
श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या नाशिकमध्ये श्रीरामांची अनेक मंदिरे आहेत. त्यातील काळाराम मंदिर प्रसिद्ध आहे. काळारामप्रमाणेच येथे गोराराम, आणि गोरेराम ही मंदिरेही आहेत. यातील गोराराम मंदिर गोदावरीकाठी तर गोरेराम मंदिर काळाराम मंदिरापासून अवघ्या २ मिनिटांच्या अंतरावर आहे. ते ‘मुठे यांचे गोरेराम मंदिर’ म्हणून बहुश्रुत आहे. याशिवाय येथील सीतागुंफेजवळ गोरेराम (पर्णकुटी) मंदिर आहे.
गोराराम आणि गोरेराम मंदिर यांतील साम्य असे की ही दोन्ही मंदिरे पेशवाईत उभारली गेली. माधवराव पेशवे यांचे सरदार माधवराव हिंगणे यांनी १७८२ मध्ये गोराराम मंदिर, तर पेशवाईतील सरदार श्रीमंत मुठे यांनी गोरेराम मंदिर बांधले, अशा नोंदी आहेत. गोदावरीच्या तीरावरील निलकंठेश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या प्राचीन गोराराम मंदिरात जाण्यासाठी ३५ ते ४० पायऱ्या आहेत. या मंदिराच्या प्रवेशद्वारातून गोदावरीचा घाट व तेथील अनेक मंदिरे नजरेच्या टप्प्यात येतात. लाकडी बनावटीच्या या मंदिराची रचना सभामंडप व गर्भगृह अशी आहे. सभामंडपात मारुतीची मूर्ती असून गर्भगृहात श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहातील या मूर्ती शुभ्र संगमरवराच्या असल्यामुळे या मंदिराला गोराराम असे नाव पडल्याचे सांगितले जाते.
गोराराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर रामायणाचा सार असलेला श्लोक लावण्यात आला आहे, तो असा –
आदि राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्।
वैदीहीहरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणम्।।
बालीनिर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरीदाहनम्।
पश्चाद् रावण कुम्भकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्।।
(अर्थ : आपल्या वनवास काळात श्रीराम तपोवनात (नाशिक) आले आणि त्यांनी सुवर्णमृगाचा पाठलाग करून त्याचा वध केला. याच काळात सीतेचे रावणाने हरण केले, सीतेला त्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी जटायुला प्राण गमवावे लागले. श्रीरामांची येथेच सुग्रीवाशी मैत्री झाली व त्यांनी त्याचा भाऊ बाली याचा वध केला. समुद्रावर पूल तयार करून लंकाधीश रावण आणि कुंभकर्णाचा श्रीरामांनी वध केला.) हा एक श्लोक पठण केल्यावर संपूर्ण रामायण पठण केल्याचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गोराराम मंदिराच्या सभामंडपासमोरील प्रांगणात बसून अनेक भाविक या ‘एक श्लोकी रामायणा’चे पठण करत असतात.
पंचवटीतील सीता गुंफेपासून काळाराम मंदिराच्या रस्त्यावर पेशव्यांचे सरदार श्रीमंत मुठे यांचे गोरेराम मंदिर आहे. पेशवाईच्या कालखंडात अनेक सरदारांनी गोदाघाटावर त्यांच्या घराण्यांची मंदिरे बांधली. त्यातील श्रीमंत मुठे यांच्या घराण्याचे हे मंदिर होय. हे मंदिर म्हणजे रस्त्यास लागून असलेला भव्य दुमजली वाडा आहे. दगडी पाया, सागवानी लाकूड, गेरू रंगाच्या भिंती, उंच खिडक्या, भिंतीस असलेले कोनाडे, आतील भिंतींवरील लाकडी खुंट्या, भक्कम सागवानी प्रवेशद्वार, असा हा वाडा पाहताक्षणीच त्याच्या पेशवेकालीनत्वाची साक्ष देतो.
मुख्य प्रवेशद्वाराच्या आत लहानसे फरसबंदीचे प्रांगण आहे. त्यात हनुमानाचे छोटेसे मंदिर व साधूंच्या तीन समाध्या आहेत. येथून काहीसे उंचावर गोरेराम मंदिर आहे. सभामंडपात भक्कम लाकडी खांब, त्या खांबांमध्ये काष्ठशिल्पांनी सजलेल्या लाकडी कमानी व खांबांवरील तुळ्या, हे सारे प्राचीन वास्तुरचनेच्या सौंदर्याची जाणीव करून देतात. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेच्या खालील बाजूस कीर्तिमुख कोरलेला असून आत प्राचीन शिवलिंग आणि त्यासमोर श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या संगमरवरी शुभ्र मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या डाव्या बाजूस श्रीविष्णूंचे मंदिर आहे. मंदिर-वाड्यातच प्रदक्षिणा मार्ग असून त्याच्या उत्तरेला बाह्य भागात मकरमुख आहे. गाभाऱ्याच्या मागच्या बाजूस माडीवर जाण्यासाठी जिना आहे.
या मंदिरात गोरेरामाच्या दर्शनासाठी शेगावचे संत गजानन महाराज येऊन गेले होते, अशी नोंद श्री ‘गजानन विजय’ या ग्रंथात आहे. सिंहस्थाच्या काळात येथे साधू-संतांचा, भाविकांचा मोठा राबता असतो. रामनवमी हा येथील प्रमुख उत्सव आहे. या दिवशी भजन, कीर्तन असे कार्यक्रम येथे होतात. रात्री उशिरापर्यंत हा सोहळा रंगतो. त्रिपुरारी पौर्णिमेस मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात येते. स्वाध्याय परिवाराच्यावतीनेही येथे विशेष कार्यक्रम होतात. मंदिरात सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान भाविकांना दर्शन घेता येते. सकाळी ६ वाजता अभिषेक, पूजा सुरू होते.