
गुरुद्वारा हे ईश्वराचे घर असल्याची शीख धर्मियांची श्रद्धा आहे. शिखांचा पवित्र ग्रंथ ‘श्रीगुरुग्रंथ साहिब’ ज्या इमारतीच्या प्रार्थनाकक्षात ठेवलेला असतो, तिलाच गुरुद्वारा असे म्हटले जाते. मानवी गुरूंप्रमाणेच गुरुग्रंथ साहिबचा आदर केला जातो. शिखांची अकाल तख्त (अमृतसर), तख्त श्री हरिमंदिरसाहेब (पटणा साहेब), तख्त श्री केशवगढसाहेब (आनंदपूर), तख्त श्री दमदमासाहेब (तळवंडी) आणि तख्त सचखंड श्री हुजूरसाहेब (नांदेड) ही पाच तख्ते सर्वांत महत्त्वाची तीर्थक्षेत्रे मानली जातात. याशिवाय जगभरात अनेक प्रसिद्ध गुरुद्वारा आहेत. धुळे येथील गुरू नानक साहबजी गुरुद्वारा त्यापैकीच एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.
गुरु नानक हे शिख धर्माचे प्रवर्तक व पहिले गुरू होते. विख्यात संपादक खुशवंतसिंह यांच्या ‘ए हिस्ट्री ऑफ द सिख्स’ या ग्रंथाच्या पहिल्या खंडातील माहितीनुसार, त्यांचा जन्म तलवंडी राय भोई (सध्याचे नानकाना साहिब) येथे १५ एप्रिल १४६९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मेहता कल्याणदास बेदी असे होते, तर आईचे नाव तृप्ता असे होते. वयाच्या सातव्या वर्षी त्यांना प्राथमिक शिक्षणासाठी एका पंडिताकडे पाठवण्यात आले. त्यानंतर दोन वर्षांनी एका मुस्लिम मुल्लाकडे त्यांनी पर्शियन आणि अरेबिक भाषेचे शिक्षण घेतले. त्यांना अध्यात्माची ओढ होती. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. परंतु वैवाहिक जीवनात त्यांना रस नव्हता. ते फकिरांबरोबर व धर्मगुरूंबरोबर काळ व्यतीत करीत असत.
कालांतराने तलवंडीतून ते सुलतानपूर येथे आले. येथील नवाब दौलतखान लोधी यांच्याकडे ते लेखाधिकारी म्हणून काम करू लागले. याच काळात त्यांची अध्यात्माकडील ओढ वाढली. एके दिवशी सकाळी नदीत स्नान करीत असताना त्यांना पहिला साक्षात्कार झाला. ‘जन्मसाखी’ या त्यांच्या चरित्रग्रंथानुसार त्यांना परमेश्वराने दर्शन देऊन सांगितले की ‘तू म्हणजे मी
आहे. तुझ्याद्वारे माझा नाममहिमा वाढेल. तू लोकांमध्ये जाऊन त्यांना पूजा कशी करायची ते शिकव.’ या काळात ते तीन दिवस अदृश्य होते. ते नदीत बुडाले, असे लोकांना वाटले. परंतु चौथ्या दिवशी ते परत आले. ‘जगात कोणी हिंदू नाही, कोणी मुसलमान नाही’, अशी घोषणा त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी सर्वसंगपरित्याग केला. त्यावेळी त्यांचे वय तेरा वर्षे होते. गृहत्याग करून त्यांनी तीर्थाटन केले. ते मक्का, मदिना आणि बगदादलाही गेल्याचे सांगण्यात येते.
आपल्या जीवनकाळात त्यांनी ‘इक ओंकार’ म्हणजे ईश्वर एक आहे, या तत्त्वाचा प्रचार केला. सगुण देवदेवता तसेच सैतानाची शक्ती यांचे अस्तित्व त्यांनी नाकारले. परमेश्वराची अवतार कल्पनाही त्यांनी नाकारली. सर्व चराचर सृष्टी ही परमेश्वराची निर्मिती आहे व ती स्वयंभू, सर्वव्यापी व अद्वितिय आहे, अशी शिकवण गुरु नानक यांनी दिली. गुरु नानक यांनी प्रवर्तित केलेल्या शिख धर्माने जातीव्यवस्था, मूर्तीपूजा यांचा धिःकार केला. मानवतेची सेवा,
सहिष्णुता व बंधुता या तत्त्वांना महत्त्व देणारा व ऐहिक जीवनावर भर देणारा धर्म त्यांनी सांगितला. आपल्या चार यात्रा पूर्ण केल्यानंतर गुरु नानक हे कर्तारपूर साहेब येथे आले. जीवनातील अंतिम १८ वर्षे त्यांनी येथे निवास केला. येथेच रावी नदीच्या किनाऱ्यावर त्यांनी ‘नाम जपो, किरत करो, वंड छको’ म्हणजे प्रभूनामाचे स्मरण (सिमरन) करा, प्रामाणिकपणे मेहनत करा आणि जे काही आहे ते एकमेकांत वाटून खा, असा संदेश दिला. २२ सप्टेंबर १५३९ रोजी पहाटेच्या समयी त्यांचे निर्वाण झाले.
गुरु नानक यांच्यासह शिखांचे एकूण दहा गुरू आहेत. त्यातील अखेरचे मानवरूपातील गुरू गोविंदसिंह (१६६६ ते १७०८) यांचा आणि महाराष्ट्राचा जवळचा संबंध होता. गुरू गोविंद सिंह हे अखेरच्या काळात नांदेडमध्ये वास्तव्यास आले होते. याच ठिकाणी ७ ऑक्टोबर १७०८ रोजी त्यांचे परलोकगमन झाले. तत्पूर्वी त्यांनी देहधारी गुरुंची परंपरा समाप्त करून गुरुग्रंथ साहिबला गुरुपदी (गुरु ता गद्दी) विराजमान केले. एकूण १४३० पाने आणि पाच हजार ८९४ शब्द असलेल्या गुरुग्रंथ साहिबमध्ये गुरु नानक यांची,
तसेच अन्य काही गुरूंची वचने आणि प्रार्थना आहेत. यामध्ये कबीर, रविदास, बाबा फरीद यांच्याप्रमाणेच संत नामदेवांच्या रचनांचाही समावेश आहे.
महाराष्ट्राशी अशा प्रकारे दृढ संबंध असलेल्या शिख धर्माचे अनेक पवित्र गुरूद्वारा येथे ठिकठिकाणी आहेत. मोहाडी येथील गुरू नानक साहबजी गुरुद्वारा हा त्यांतीलच एक होय. १९६५ साली संत साधूसिंह यांनी या गुरुद्वाराचे बांधकाम केले व तहहयात त्याचे व्यवस्थापन केले. त्यांच्या पश्चात बाबा निरंजन सिंह यांनी त्यांचे कार्य पुढे नेले.
सर्व गुरुद्वारांप्रमाणे याही गुरुद्वारास भक्कम आवारभिंत आहे. या आवारभिंतीत ठराविक अंतरावर भिंतीपेक्षा सुमारे दोन फूट उंचीच्या स्तंभांवर आमलक आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस असलेल्या चौकोनी स्तंभांवर मेघडंबरी आहेत. या प्रवेशद्वारातून आत प्रांगणात प्रवेश होतो. येथून पुढे दरबार साहिब आहे. गुरुद्वारातील प्रार्थना भवनास दरबार साहिब असे म्हणतात. या प्रार्थना भवनाच्या बांधकामात प्राचीन व आधुनिक
स्थापत्यशैलीचा सुंदर वापर केलेला आहे. या भवनास बाह्य बाजूस ओसरी व त्यात अनेक नक्षीदार स्तंभ आहेत. या स्तंभांवर असलेल्या हस्तांवर तुळई व त्यावर सज्जा आहे. वरील मजल्याच्या सज्जातही नक्षीदार स्तंभ आहेत.
प्रार्थना भवनास समोरील बाजूला तीन प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारांच्या द्वारशाखांवर, ललाटपट्टीवर व तोरणात पानाफुलांच्या नक्षी आहेत. प्रार्थना भवनात सर्व धर्मियांना प्रवेश असला, तरी कोणीही उघड्या माथ्याने प्रवेश करू नये, असे निर्बंध असल्यामुळे बाहेर ठेवलेली मस्तिष्क वस्त्रे डोक्यावर ठेवून या भवनात प्रवेश करावा लागतो. येथील परिसर सुंदर, स्वच्छ व प्रसन्न आहे. प्रार्थना भवनात चारही बाजूंनी नक्षीदार स्तंभ आहेत. हे सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. छतावर पानाफुलांच्या नक्षी व मध्यभागी काचेचे झुंबर आहे. बंदिस्त स्वरूपाच्या या भवनात हवा व प्रकाश येण्यासाठी वातायने आहेत. हे संपूर्ण भवन नक्षीकामाने सुशोभित आहे. प्रार्थना भवनात मधोमध संगमरवरी दगडात घडवलेला नक्षीदार मखर आहे. मखरावर शिखर व त्यावर कळस आहे. मखरात उंची वस्रावरणाने सुशोभित
तख्तावर गुरु ग्रंथसाहिब ठेवलेला आहे. या तख्तावरील बिछान्यास मंजी साहिब असे म्हटले जाते.
तख्ताच्या दोन्ही बाजूला पीठावर चौर्या व चामर आहेत. तख्ताच्या सभोवतीने संगमरवरी पाषाणात घडवलेले जाळीदार कठडे लावलेले आहेत. तख्ताच्या बरोबर वर, वितानाला काचेचे मोठे झुंबर व उंची वस्त्रांचे छत्र लावलेले आहे. रोज विशिष्ट वेळी ग्रंथी (ग्रंथ वाचक) ग्रंथाचे संगीतमय वाचन करतात. वादक व गायक ग्रंथातील विविध वचनांचे गायन करतात. सर्व धर्मीय भाविक पवित्र ग्रंथास नमन करून प्रार्थना करतात.
दरबार साहिब म्हणजेच प्रार्थना भवनाच्या छतावर अनेक शिखरे आहेत. षटकोनी शिखरात एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले सहा स्तंभ व त्यावरील गोल घुमटावर कळस आहेत. छतावर मध्यभागी दुमजली शिखर आहे. शिखराच्या खालील आयताकार भागात चार कोपऱ्यांवर चार स्तंभ, त्यावरील छतावर शिखराचा चौकोनी भाग, त्यावर घुमट व कळस आहे.
प्रार्थना भवनाच्या बाजूला तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर लंगर आहे. येथे स्वयंपाक घर व भोजन गृह आहे. येथे भाविकांना दिवसभर महाप्रसादाचे वाटप सुरू असते. इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर भाविकांना राहण्यासाठी यात्री निवास आहे.
कार्तिक पौर्णिमा हा गुरू नानक जयंतीचा उत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नगर कीर्तन म्हणजेच गुरू ग्रंथ साहिब पालखीत ठेवून नगर प्रदक्षिणा केली जाते. या दिवशी सार्वजनिक लंगरचे आयोजन केले जाते. ही पंगत भेदाभेद विरहित असते. बैसाखी म्हणजेच शीख धर्मियांचे नववर्ष. हा नवीन धान्याचा उत्सव येथे साजरा केला जातो. प्रकाशा हा शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंद सिंहजी यांचा जन्मदिवस प्रकाशोत्सव म्हणून साजरा केला जातो.
या शिवाय दिवाळी, मकर संक्रांत आदी उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांचे वेळी हजारो शीख बांधव तसेच इतर धर्मीय भाविक गुरूद्वारात येऊन गुरूग्रंथ साहिबचे दर्शन घेऊन प्रार्थना करतात. ग्रंथवाचक (ग्रंथी) ग्रंथांचे वाचन करतात. गुरुद्वारात भजन, कीर्तन, संगीत, लंगर आदींचे आयोजन केले जाते.