हरिहर मंदिर

हरिहर पेठ, अकोला, जि. अकोला

हरि (विष्णू) आणि हर (शिव) यांच्या एकत्र रूपाचे दर्शन घडवणारे हरिहर मंदिर अकोल्यातील हरिहर पेठेत वसले आहे. अकोल्यातील प्रसिद्ध मोठा राम मंदिराची उभारणी करणारे, शेगावचे गजानन महाराज यांचे परमभक्त बच्चूलाल अग्रवाल यांनीच हे मंदिर बांधले आहे. शंभर वर्षांहूनही अधिक प्राचीन असलेल्या या मंदिरात कार्तिक महिन्यातील वैकुंठ चतुर्दशीला होणारा हरिहर मिलन सोहळा प्रसिद्ध आहे. शेकडो भाविकांच्या उपस्थित होणाऱ्या या सोहळ्यादरम्यान परिसर हरिहराच्या जयघोषाने दुमदुमून जातो.
हिंदू धर्मात शैव, वैष्णव, शाक्त, स्मार्त, सौर असे अनेक पंथ वा संप्रदाय आहेत. शैव आणि वैष्णव पंथ यांच्यात आपल्या आराध्याच्या श्रेष्ठत्वावरून, तसेच तात्त्विक बाबींवरून वाद झाल्याची उदाहरणे आहेत. त्या-त्या देवतेच्या पुराणात ती-ती देवता श्रेष्ठ व अन्य कनिष्ठ असे मानण्यात येते. त्यांच्यात काही वेळा संघर्ष झाल्याचेही दाखले आहेत. धर्मतत्त्ववेत्त्यांनी आणि संतांनी त्यामुळेच या देवतांमध्ये समन्वयाचा मार्ग लोकांना दाखवला. महाराष्ट्रात संत निवृत्तीनाथांनी शिवभक्तीला कृष्णभक्तीची जोड दिली व या दोन्ही देवता एकरूप असल्याचे अभंगांतून सांगितले. त्याच्याही आधी हरि आणि हर हे एक कल्पून त्यांच्या मूर्तींची पूजा केली जात असल्याचे सांगितले जाते. कर्नाटकात सहाव्या शतकात खोदण्यात आलेल्या बदामी लेण्यांमध्ये हरिहराचे शिल्प सर्वप्रथम आढळून आले.
हरिहराच्या निर्मितीविषयी पौराणिक आख्यायिका अशी की समुद्रमंथनानंतर अमृतप्राशनासाठी सूर आणि असूर यांच्यात संघर्ष निर्माण झाला. त्यावेळी विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला. मोहिनीने असूरांना मोहवून दूर नेले व सर्व अमृत देवांना मिळाले. त्यावेळी विष्णूच्या या मोहिनी अवतारावर साक्षात् महादेव भाळले. त्यांनी मोहिनीला अलिंगन देण्याचा प्रयत्न केला. याच वेळी विष्णू आपल्या मूळ रूपात परत आले. मात्र त्या अलिंगनामुळे शिव व विष्णू हे दोघे एकरूप झाले. त्यातून हरिहराचे रूप निर्माण झाले. याबाबत अशीही एक आख्यायिका आहे की शैव आणि वैष्णव यांच्यात कोणाचा इष्टदेव श्रेष्ठ यावरून वाद झाला. तेव्हा शिव आणि विष्णू या दोन्ही देवता एकाच शरीरात प्रकट झाल्या व त्यांनी त्यातून एकात्मतेचा संदेश दिला.
मूर्तीशास्त्रानुसार, हरिहराची मूर्ती विशिष्ट पद्धतीने घडवली जाते. त्यात एक भाग विष्णूचा व एक शंकराचा असतो. विष्णूच्या भागाकडील शरीर वस्त्रालंकारित असते, तर शिवाच्या भागाकडील शरिरावर सामान्य वस्त्रे कोरलेली असतात. शिल्पात त्रिशुळ, डमरू आदी शंकराशी संबंधित चिन्हे, तसेच शंख, चक्र, गदा ही विष्णूशी संबंधित चिन्हे अंकित असतात. शिल्पामध्ये नंदी आणि गरूड यांचाही समावेश असतो. महाराष्ट्रात अनेक गावे, तीर्थे वा मंदिरांना हरिहर या नावाने ओळखले जाते. मात्र हरिहराची अशी मूर्ती दुर्मीळ आहे. अकोल्यातील हरिहर मंदिरातील मूर्ती मात्र मूर्तीशास्त्रानुसार घडवलेली आहे. या मंदिराची स्थापना इ.स. १९०१ मध्ये करण्यात आली. या मंदिरावरूनच या परिसराला हरिहरपेठ असे नाव पडले.
अकोला शहरातील गजबजलेल्या व दाटीवाटीच्या परिसरात हरिहर मंदिर स्थित आहे. मंदिराच्या कमानीनजीक हनुमानाचे छोटे मंदिर आहे. या कमानीतून आत आल्यावर हरिहर मंदिराच्या प्राचीन वास्तूचे दर्शन होते. हरिहर मंदिराजवळ एक प्राचीन विहीर आहे. असे सांगितले जाते की या विहिरीजवळ गजानन महाराज अनेकदा बसत असत. या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर सुंदर नक्षीकाम असलेली मेघडंबरी आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. चार पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपातील गोलाकार स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानींनी जोडलेले आहेत. या सभामंडपात बच्चूलाल अग्रवाल व गजानन महाराज यांच्या प्रतिमा आहेत.
सभामंडपाच्या पुढे लाकडी रेलिंग व त्यापुढे प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ एका चौथऱ्यावर शुभ्र संगमरवरी नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात जमिनीवर शिवपिंडी व वज्रपिठावर विलोभनीय हरिहर मूर्ती आहे. या मूर्तीच्या उजवा भाग श्रीविष्णू तर डावा भाग शिवाचा आहे. विष्णूंच्या हातात शंख, चक्र व गदा आहे. महादेवांच्या एका हातात त्रिशूळ व डमरू असून दुसरा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. शिवाच्या भागाच्या मागील बाजूस नंदी तर विष्णूंच्या भागाच्या मागील बाजूस गरूड आहे. हरि व हराचा वास असल्याने या मंदिराच्या गर्भगृहावर उरुशृंग पद्धतीची दोन शिखरे आहेत.
शहरातील मोठा राम मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्रीराम व हरिहर संस्थानातर्फेच या मंदिराचाही कारभार सांभाळला जातो. या मंदिरात नित्यनेमाने पूजा-अर्चा केली जाते. येथे रामनवमी, दत्तजयंती आदी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पौष शुक्ल एकादशी म्हणजेच वैकुंठ एकादशीला होणारा हरिहर मिलन सोहळा हा येथील प्रमुख उत्सव असतो. पौराणिक आख्यायिकेनुसार, देवशयनी एकादशीच्या दिवशी विष्णु सृष्टीच्या संचालनाची जबाबदारी महादेवांवर सोपवून शेषावर निद्रा घेण्यासाठी जातात. देवप्रबोधनी एकादशीला ते निद्रेतून जागे होतात. या चातुर्मासादरम्यान महादेव सृष्टीचे संचालन करतात. वैकुंठ एकादशीच्या दिवशी महादेव सृष्टीचा कारभार पुन्हा विष्णूंकडे सोपवून कैलाश पर्वतावर तपस्येसाठी जातात. वैकुंठ एकादशीला या दिवशी ‘हरिहर मिलन’ म्हणजे विष्णू आणि शिवशंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी चातुर्मासाची सांगता होते. या दिवशी भगवान महादेव आणि श्रीविष्णूंची विधीवत पूजा केल्यास मोक्ष प्राप्त होतो तसेच आयुष्यातील सर्व दु:ख दूर होतात. या दिवशी हरिहराची पूजा केल्यास कुंडलीतील सर्व अशुभ प्रभाव दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अकोल्यातील शेकडो भाविक या दिवशी या मंदिरात येतात. शहरातील राजराजेश्वर मंदिरातही हरिहर मिलनाचा मोठा सोहळा होतो.

उपयुक्त माहिती:

  • अकोला एसटी स्थानकापासून २.५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून अकोल्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home