हरिहरेश्वर मंदिर

पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा, जि. जळगाव

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पिंपळगाव हरेश्वर येथे हरिहरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. तेराव्या शतकात हेमाडपंती शैलीत बांधलेल्या या मंदिराच्या परिसरात भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून भस्मासुराचा अंत केल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. त्याचे प्रतीक म्हणून येथेभस्मासुराची शिळाआहे. शिव तसेच विष्णूंनी येथे गळाभेट घेतल्याचीही आख्यायिका आहे. मंदिरातील पिंडीच्या वरच्या बाजूस असलेली दगडी रेघ ही या भेटीची निशाणी आहे. या दोघांच्या भेटीमुळे या ठिकाणास हरिहरेश्वर असे नाव पडल्याचे बोलले जाते.

भस्मासुराच्या वधाबाबतची पुराणकथा अशी की पूर्वी या परिसरात शंकराचे वास्तव्य होते. पूजेसाठी चितेतील ताजे भस्म मिळावे, यासाठी त्यांनी एका बालकाची नियुक्ती केली होती. एके दिवशी ताजे भस्म मिळाल्याने हा बालक चितेतील निखारे घेऊन आला. त्यामुळे त्याचे हातही पोळले. त्याच्या एकनिष्ठतेवर शंकर प्रसन्न झाले. ‘यापुढे तुला भस्म शोधण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. तू ज्यावर हात ठेवशील त्याचे भस्म होईल,’ असा वर त्यांनी या बालकाला दिला. या वराचा दुरुपयोग करण्याचेही त्यांनी बजावले. मात्र काही दिवसांनी या बालकाला आपल्या शक्तीचा गर्व चढल्याने तो माणसांच्याही डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करू लागला. त्याच्यातील असुरी शक्ती जाग्या झाल्याने त्यालाभस्मासुरम्हणून ओळखले जाऊ लागले.

एके दिवशी तो शंकरालाच भस्म करण्यासाठी त्यांच्या मागे लागला. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी शंकरांनी कैलासावरून पलायन केले. पाचोरानजीकच्या पाताळेश्वर परिसरात शंकर आणि भस्मासुराची नजरानजर झाली. त्यानंतर शंकर रुद्रेश्वर येथे गेले. त्यांच्या मागावर असलेला भस्मासुरही तेथे गेला. त्याच्यापासून बचाव करत असताना शंकरांनी बहुळा डुबा या नद्यांच्या संगमावर विश्रांती घेतली. मात्र पाठलाग करत असलेला भस्मासुर येथेही येऊन पोचला. त्यावेळी विष्णूंनी मोहिनी रूप धारण करत भस्मासुराला रोखून धरले. त्यादरम्यान शंकर बहुळा नदीच्या काठाने थेट अजिंठा डोंगररांगेतील तिच्या उगमापर्यंत पोचले. भस्मासुर आपला पाठलाग करत आहे का, हे पाहण्यासाठी त्यांनी येथे मुरडून पाहिले. त्यामुळे या स्थानाला मुर्डेश्वर असे नाव पडले.

शिवशंकरांनी मागे वळून पाहिले असता, मोहिनी भस्मासुराला आपल्या पाशात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांना दिसले. मोहिनीच्या रूपावर भाळून भस्मासुराने तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यावरत्यासाठी तुला माझ्यासोबत मी करेन तसे नृत्य करावे लागेल’, असे मोहिनीने सांगितले. भस्मासुराने तिचा प्रस्ताव मान्य केला. नृत्य करता करता मोहिनीने आपला हात डोक्यावर ठेवला. तो नृत्याचाच भाग असल्याचे समजून भस्मासुरानेही आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि शंकराने दिलेल्या वरदानानुसार तो स्वतःच भस्म झाला. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भस्मासुराचा अंत झाल्याचे बोलले जाते. भस्मासुराचा अंत झाल्यानंतर विष्णूंनी मूळ रूप धारण केले. त्यावेळी येथे शंकर विष्णू यांची गळाभेट झाली. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजुला भस्मासुराचे प्रतीक असलेली शिळा आहे.

बहुळा आणि डुबा या नद्यांच्या संगमावर वसलेले हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीतील आहे. मंदिराच्या उभारणीच्या कालखंडाबाबत अनेक मतमतांतरे आहेत. १२९७ मध्ये हे मंदिर उभारण्यात आल्याचे वर्णन हेन्री कझिन्स (Henry Cousens) यांनी आपल्या लिखाणात केलेले आहे. हेन्री हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतीय पुरातत्त्व विभागात कार्य करणारे एक ब्रिटिश शास्त्रज्ञ होते. त्यात त्यांनी या मंदिराच्या स्थापत्यशैलीचे विवेचन केले आहे. या मंदिराबाहेरील पायऱ्या घाटाचा निर्मितीचा कालखंड शके १८४१ (. १९१९) असा आहे. असे सांगितले जाते की येथील दुसऱ्या पायरीवर असलेला पायरीलेख जगातील सर्वात लांबीचा शिलालेख आहे. या शिलालेखाची लांबी १५ मीटर इंच असून रुंदी इंच आहे. देवनागरी लिपीत मराठी भाषेत हा शिलालेख आहे. पायरीच्या अनेक दगडांवर कोरून हा शिलालेख एका रांगेत बसवला आहे.

मंदिराचा निसर्गरम्य परिसर शांत प्रसन्न आहे. बाहेरून हे मंदिर पाहिल्यास आयताकृती वाटते. येथील पायऱ्या चढून वर आल्यावर उजव्या बाजुला भस्मासुराचे प्रतीक असलेली शिळा आहे. सात फूट उंचीच्या या अखंड शिळेवर आसन घालून बसलेल्या अवस्थेतील एक आकृती कोरली आहे. जवळच आंब्याच्या झाडाच्या खोडाला लागून अजून एक शिळा आहे. भस्मासुराच्या शिळेपासून मंदिराचा बाह्य परकोट सुरू होतो. सुमारे २८ फूट उंचीच्या या परकोटाचे बांधकाम चारही बाजूंनी बंदिस्त आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नंदी आहे. प्रवेशद्वाराच्या मध्यभागी फुलांचे नक्षीकाम आहे. आत प्रवेश केल्यावर खुला मंडप लागतो.

या मंडपामध्ये उजवीकडे दगडी महिरपीत कोरलेल्या काही समाध्या आहेत. तेथेच शून्याचा शोध लावणारे थोर गणितज्ज्ञ भास्कराचार्य आणि आणि त्यांची कन्या लीलावती यांच्या समाध्या आहेत. असे सांगितले जाते की पाटणादेवी येथील भास्कराचार्यांनी येथे जप, तप साधना केली होती. त्यांची समाधी पाच बाय पाच फूट उंचीच्या चौथऱ्यावर असून त्यावर घुमटाकार शिखर बसवण्यात आला आहे. या समाधीच्या बाजूला असलेल्या नंदीमंडपात नंदीची पांढऱ्या रंगाची पाषाणमूर्ती आहे. नंदीच्या गळ्यातील घंटांची माळ पाठीवरून शेपटीपर्यंत गेली आहे. नंदीमंडपांच्या खांबांवर सुबक कोरीव काम आहे.

भास्कराचार्यांच्या समाधीच्या समोरच्या बाजूस गणपतीचे छोटे मंदिर आहे. त्यात गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. येथील सभामंडपात प्रवेश करत असताना लागणाऱ्या दोन दगडी स्तंभांवर कलश पाने कोरण्यात आलेली आहेत. सभामंडपात कासवमूर्ती अंतराळाजवळ दोन देवकोष्ठके आहेत. अंतराळात कलाकुसर केलले आठ दगडी खांब आहेत. त्यात उजव्या बाजूला गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर पानाफुलांचे नक्षीकाम आहे. पायथ्याशी यक्ष, किन्नर आणि गंधर्वांची शिल्पे आहेत. येथील गर्भगृह हे सभामंडपापासून सात ते आठ फूट खाली आहे. त्यामुळे येथे येण्यासाठी आठ पायऱ्या उतराव्या लागतात. या गर्भगृहाच्या मध्यभागी काळ्या पाषाणातील अखंड शिवपिंडी आहे. या शिवपिंडीच्या शाळुंकेवरील लिंगाचे दोन भाग स्पष्ट दिसतात. त्यापैकी अर्धा भाग विष्णूस्वरूप आणि अर्धा भाग शिवस्वरूप मानला जातो. विष्णूस्वरूप भागात तुळस तर शिवस्वरूप भागात बेल वाहिले जाते. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर प्रकाशयोजनेसाठी गवाक्ष बांधण्यात आलेले आहेत. या गवाक्षांतून वर्षातून दोन दिवस दुपारी साडेतीनच्या सुमारास सूर्यकिरणे येथील शिवपिंडीवर पडतात.

या मंदिरात वर्षभर भाविकांचा ओघ असतो. मंदिर परिसरात सुमारे दोन हजार भाविक बसू शकतील, असा सभामंडप बांधण्यात आला आहे. येथे लग्न, मुंजीसारखे मंगलविधी, नवसाचे कार्यक्रम होतात. मंदिराच्या मागच्या बाजूस नृसिंह प्रकट होताना दाखवणारी तसेच हिरण्यकश्यपूचा वध दर्शवणारी दोन शिल्पे आहेत. त्यावर कीर्तिमुख आहे. उजवीकडील बाजूस महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पुष्करणीत विविधरंगी कमलपुष्पे आहेत.

पुराणात पिंपळगाव हरेश्वरचा उल्लेखपिप्पलग्राम हरिहरेश्वरअसा आढळतो. स्कंदपुराण, नवनाथ, शिवपुराण, शिवलीलामृत, श्रीमत भागवत पुराण आदी प्राचीन ग्रंथांत या ठिकाणाचा उल्लेख आहे.

 

उपयुक्त माहिती:

  • पाचोरा येथून २१ किमी, तर जळगाव येथून ६१ किमी अंतरावर
  • पाचोरा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : शिवानंद गुरव, पुजारी, मो. ७०५८६३०१९०,
  • नंदू गुरव, पुजारी, मो. ८७६७०२२९०६
Back To Home