नवी मुंबईतील बेलापूरच्या मध्ययुगीन किल्ल्यावर गोवर्धनी मातेचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. पेशवे काळात प्राणप्रतिष्ठापना झालेले हे नवी मुंबईतील एकमेव मंदिर समजले जाते. येथील वैशिष्ट्य म्हणजे १८६० पासून अखंडितपणे येथे नवरात्रोत्सव साजरा होत आहे. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी या देवीची ख्याती आहे. नवी मुंबईसह ठाणे व रायगड जिल्ह्यातील अनेक आगरी, कोळी, सोनार व ब्राह्मण कुटुंबीयांची ही देवी कुलदेवता आहे. सुंदर वास्तुशिल्पासाठीही हे मंदिर ओळखले जाते.
‘एकविसाव्या शतकातील शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई या नियोजनबद्ध शहरात पूर्वी अनेक गावे आणि पाडे वसलेले होते. बेलापूर हे त्यातील एक महत्त्वाचे गाव. पनवेल खाडीच्या तोंडावर असलेल्या या गावातील एका टेकडीवर जंजिऱ्याच्या सिद्दीने इ.स. १५६० ते १५७० या काळात हा किल्ला बांधला. यानंतर यावर पोर्तुगीजांचा कब्जा होता. तेव्हा बेलापूर हे शाबाज या नावाने ओळखले जाई. पोर्तुगीज कागदपत्रांत येथील किल्ल्याचा उल्लेख ‘सॅबॅजो’ असा आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू अनंत बाळाजी तथा चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मार्च १७३७ ते मे १७३९ या काळात काढण्यात आलेल्या वसईच्या मोहिमेच्या वेळी हा किल्ला पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी जिंकून घेतला.
ऐतिहासिक नोंदींनुसार, त्या वेळी किल्ल्यात पाच बुरूज होते व त्यावर ११ तोफा होत्या. त्याशिवाय बंदराच्या संरक्षणासाठी ९ तोफा होत्या. कल्याणचे सुभेदार वासुदेव जोशी (मुरुडकर) यांचे बंधू नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे चार हजार मराठा सैनिकांनी या किल्ल्यास वेढा दिला. सुमारे महिनाभर हा वेढा सुरू होता. नारायण जोशी यांची याबाबत ‘लोकांनी पाईकीची शर्थ केली’ अशी नोंद आहे. २६ एप्रिल १७३७ रोजी या किल्ल्यावर त्यांनी मराठ्यांचा जरीपटका फडकावला. २३ जून १८१७ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कॅप्टन चार्ल्स ग्रे यांनी तो ताब्यात घेतला. त्यावेळी ब्रिटिशांनी या किल्ल्याची मोठी नासधूस केली. याच बेलापूर किल्ले गावठाणात गोवर्धनी मातेचे मंदिर स्थित आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की सुमारे दोनशे वर्षांपूर्वी या परिसरातील रेतीबंदर येथे मासेमारी करताना येथील ग्रामस्थ रामा चिमाजी भगत यांना खाडीतील पाण्यात अखंड पाषाणातील देवीची मूर्ती सापडली होती. यानंतर देवीने भगत यांना दृष्टांत देऊन बेलापूर किल्ले गावठाण येथील किल्ल्यावर प्रतिष्ठापना करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी या जागेवर लहानसे मंदिर बांधून त्यात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. हे जुने मंदिर दगडी बांधकामाचे होते. या डोंगरावर येथील ग्रामस्थ गाई चरण्यासाठी आणत असत. त्यामुळे आपल्या गाई–गुरांचे सांभाळ, संगोपन करणारी व शेतकऱ्यांना सुखी–समृद्ध करणारी अशी ही देवी असल्याची येथील ग्रामस्थांची श्रद्धा होती. त्यामुळेच या देवीला गोवर्धनी माता असे नाव पडले.
गोवर्धनी मातेचे मंदिर हे खाडीच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर व मध्यम आकाराच्या टेकडीवर निसर्गसमृद्ध परिसरात स्थित आहे. हा संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला आहे. २००८ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे प्रशस्त व सुंदर स्वरूप प्राप्त झालेले आहे. गोवर्धनी मातेचे वैशिष्ट्यपूर्ण असे प्रवेशद्वार मंदिरापासून एक किमी अंतरावर आहे. नवी मुंबई महापालिका इमारतीपासून जवळ असलेले हे प्रवेशद्वार द्राविड म्हणजेच दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीतील आहे. प्रवेशद्वारांच्या स्तंभांवर नमस्कार मुद्रेतील प्रतिहारींची शिल्पे आहेत. मंदिरांच्या छोट्या प्रतिकृतींच्या रांगेने प्रवेशद्वाराचे छत सुशोभित केले आहे. त्यात मध्यभागी देवकोष्टकात मुरलीधर कृष्ण व त्याच्यामागे गाय असे उठावशिल्प आहे. त्याच्या डावीकडील कोष्टकात पुष्पचक्र आहे व उजवीकडे शंखशिल्र आहे. कलाकुसर व रंगसंगती यामुळे हे प्रवेशद्वार आकर्षक बनले आहे.
डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी सुमारे ५० पायऱ्या आहेत. याशिवाय मंदिराच्या मागच्या बाजूने थेट गाडी रस्ताही आहे. गोवर्धनी मातेच्या मंदिर वास्तूवर द्राविड स्थापत्य शैलीची मोठी छाप आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपात येण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या कठड्यावर पुढचे दोन पाय उंचावलेले व्यालशिल्पे आहेत. मंदिराचा मुखमंडप हा गोपुरासारखा आहे. द्रविड शैलीतील गोपुरम् हे मंदिराच्या परकोटात म्हणजे आवारभिंतीतील वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेले उंचच उंच असे प्रवेशद्वार. गोवर्धनी माता मंदिराच्या मुखमंडपावरील छतावर या गोपुरम्ची छाप आहे. मुखमंडपाच्या समोरील दोन स्तंभांमध्ये नक्षीदार तोरण आहे व त्याच्या मध्यभागी मोठे कीर्तिमुख आहे. या तोरणाच्या भिंतीवर दोन्ही बाजूंस देवदूतांची उठावशिल्पे आहेत. छतावर आयताकृती आकाराची व अत्यंत अलंकृत अशी त्रिस्तरीय रचना आहे. त्यातील खालच्या स्तरावर गणेशाची आणि कृष्णाची मूर्ती आहे, तर मधल्या स्तरावर मुरलीधर कृष्णमूर्ती प्रतिष्ठापित आहे.
या मुखमंडपातून मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा असला तरी बाजूने अनेक मोठ्या खिडक्या असल्याने येथे पुरेसा प्रकाश व हवा असते. सभामंडपात चकचकित संगमरवरी फरशी लावण्यात आल्याने या मंदिराचे सौंदर्य आणखी खुलते. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर एक मोठी पितळी घंटा लटकविण्यात आलेली आहे. त्यावर इंग्रजीत ‘वॉर्नर अँड सन्स लंडन 1832’ असे लिहिलेले आहे. या सभामंडपाच्या डावीकडे व उजवीकडे भाविकांना बाहेर पडण्यासाठी दोन दरवाजे आहेत. सभामंडपाच्या पुढील भागाकडे प्रदक्षिणा मार्ग सोडून देवीचे गर्भगृह आहे. गर्भगृहाबाहेर देवीची चांदीची उत्सवमूर्ती आहे.
गर्भगृह विशाल अशा देव्हाऱ्यासारखे आहे. त्याच्या समोरील भिंतीच्या दोन्ही कडेला सोनेरी रंग दिलेले चौकोनाकार स्तंभ आहेत. त्यांवर गजव्याल प्रतिमा चित्रित केलेल्या आहेत. त्याच्या आतील बाजूस गर्भगृहाचे कमानाकृती द्वार आहे. अर्धस्तंभांवर नक्षीकामाने अलंकृत अशी ही कमान आहे. कमान तसेच स्तंभांना सोनेरी रंगाने सुशोभित केले आहे.
गर्भगृहाच्या मध्यभागी उंच संगमरवरी वज्रपीठावर, मोरपंखी नक्षीने अलंकृत केलेल्या मखरामध्ये गोवर्धनी मातेची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या मखराच्या वरच्या बाजूवर कीर्तिमुख आहे. पूर्वाभिमुख असलेल्या गोवर्धनी मातेला चांदीचा मुखवटा, मस्तकी सोनेरी मुकुट आहे. देवीच्या उजव्या हातांमध्ये ढाल व त्रिशूल ही आयुधे आहेत. शेजारी गायीची मूर्ती आहे. विविध अलंकार व साडी नेसलेल्या या देवीचे रूप सुंदर भासते. देवीच्या उजवीकडे लहान वज्रपीठावर हनुमान व डावीकडे गणपतीची मूर्ती आहे.
मंदिराच्या बाह्यभिंती तसेच सभामंडपावरील छतही नक्षीकाम आणि आकर्षक रंगसंगतीने सुशोभित केलेले आहे. छतावर चोहोबाजूला गोपुरांच्या शैलीतील कोष्टकांची रचना केलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूला असलेल्या प्रांगणात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी केलेली आहे. त्यामुळे हा परिसर सुंदर भासतो. या प्रांगणात सभामंडपाच्या डावीकडील प्रवेशद्वाराजवळ एक उंबराचे प्राचीन झाड आहे. अनेक भाविक देवीचे दर्शन घेतल्यानंतर आवर्जून या झाडाचेही दर्शन घेतात. या प्रांगणातून परिसरातील मोठ्या भागाचे विहंगम दृश्य दिसते.
जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या नऊ दिवसांत या परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते. हजारो भाविकांकडून यावेळी देवीला नवसपूर्तीसाठी साडी, चोळी, हिरव्या बांगड्या अर्पण केल्या जातात. यावेळी विविध कार्यक्रम पार पडतात. त्यात महिलांसाठी हळदी–कुंकू समारंभ, पारंपरिक वेशभूषा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा सहभाग असतो. गोकुळाष्टमी उत्सवही येथे साजरा करण्यात येतो. दररोज सकाळी सात वाजता अभिषेक व देवीची आरती होते.