महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक केंद्रस्थानी असलेला मराठवाडा हा प्रांत प्राचीन काळापासून विविध धार्मिक परंपरा, संस्कृती आणि महान संतांच्या वास्तव्याने पावन झालेला भूभाग आहे. या प्रदेशातील जालना शहर, जे आज व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे, येथील आध्यात्मिक शांततेचा एक अद्वितीय आविष्कार म्हणजे गुरू गणेश तपोधाम होय. हे स्थान जैन धर्मीयांसोबतच सर्वधर्मीयांसाठी एक पवित्र आणि मनःशांती देणारे केंद्र म्हणून नावारूपास आलेले आहे. जालना शहराच्या न्यू मोंढा परिसरात, शिवाजी पुतळ्याजवळ वसलेले हे तपोधाम ‘कर्नाटक केसरी’ म्हणून विख्यात असलेल्या महान जैन संत गुरू गणेशलालजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित आहे.
जालना जिल्ह्याचा इतिहास पाहिल्यास हा प्रदेश सातवाहन काळापासून राजकीय आणि धार्मिक घडामोडींचे केंद्र राहिलेला आहे. भोकरदनसारखी ठिकाणे प्राचीन व्यापार मार्गावर होती, तर रोहिलागड आणि इतर भागांत बौद्ध व जैन धर्माच्या खुणा आजही पाहायला मिळतात.
मराठवाड्याने महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदायाला जसे आश्रय दिले, तसेच जैन धर्माचे विविध पंथदेखील या मातीत शेकडो वर्षांपासून नांदत आहेत. वेरूळच्या लेण्यांमधील जैन लेणी ही या प्रदेशातील जैन धर्माच्या प्राचीन प्रभावाची साक्ष देतात. जालना शहर पूर्वी ‘जनकपूर’ नावाने ओळखले जात होते आणि त्याचा संबंध रामायणाशी देखील जोडला जातो. मोगल काळात जमशेद खान याने बांधलेली काली मशीद असो किंवा यादवांच्या काळातील हेमाडपंती मंदिरे आणि बारव, जालन्याची वास्तुकला नेहमीच वैविध्यपूर्ण राहिली आहे. जैन धर्मातील ‘स्थानकवासी’ परंपरा मूर्तीपूजेऐवजी निराकार तत्त्वावर आणि आत्मचिंतनावर अधिक भर देते. १५ व्या शतकात लोंकाशाह यांनी सुरू केलेल्या सुधारणावादी चळवळीतून स्थानकवासी पंथाची मुळे अधिक घट्ट झाली. गुरू गणेशलालजी महाराज हे याच परंपरेतील एक दिग्गज संत होते. त्यांचा जन्म आणि कार्य प्रामुख्याने उत्तर आणि दक्षिण भारतात असले, तरी जालन्याशी त्यांचे एक घनिष्ठ नाते निर्माण झाले होते. त्यांना मिळालेली ‘कर्नाटक केसरी’ ही पदवी त्यांच्या दक्षिण भारतातील धर्मप्रसाराच्या कार्याचा गौरव करणारी होती.
गुरू गणेशलालजी महाराजांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळ असलेल्या अंदरसूल या गावातील एका ललवाणी कुटुंबात झाला होता. संन्यास घेण्यापूर्वी त्यांनी काही काळ नोकरी केली होती. नोकरीच्या काळात त्यांना पराधीनता जाणवली आणि स्वतंत्र राहून ईश्वराची सेवा करण्यासाठी त्यांनी नोकरीचा त्याग करून दीक्षा घेतली. विसाव्या शतकाच्या मध्यात जेव्हा जालन्यामध्ये जैन समाजाचा विस्तार होत होता, तेव्हा गुरू गणेशलालजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव या शहरावर मोठ्या प्रमाणावर पडला. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या सेवाकार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी १९६२ मध्ये ‘गुरू गणेश तपोधाम’ची संकल्पना मांडली गेली. या तपोधामचे व्यवस्थापन पाहण्यासाठी जालना शहरातील जैन समाजाने एकत्र येऊन ‘श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ’ नावाच्या ट्रस्टची स्थापना केली. अधिकृतपणे १९६६ मध्ये ‘श्री गुरू गणेश स्थानकवासी जैन शिक्षण समिती’ची नोंदणी करण्यात आली. या समितीचा मुख्य हेतू केवळ धार्मिक कार्य नसून शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती साधणे असा होता. सुरुवातीच्या काळात श्री पुखराजजी घमंडीराम रुणवाल,
गुलाबचंद वचनमल सुराणा आणि उदेरामजी हरकचंदजी रेडसानी यांसारख्या समाजसेवकांनी या कामात मोठा पुढाकार घेतला होता.
या तपोधामचा विकास गेल्या सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या अखंड परिश्रमाचे फळ आहे. १९६२ मध्ये जेव्हा या स्थानाची मुहूर्तमेढ रोवली गेली, तेव्हापासून आजपर्यंत इथे अनेक बदल झाले आहेत. सुरुवातीला हे एक साधे प्रार्थना स्थळ होते. परंतु भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे आणि गुरू गणेशजींच्या वाढत्या ख्यातीमुळे इथे एका भव्य संकुलाची निर्मिती करण्यात आली. या ट्रस्टने केवळ मंदिराची देखभाल न करता, समाजातील गरजू घटकांसाठी शाळा, अंध मुलांसाठी विशेष विद्यालय, ग्रंथालय आणि गोशाळा उभारली आहे. ‘श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ’ या संस्थेमार्फत चालवली जाणारी ही गोशाळा संपूर्ण मराठवाडा विभागातील सर्वात मोठी गोशाळा म्हणून ओळखली जाते. इथे शेकडो गाईंचे संगोपन प्रेमाने आणि शास्त्रीय पद्धतीने केले जाते. या गोशाळेत लाल कंधारी, थारपारकर, देवणी आणि गिर यांसारख्या विविध भारतीय वंशाच्या गाईंचे जतन केले जाते. या गोशाळेमुळे या भागातील पशुसंवर्धनाला मोठी चालना मिळाली आहे.
गुरू गणेश तपोधामची वास्तुकला ही आध्यात्मिक पावित्र्य आणि आधुनिक भव्यता यांचा एक सुंदर संगम आहे. जालना जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या तपोधामाभोवती तटबंदी आहे. या तटबंदीतील भव्य प्रवेशद्वारातून येथील प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात एक भव्य, पांढऱ्या शुभ्र रंगाची व वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील ‘अग्निशरण धाम’ ही वास्तू आहे. ही वास्तू आधुनिक मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक अत्यंत कल्पक आणि वैशिष्ट्यपूर्ण नमुना आहे. पारंपारिक जैन स्थापत्यशैली आणि आधुनिक ‘शेल स्ट्रक्चर’ यांचा एक अनोखा संगम येथे दिसून येतो. भारतीय मंदिर स्थापत्यात सामान्यतः नागर किंवा द्रविड शैलीतील शिखर आणि मंडप यांची चौकट असते, मात्र येथे प्रतीकात्मक वास्तुशिल्पाचा (Symbolic Architecture) अत्यंत प्रभावी वापर करण्यात आला आहे. ही संपूर्ण वास्तू एका उमलत्या कमळाच्या आकारात साकारलेली असून स्थापत्यशास्त्रात कमळाला पावित्र्य, अनासक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक मानले जाते. या वास्तूचा मुख्य घुमट हा कमळाच्या मोठ्या पाकळ्यांनी तयार झालेला आहे. स्थापत्यशास्त्राच्या भाषेत याला सेंद्रिय रचना (Organic Form) म्हणतात.
या पाकळ्यांची मांडणी अशी आहे की त्या जमिनीपासून वरच्या दिशेला वक्र होत जातात आणि मध्यभागी एकत्र येतात. वास्तूच्या प्रवेशद्वाराची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रवेशद्वारांऐवी येथे दोन पाकळ्यांच्या मधून निर्माण झालेली मोठी कमान आहे. प्रवेश करण्यासाठी लाल ग्रॅनाईट पाषाणाने बसवलेल्या सहा पायऱ्या आहेत. मुख्य वास्तूच्या छताकडे मध्यभागी निळ्या रंगाची पारदर्शक काच बसवण्यात आली आहे. नैसर्गिक प्रकाशाचा योग्य वापर करण्यासाठी केलेले ते एक तांत्रिक नियोजन आहे. या काचेमुळे वास्तूच्या आत मध्यभागी नैसर्गिक प्रकाश पोहोचतो. या वास्तूचा अंतर्गत भाग हा पूर्णपणे खांबविरहित आहे. जमिनीवर शुभ्र संगमरवरी पाषाणाचे आच्छादन व त्यावर अत्यंत सूक्ष्म रंगीत दगडांचे कोरीव काम केलेले आहे. वास्तूच्या मध्यभागी एक वर्तुळाकार चौथरा असून त्याला स्टेनलेस स्टीलचे कुंपण आहे. हे स्थान ‘कर्नाटक केसरी’ गुरू गणेशलालजी महाराज यांचे प्रत्यक्ष अंत्यसंस्कार झालेली भूमी आहे. जैन संत गुरू गणेशलालजी महाराजांच्या पार्थिवावर ज्या ठिकाणी अग्नी-संस्कार करण्यात आले, त्या ठिकाणची पवित्र रक्षा आणि माती या चौथऱ्यामध्ये सुरक्षितपणे जतन केलेली आहे.
गुरू गणेश तपोधाममध्ये वर्षभर अनेक धार्मिक उत्सव साजरे केले जातात. मौनी अमावस्या (माघ अमावस्या) हा येथील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या दिवशी संपूर्ण देशातून हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. मौनी अमावस्येला भाविक मोठ्या संख्येने दानधर्म करतात आणि मौन पाळून साधना करतात. अमावस्येच्या दिवशी येथे विशेष दर्शनाचे आयोजन केले जाते. जैन धर्मातील अत्यंत पवित्र मानले जाणारे ‘पर्युषण पर्व’ इथे मोठ्या उत्साहात साजरे होते. या आठ दिवसांच्या काळात तपोधाममध्ये उपवास, प्रवचन आणि साधनेची मोठी उपस्थिती असते. संवत्सरीच्या दिवशी हजारो लोक एकमेकांची क्षमा मागून अहिंसेचा संदेश देतात. याशिवाय महावीर जयंती आणि गुरू गणेशजींच्या पुण्यतिथीनिमित्त देखील विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. हे तपोधाम दर्शनासाठी दररोज २४ तास खुले असते.