
चालुक्यकालीन मंदिर स्थापत्य, अनोखे शिल्पसौंदर्य, अत्यंत दुर्मीळ असे बहुमुखी शिवलिंग आणि शैव–वैष्णव पंथांचे एकत्रीकरण अशी विविध वैशिष्ट्ये असलेले संगमेश्वर व हरिहरेश्वराचे मंदिर हत्तरसंग कुडल येथे आहे. भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे गाव महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर स्थित आहे. मराठी भाषेच्या इतिहासातही येथील संगमेश्वर मंदिरास महत्त्वाचे स्थान आहे. याचे कारण येथे मराठी भाषेतील वाक्य असलेला पहिला शिलालेख आहे. यामुळे हे स्थान ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.
हत्तरसंग कुडल या ग्रामनामात कुडल हा कन्नड शब्द आहे. त्याचा अर्थ ‘संगम’ असा होतो. येथे उत्तरेकडून येणारी भीमा नदी आणि पश्चिमेकडून येणारी सीना नदी यांचा संगम इंग्रजी ‘टी’ अक्षरासारखा झाला आहे. भारतात सहसा इंग्रजी ‘वाय’प्रमाणे दोन नद्यांचा संगम दिसतो. त्यामुळे हत्तरसंग कुडल येथील संगम अद्वितीय समजला जातो. या संगमावर हरिहरेश्वर व संगमेश्वर महादेवाची प्राचीन मंदिरे स्थित आहेत. धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटनासाठी पर्यटक व भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेट देतात. येथील मंदिरे चालुक्य काळात बांधण्यात आलेली आहेत. मंदिरांतील अप्रितम व अनोख्या शिल्पांमुळे ती अभ्यासकांचेही आकर्षण केंद्र बनली आहेत.
मराठी भाषेच्या उत्त्पत्ती संशोधनाच्या संदर्भात येथील संगमेश्वर मंदिरातील शिलालेख महत्त्वपूर्ण मानला जातो. या मंदिरातील सभामंडपाच्या तुळईवर हा शिलालेख कोरलेला आहे. सोलापूर येथील शिलालेख तज्ञ आनंद ना. कुंभार यांनी या शिलालेखाचे सर्वप्रथम वाचन केले. वाई येथील प्राज्ञ पाठशालेतर्फे प्रसिद्ध होत असलेल्या ‘नवभारत’ मासिकाच्या जुलै १९७५च्या अंकात त्यांनी ‘स्पष्ट कालोल्लेखित आद्य मराठी शिलालेख – संगमेश्वर मंदिर कुडल येथील
शके ९४०चा मराठी शिलालेख’ या शीर्षकाने सविस्तर लेख प्रसिद्ध केला. त्यातील माहितीनुसार, ९४ सेंमी. लांब व १६ सेंमी. रुंद असलेला हा शिलालेख अवघ्या अडीच ओळींचा आहे. नागरी व मराठी भाषेत असलेल्या शिलालेखातील पहिल्या ओळीत ‘ओम स्वस्ति सकु ९४० काळयुक्त संवत्सरे माङ्गकधनुशिकाळ छेळा’ असे शब्द आहेत. दुसऱ्या ओळीत ‘पंडित त गछतो आयाता मछ xxx मि xx छिमळनि १०००’ असे म्हटले आहे. (यातील xxx या फुल्यांचा अर्थ असा की येथील अक्षरे उलगडता आलेली नाहीत.) तिसऱ्या ओळीत ‘वाछितो विजेयां होइवा’ असे मराठी शब्द आहेत. यांचा अर्थ ‘वाचेल तो विजयी होईल’ असा होतो. या शिलालेखावरून असे समजते की शके ९४० मध्ये कालयुक्त संवत्सर असताना कोणी एका पंडिताने संगमेश्वर मंदिरास भेट दिली होती व त्यावेळी त्यास एक सहस्त्र निष्क (त्या काळातील प्रचलित नाणी) देण्यात आले. शेवटी, हा लेख वाचणारा विजयी होवो असे आशीर्वचन आहे. यातील कालनोंदीनुसार हा शिलालेख शके ९४० म्हणजे इ.स. १०१८ मध्ये, चालुक्य राजा जयसिंह तिसरा याच्या कारकिर्दीत कोरलेला आहे. आनंद
कुंभार यांच्या म्हणण्यानुसार हाच मराठीतील पहिला शिलालेख आहे. मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळावा याकरीता केंद्र सरकारला जो प्रस्ताव पाठवायचा होता, तो तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘अभिजात मराठी भाषा समिती’ नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालामध्येही याबाबतचा उल्लेख आहे. या शिलालेखाचे जतन करण्यासाठी २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाने १० लाख रूपये मंजूर केले होते.
संगमेश्वर मंदिरातील शिलालेखावरून हे मंदिर इ.स. १०१८मध्ये बांधण्यात आल्याचे स्पष्ट होते. हे त्रिकूट म्हणजे तीन गर्भगृहे असलेले मंदिर आहे. चालुक्यांनंतरच्या काळात त्याचा अनेक वेळा जीर्णोद्धार झाला, असे सांगण्यात येते.
या मंदिरासमोर अनेक प्राचीन वृक्ष आहेत. मंदिरास दगडी बांधणीची प्राचीन व भक्कम आवारभिंत आहे. या भिंतीत मंदिराचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर दगडात घडवलेला प्राचीन माठ आहे. हल्ली याचा वापर हुंडी
म्हणजेच दानपेटी म्हणून केला जातो. येथील प्रवेशद्वार काहीसे उंच आहे. त्याच्या पायरीवर शुभचिन्हे कोरलेली आहेत. द्वारशाखांवर वेलबुट्टी व पानाफुलांची नक्षी आणि ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारात आतील दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या छतावर समोरील बाजूला बाशिंगी कठडा आणि डाव्या व उजव्या बाजूला नंदी शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रांगणात दगडी फरसबंदी आहे. प्रांगणात मुखमंडपासमोरील चौकोनी शिळा काही इंच उंच आहे. ती रंगशिळा असावी, असा अंदाज जाणकार व्यक्त करतात. या प्रांगणात अनेक प्राचीन वास्तू आहेत. आवारभिंतीला लागून ओवऱ्या आहेत.
दोन मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे व यात बाह्य बाजूने कक्षासने आहेत. कक्षासनात सहा नक्षीदार अर्धस्तंभ आहेत. या मुखमंडपाच्या उजव्या बाजूला आणखी एक मुखमंडप आहे व डाव्या बाजूला बंदिस्त कक्ष आहे. पुढे अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात मध्यभागी असलेल्या चार स्तंभांच्या
मधील जागेत एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. वितानावर चक्राकार नक्षी आहे. सभामंडपात मराठी भाषेतील वाक्य असलेला शिलालेख आहे.
पुढे असलेल्या अंतराळाच्या प्रवेशद्वारास पुष्पशाखा व स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. मंडारकास चंद्रशिला व कीर्तीमुख आहे. प्रवेशद्वारावरील उत्तररांगेवर शिल्प तोरण आहे. अंतराळात मध्यभागी नंदीची मूर्ती आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार सभामंडपापेक्षा उंचावर आहे. द्वारशाखांवर अस्पष्ट नक्षी व स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व मंडारकास चंद्रशिला आहे. गर्भगृहात शिवपिंडी आहे. शिवपिंडीतील शाळुंका उंच असून लिंगावर महादेवाचा पितळी मुखवटा आहे. महादेवाच्या डोक्यावर छत्र धरलेला पंचफणी पितळी नाग आहे. गर्भगृहाच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. खालील चौकोनी थरात चारही कोनांवर नंदी शिल्पे
आहेत. वरील गोलाकार थर उंच व निमुळते आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहेत.
संगमेश्वर मंदिराच्या प्रांगणातून काही पायऱ्या उतरून हरिहरेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मुखमंडप, सभामंडप, स्वर्गमंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील मुखमंडप खुल्या स्वरूपाचा आहे. समोरील बाजूला चौकोनी स्तंभपादावर उभ्या असलेल्या स्तंभात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. मुखमंडपात एकाच दगडात पाठपोट कोरलेल्या दोन वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. त्यातील एक महालक्ष्मी व दुसरी भैरवी अथवा कालिका देवीची मूर्ती आहे.
मुखमंडपापुढे अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात समोरील बाजूला दोन पूर्ण स्तंभ व बाह्य बाजूच्या कक्षासनांत अर्धस्तंभ आहेत. या सभामंडपाच्या वितानावर एक मुख व पाच देह असलेला बहुरूपी श्रीकृष्ण, गोपिकांबरोबर रासलीला करणारा श्रीकृष्ण व सवंगड्यांसोबत खेळणारा श्रीकृष्ण अशी
अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपापुढे स्वर्गमंडप आहे. स्वर्गमंडपाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प व उत्तररांगेतील तोरणात शिखरशिल्पे आहेत. मंडारकास चंद्रशिला आहे. स्वर्गमंडपात सुमारे बारा नक्षीदार स्तंभांवर कणी व हस्त आहेत. या हस्तांवर यक्ष, किन्नर, सुरसुंदरी, गजराज आदी शिल्पे आहेत. स्वर्ग मंडपात भिंतीवरील देवकोष्टकात त्रिशूल डमरू धरण केलेल्या काळभैरवाचे शिल्प आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला विशाल नागशिल्पे आहेत. स्वर्गमंडपात बासरीवादक श्रीकृष्ण व त्याच्या पायाकडे सवंगडी कोरलेले आहेत. आयताकार स्वर्गमंडपाचे छत खुले आहे. प्राचीन काळी या मंडपात देवाच्या रंगभोगासाठी नृत्य, नाटीका, गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे.
स्वर्ग मंडपातून पुढे अंतराळ व त्यापुढे दोन गर्भगृहे आहेत. दोन्ही गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानफुलांच्या नक्षी व ललाटबिंबावर गणपतीच्या मूर्ती आहेत. मंडारकांस चंद्रशिळा आहेत. डाव्या बाजूच्या गर्भगृहात जमिनीवर स्वयंभू शिवपिंडी आहे. उजव्या बाजूच्या गर्भगृहात वज्रपीठावर विष्णूची मुरलीधर रूपातील मूर्ती आहे. या मंदिरांच्या बाजूला आणखी एक शिवमंदिर आहे. त्यात बहुमुखी शिवपिंडी आहे. या शिवपिंडीत पाषाण लिंगावर ३५९ शिवमुखे कोरलेली आहेत. या शिवपिंडीवर अभिषेक केल्यास वर्षभराच्या अभिषेकाचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सुमारे ४५०० किलो वजनाची ही शिवपिंडी उत्खननात सापडली होती. या मंदिराच्या तळघरात ऋषींची एक मूर्ती आहे. मंदिराच्या प्रांगणात मारुतीचे मंदिर, होमकुंड व इतर प्राचीन शिल्पे आहेत. मंदिरापासून जवळच सिना व भीमा नद्यांचा संगम आहे. संगमजवळ बांधीव घाट आहे. तेथे श्राद्ध व जनन शांतीचे विधी केले जातात.
हत्तरसंग कुडल येथील ही मंदिरे अद्वितीय स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत. या मंदिरांत शैव आणि वैष्णव पंथांचा अपूर्व संगम शिल्पकलेच्या माध्यमातून अविष्कृत करण्यात आलेला आहे. येथे महाशिवरात्र, श्रावण महिना आणि मकरसंक्रांत या काळात यात्रा असते. त्यावेळी अनेक धार्मिक विधी तसेच करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
किरणोत्सवाच्या वेळी येथे मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येतात. सूर्य जेव्हा उत्तरायणामध्ये प्रवेश करतो त्यावेळी येथील संगमेश्वर मंदिरातील शिवलिंगावर सकाळची सूर्यकिरणे पडतात. महाराष्ट्रात फार थोड्या ठिकाणी असा किरणोत्सव पाहावयास मिळतो. प्रत्येक अमावस्येला अनेक भाविक येथे पूजा करण्यासाठी येतात.