हरिहरेश्वर मंदिर

हरिहरेश्वर, ता. श्रीवर्धन, जि. रायगड

हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र आणि रुपेरी वाळूच्या किनाऱ्यावर असलेले श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. पेशव्यांचे कुलदैवत असलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाचीदक्षिण काशीम्हणून ख्याती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे आणि पेशवे घराण्यातील अनेकांनी येथे दर्शन घेतल्याच्या नोंदी आहेत. येथील वैशिष्ट्य असे की महाशिवरात्री कालभैरव जयंतीला होणाऱ्या उत्सवांच्या वेळी येथे तोफ डागली जाते. ही प्रथा १७३३ पासून आजतागायत सुरू आहे

मंदिराची अख्यायिका अशी की बळी राजाकडून तीन पावले भूमी मागणाऱ्या वामनाने पहिले पाऊल पृथ्वीवर, दुसरे पाऊल स्वर्गावर आणि तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवले अशी कथा प्रचलित आहे. मात्र, कोकणात एक वेगळी समजूत आहे. वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हे हरिहरेश्वराच्या या पवित्र भूमीवर पडले. त्यामुळे ही भूमी अधिक पवित्र असल्याचे मानले जाते. दुसऱ्या अख्यायिकेनुसार, हजारो वर्षांपूर्वी शांततेच्या शोधात फिरत असताना अगस्ती मुनी हरिहरेश्वराच्या या निसर्गरम्य परिसरात आले. येथे त्यांना चार स्वयंभू शिवलिंगांचे दर्शन झाले आणि त्यांचे मन स्थिर झाले. त्यांनी येथे तपश्चर्या केली आणि काळभैरव योगेश्वरी देवीची स्थापना केली. यामुळे हे क्षेत्र सिद्धस्थान बनले.

महाबळेश्वरमधून उगम पावणारी सावित्री नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्रात विलीन होते, त्याच ठिकाणी हरिहरेश्वर मंदिर स्थित आहे. या मंदिराचे बांधकाम कधी झाले याचा निश्चित कालावधी माहित नसला तरी असे मानले जाते की ते मध्ययुगीन काळाच्या उत्तरार्धात ते झाले असावे. प्राचीन मंदिराच्या जागेवर सध्या दिसणारे मंदिर हे स्वराज्याचे पेशवे होण्याचा मान लाभलेले श्रीवर्धनच्या भट घराण्याकडून उभारल्याचे सांगितले जाते. .. १७२३ मध्ये एका आगीच्या घटनेत हे मंदिर जवळपास नष्ट झाले होते. त्यावेळी बाजीराव पेशव्यांनी (पहिले) मंदिराचे संपूर्ण पुनर्निर्माण केले चंद्रराव मोरे यांनी मंदिराभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग बांधला

ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी आणि पार्वतीगिरी या चार टेकड्यांच्या पायथ्याशी हरिहरेश्वर मंदिर वसलेले आहे. या मंदिराच्या उत्तर पश्चिम दिशेला समुद्रकिनारे आहेत. अशा प्रकारची नैसर्गिक रचना असल्यामुळे या स्थानालादेवघरकिंवाभगवानाचे घरअसे म्हटले जाते. वाहनतळापासून काही अंतरावर असलेल्या एका मोठ्या कमानीतून या मंदिरात येण्यासाठी जांभ्या दगडांची फरसबंदी वाट आहे. या वाटेवर पुजासाहित्याची अनेक दुकाने आहेत. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर दोन मोठ्या चौथऱ्यांवर उंच दीपस्तंभ आहेत. त्यासमोरच हरिहरेश्वराचे दुमजली कौलारू मंदिर त्याशेजारी कालभैरवाचे मंदिर आहे. येथे प्रथम कालभैरवाचे दर्शन घेऊन त्यानंतर हरिहरेश्वराचे पुन्हा कालभैरवाचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे. येथे येणाऱ्या सर्व भाविकांकडून हा दर्शनाचा क्रम पाळला जातो. या दोन्ही मंदिरांसमोर भाविकांच्या सोयीसाठी मोठा मंडप उभारलेला आहे

जमिनीपासून उंच जगतीवर असलेल्या कालभैरव मंदिराच्या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. येथील सभामंडपात दर्शनरांगेची व्यवस्था आहे. वाईट शक्तींपासून मुक्ती मिळविण्यासाठी या सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या एका नक्षीदार लाकडी खांबाजवळ भाविकांना बसविले जाते तेथून काळभैरवाला कौल लावण्याची पद्धत आहे. दररोज दुपारी ११ ते या वेळेत येथे कौल लावले जातात. गर्भगृहात कालभैरव योगेश्वरी मातेच्या पाषाणातील मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींच्या पाठशिळा पितळी पत्र्याने मढविलेल्या आहेत. या पत्र्यावर द्वारपाल, पाच फण्यांचा नाग, किर्तीमुख सूर्य अशा शिल्पाकृती आहेत. असे सांगितले जाते की येथील कालभैरवाचे माहात्म्य मोठे आहे. अन्यत्र मंदिरांमध्ये कालभैरवाची मूर्ती दक्षिणाभिमुख असते. येथील मूर्ती मात्र उत्तराभिमुख आहे. या कालभैरवाच्या दर्शनाने पिशाच्चबाधा नाहीशी होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे

कालभैरवाच्या दर्शनानंतर भाविक शेजारी असलेल्या हरिहरेश्वराच्या दर्शनासाठी येतात. हरिहरेश्वराचे मंदिरही कालभैरवाप्रमाणे सभामंडप गर्भगृह अशा रचनेचे आहे. प्रवेशद्वारातून सभामंडपात आल्यावर डावीकडील चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती उजवीकडे एका चौथऱ्यावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्हीकडे द्वारपाल शिल्पे आहेत. येथील गर्भगृह हे पाताळलिंगी स्वरूपाचे म्हणजे जमिनीपासून तीन ते चार फूट खाली आहे. सभामंडपातून चार पायऱ्या उतरून या गर्भगृहात येता येते. येथे असलेली शिवपिंडी ही अतिशय दुर्मिळ समजली जाते. या चौकोनी आकाराच्या मोठ्या पिंडीवर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया पार्वती यांची स्थाने आहेत. पिंडीवर असलेले चार उंचवटे ही त्यांची प्रतिके असल्याची मान्यता आहे. सृष्टीची निर्मिती, पालन, संहार आणि शक्ती या चारही तत्त्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या देवता एकाच जागी येथे विराजमान आहेत. असे सांगितले जाते की अगस्तीमुनींनी केलेल्या तपश्चर्येमुळे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती लिंग रूपाने येथे प्रकट झाले आहेत

मंदिराच्या प्रांगणात गणपती आणि हनुमानाचे स्थान आहे. ही सारी मंदिरे कौलारू आहेत. परिसरात एक विहीरही आहे, तिला ब्रह्मकूप म्हणतात. ती स्वतः ब्रह्मदेवाने खणल्याची कथा सांगितली जाते. हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असले, तरी त्याचा प्रदक्षिणा मार्ग मात्र डोंगरावरून आणि काही ठिकाणी थेट समुद्राच्या पाण्यातून जातो. त्यामुळे ओहोटीच्या वेळीच ही प्रदक्षिणा केली जाऊ शकते

हरिहरेश्वर हे स्थान अतृप्त आत्म्यांना मुक्ती देण्यासाठी सर्वांत उत्तम मानले जाते. मृत्यूनंतर केले जाणारे विधी आज अनेक ठिकाणी केले जातात. पण काही विशिष्ट ठिकाणीच हे विधी केले असता मुक्ती मिळते, अशा आशयाचा उल्लेख काही धार्मिक ग्रंथांत आहे. त्यात हरिहरेश्वरचा उल्लेख आहे. अतृप्त आत्म्यांना मुक्ती देण्यासाठीचे गतिश्राद्ध, नारायण नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध आदी विधी येथे केले जातात. येथील शुक्ल तीर्थावर हे सारे विधी होतात. हरिहरेश्वरला महाशिवरात्र, कार्तिक शुद्ध एकादशी, चैत्र नवमी, आषाढी एकादशी आणि कालभैरव जयंतीचे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात

उपयुक्त माहिती

  • श्रीवर्धनपासून २० किमी, तर माणगावपासून ५३ किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे रायगडमधील अनेक शहरांतून श्रीवर्धसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९६०७७५१९५३, ७९७२४००२२०
Back To Home