी आहे.

महाशिवरात्री व हनुमान जयंती हे येथील मुख्य वार्षिक उत्सव आहेत. हनुमान जयंतीचा उत्सव चैत्र पौर्णिमा ते कृष्ण द्वादशी असा सलग बारा दिवस चालतो. मंदिरात शारदीय नवरात्रौत्सव, आषाढी व कार्तिकी एकादशी, चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, श्रावण व मार्गशीर्ष मास, आदी सण व उत्सव साजरे केले जातात. उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवांच्या वेळी राज्यभरातून व परराज्यातून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.

उपयुक्त माहिती:

  • वसमत येथून २८ किमी अंतरावर
  • हिंगोली येथून ५३ किमी अंतरावर
  • वसमत येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही

हाटकेश्वर मंदिर

हट्टा, ताल. वासमत, जिला. हिंगोली

Back To Home