सनातन हिंदू धर्मात वेदांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्या वेदांचेच नाशिक येथे एक मंदिर आहे. ‘गुरू गंगेश्वर वेद मंदिर’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात वेदांनाच मूर्तिरूप देण्यात आले असून त्यांची तेथे पूजा केली जाते. ज्ञानाचे प्रतीक असलेले वेद आणि साधनेचे प्रतीक असलेले गुरू गंगेश्वर यांची महती सांगणारे हे मंदिर आहे.
सारडा समूहाचे किसनलाल सारडा आणि पत्नी किरण सारडा या दाम्पत्याला भारतीय संस्कृती आणि वेदांप्रती मोठा आदर होता. त्यांनी श्री गंगेश्वरांना आपले गुरू मानले होते. किसनलाल सारडा यांचे वडील बस्तीराम आणि आई रामप्यारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि गुरू गंगेश्वर व वेदांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी १९८५ मध्ये सारडा दाम्पत्याने मंदिर उभारण्याचे ठरविले. त्यानुसार ‘मातुश्री रामप्यारीबाई सारडा धार्मिक प्रतिष्ठान’च्या माध्यमातून, नाशिक शहरात त्र्यंबकेश्वर रस्त्यावर, जिल्हाधिकारी निवासासमोर श्री गुरू गंगेश्वर वेद मंदिर साकारण्यात आले. गुजरात आणि राजस्थानच्या कारागिरांनी तीन वर्षे अथक मेहनत करून हे मंदिर साकारले. १९८८ मध्ये या मंदिरात सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. आकर्षक बांधकाम आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या मंदिराची अल्पावधीतच ख्याती झाली.
वेद मंदिराची लांबी ८२ फूट, रुंदी ६५ फूट, तर उंची ७८ फूट आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार अर्धचंद्राकार आहे. कलात्मक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या प्रवेशद्वाराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रवेशद्वारावर संगमरवरी चतुर्भुज गणेशमूर्ती आहे. या मंदिराच्या बांधकामात संगमरवर व जैसलमेरच्या काळ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. मुख्य सभागृहाला समोरच्या बाजूने लावलेल्या भल्यामोठ्या काचेमुळे बाहेरूनही मंदिरातील मूर्ती पाहता येतात. मंदिराच्या मागील बाजूस प्रशस्त ध्यानकेंद्र आहे. या केंद्रामध्ये देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ‘भारतीय संस्कृती आणि वेदांचे महत्त्व’ असे मोफत अभ्यासवर्ग घेण्यात येतात. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचा सखोल अभ्यास घेण्यात येतो.
मंदिरात प्रवेश करताच नजर जाते ती छताला लावलेल्या झुंबरावर. कलात्मकतेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनही या झुंबराकडे पाहिले जाते. हे वैशिष्ट्यपूर्ण झुंबर फरिदाबाद येथे तयार करण्यात आले आहे. सहा कोनी बिल्लारी काचेच्या २० हजार लोलकांपासून ते तयार केले आहे. या झुंबरामध्ये ६० शक्तिमान दिवे लावण्यात आले असून ते जेव्हा प्रकाशतात तेव्हा मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलते.
श्रीरामाच्या वास्तव्यामुळे व त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामुळे नाशिक नगरी पावन झाली आहे. म्हणूनच मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सहा फूट उंचीच्या या मूर्ती जयपूरहून आणल्या आहेत. या मूर्तींवरील अलंकार आणि वस्त्र मथुरा येथे तयार करण्यात आले आहेत. मंदिराच्या मध्यभागी वेदांची (ग्रंथाची) भव्य संगमरवरी मूर्ती आहे. ज्ञानाचे प्रतीक असलेल्या वेदांना या मंदिरात मुख्यभागी स्थान देण्यात आले आहे. त्याशेजारी गुरू गंगेश्वर यांची ब्राँझची ७ फूट उंचीची मूर्ती आहे. लहानपणापासूनच अंध असलेल्या गुरू गंगेश्वरांनी आपले सर्व आयुष्य वेदांच्या प्रसाराला वाहिले होते. त्यांनी संपादित व प्रकाशित केलेल्या एकेका वेदग्रंथाचे वजन २२ किलोपर्यंत झालेले आहे. गुरू गंगेश्वरांना चारही वेद मुखोद्गत होते.
मुख्य वेदमूर्तीच्या उजवीकडे भव्य शिवलिंग आहे. तेथेच पार्वती आणि नंदीची मूर्ती आहे. हे शिवलिंग तब्बल १७०० किलो वजनाचे असून ते काळ्या दगडापासून बनविण्यात आले आहे. काळ्या दगडातील नंदीची मूर्तीही ९०० किलो वजनाची आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला पुरुषसूक्त लावण्यात आले आहे. ऋग्वेदामध्ये या सूक्ताचा उल्लेख आहे. सूक्ताचा अर्थही या ठिकाणी लिहिलेला आहे. उजव्या बाजूला स्त्री- सूक्त आहे. पुरुषसूक्तमध्ये विष्णू पूजेचे मंत्र असून स्त्री-सूक्तामध्ये लक्ष्मी पूजेचे मंत्र असतात. वेदांमधील ऋचांना सूक्त म्हटले जाते.