अंजनीमाता मंदिर

अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक

दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धरायाहनुमान स्तुतीपर असलेले हे गीत महाराष्ट्रात परिचित आहे. असे सांगितले जाते की ज्या ठिकाणाहून बाल हनुमंताने लाल फळ समजून सूर्याला पकडण्यासाठी झेप घेतली ते ठिकाण म्हणजे आजचे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातीलअंजनेरीहे गाव होय. हनुमंताचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या या अंजनेरीमध्ये एकूण १६ मंदिरे आहेत. त्यामध्ये गावात असणारे भव्य हनुमंत मंदिर आणि अंजनेरी पर्वतावर असलेले अंजनीमातेचे मंदिर प्रसिद्ध आहे.

अंजनेरी हे नाव हनुमंताची आई अंजनीमातेच्या नावावरूनच पडल्याचे सांगितले जाते. नाशिकत्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी अंजनेरी गावाकडे जाणारा मार्ग आहे. येथे श्री सिद्ध हनुमंत मंदिर असून त्यामध्ये बाल हनुमंताची ११ फूट उंचीची आसनस्थ मूर्ती आहे. चैत्र पौर्णिमेच्या म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी या मंदिरात उत्सव असतो त्यावेळी हजारो भाविक त्यात सहभागी होण्यासाठी येतात. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे हनुमंत जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्याचा मान येथील मुस्लिम बांधवांना असतो. याशिवाय जन्मोत्सवाच्या वेळी हनुमंताला ढोल पथकाच्या माध्यमातून पहिली सलामी मुस्लिम बांधवांकडून दिली जाते त्यानंतर सोहळा सुरू होतो. दिवसभरात येथे होमहवन, यज्ञ तसेच भाविकांकडून आहुती दिली जाते. ‘जय हनुमानच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. या दिवशी या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते.

सिद्ध हनुमंत मंदिराच्या मागच्या बाजूने अंजनेरी पर्वताकडे जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर नव्याने बांधलेले अंजनीमाता मंदिर आहे. या पर्वताची उंची समुद्र सपाटीपासून ४२६५ फूट इतकी आहे. अंजनेरी पर्वतावर जाऊन येण्यासाठी किमान ते तासांचा वेळ लागतो. त्यासाठी टप्पे पार करावे लागतात. खासगी वाहने येथील वनखात्याच्या चौकीपर्यंत जाऊ शकतात. तेथे वनखात्याकडून प्रत्येक भाविकाची वा पर्यटकाची नोंदणी करून शुल्क आकारून त्यांना पुढे पाठविले जाते.

पर्वतावर जाण्यासाठी प्रथम पायरी मार्ग आहे. काही अंतर पार केल्यावर दोन डोंगरांच्या मधोमध कातळात कोरलेला पायरी मार्ग लागतो. आकाशात झेपावणाऱ्या त्या दोन्ही बाजूच्या कातळाच्या कड्यांमधून लहानशा पायरी मार्गावरून पुढे जाताना डाव्या बाजूला लेणी कोरलेली दिसतात. पार्श्वनाथांची लेणी म्हणून ती प्रसिद्ध आहेत. कातळात समांतर कोरलेल्या या लेण्यांमध्ये दोन दालने असून एका दालनात भैरव, तर दुसऱ्या दालनात हनुमंताचे शिल्प आहे. येथील छतावर सुमारे फूट व्यासाचे कमळपुष्प दगडात कोरलेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर नागशिल्प, कीर्तिमुख याशिवाय अनेक वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. या लेण्यांच्या पुढे आल्यावर ही कातळातील काहीशी अवघड वाटणारी वाट संपते आणि पायथ्यापासून साधारण एका तासाच्या प्रवासानंतर पठार लागतो. या पठारावर मध्यभागी अंजनीमातेचे छोटेखानी मंदिर आहे. शेकडो वर्षे जुने असलेले हे मंदिर आजही उत्तम स्थितीत आहे. मंदिरात अंजनीमाता तिच्या पुढे नतमस्तक झालेला बाल हनुमान यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या शेजारीच पाण्याचे टाक आहे. याशिवाय ग्रामस्थांनी येथे येणाऱ्या भाविकांना विसावा घेण्यासाठी काही सुविधा केल्या आहेत.

अंजनीमातेच्या मंदिरापासून प्रवासाचा पहिला टप्पा संपून दुसरा टप्पा सुरू होतो. येथून पुढे गेल्यावर पावलाच्या आकाराप्रमाणे दिसणारा भलामोठा तलाव आहे.हनुमान तळेम्हणून प्रसिद्ध असलेल्या या तलावाची आख्यायिका अशी की हनुमंताचा जन्म या अंजनेरी पर्वतावर झाला. फळ समजून सूर्याला पकडण्यासाठी त्याने या पर्वतावरून झेप घेतली. जेथून हनुमंताने उड्डाण केले तेथे त्याच्या पायाचा ठसा उमटला असून त्यात गंगा अवतीर्ण झाली. या तलावात बाराही महिने पाणी असते. तलावातील पाण्याला स्पर्श केल्यावर हनुमंताचे चरणस्पर्श केल्याचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हनुमान तळ्यापासून काही अंतरावर एक गुंफा आहे. ती अंजनीमातेची गुंफा म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, त्र्यंबक महात्म्य देवी महात्म्य अशा ग्रंथांमधील उल्लेखानुसार या गुंफेत बसून अंजनीने पुत्रप्राप्तीसाठी काही वर्षे तपश्चर्या केली होती. अंजनीच्या खडतर तपश्चर्येवर महादेव प्रसन्न झाले त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा अंजनीने महादेवांना आपल्यापोटी पुत्ररुपाने जन्म घ्यावा, अशी विनंती केली. अंजनीमातेने या गुहेत हनुमंताला जन्म दिला, असे मानले जाते. माता अंजनी देवी सीता यांची भेटही या गुंफेत झाली होती. ही गुंफा म्हणजे कातळात खोदलेली एक लेणी आहे. गुंफेच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल असून आतमध्ये अंजनीमातेची तपश्चर्या करतानाची मूर्ती आहे. याशिवाय येथे श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, भैरव, महिषासुरमर्दिनी यांची शिल्पे कोरलेली आहेत.

अंजनीमातेच्या गुंफेपर्यंत या प्रवासातील दुसरा टप्पा पूर्ण होतो. तिसऱ्या टप्प्यासाठी पुन्हा पायरी मार्ग सुरू होतो. या पायरी मार्गाने जाताना अंजनीमातेचे मंदिर हनुमान तळे यांचे विहंगम दृश्य दिसते. वरून त्या तलावाचा आकार पाहिल्यावर ते डाव्या पायाचे निशाण असून त्याची बोटे सूर्याच्या दिशेने म्हणजे पूर्वेकडे आहेत, हे स्पष्टपणे जाणवते. या पायरी मार्गाने काही अंतरावर गेल्यावर अंजनेरी पर्वताच्या सर्वोच्च माथ्यावर आपण पोहोचतो. येथून रांजणगिरी, भंडारदुर्ग, हरिहर, घरगड किंवा गडगडा दुर्ग, पश्चिमेकडे ब्रह्मगिरी पर्वत त्याखालील त्र्यंबकेश्वर गाव, उत्तरेला गोदावरीचे खोरे पूर्वेकडे अंजनेरी गाव हे सर्व नजरेच्या टप्प्यात येते.

या पठारावरून आणखी दीड किमी अंतरावर अंजनीमातेचे आणखी एक प्राचीन मंदिर आहे. छोटेखानी असलेल्या या मंदिरात अंजनीमातेच्या मांडीवर बाल हनुमंत बसला आहे, अशी मूर्ती आहे. असे सांगितले जाते की अशा प्रकारची ही राज्यातील एकमेव मूर्ती आहे. या मूर्तीच्या समोर महादेवांचा त्रिशूळ आहे. मंदिर परिसरात काही पाण्याची कुंडे असून त्या शेजारी अंजनीमातेची पूजाविधी करण्याची जागा आहे, असे सांगितले जाते.

उपयुक्त माहिती:

  • नाशिकपासून २२ किमी, तर त्र्यंबकेश्वरपासून किमी अंतरावर
  • नाशिक, त्र्यंबकेश्वर येथून एसटी, नाशिक महापालिका बसची सुविधा
  • खासगी वाहने गावातील हनुमंत मंदिरापर्यंत जातात
  • अंजनेरी पर्वतावर न्याहरीची सुविधा आहे
  • सायंकाळच्या आत तेथून खाली यावे लागते
Back To Home