महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक इतिहासात नाथ संप्रदायाचे स्थान अनन्यसाधारण आहे. संप्रदायाच्या प्रसारासाठी गोरक्षनाथांनी संपूर्ण देशभर भ्रमण करून जागोजागी मठांची आणि मंदिरांची निर्मिती केली. त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नाथ संप्रदायी व नवनाथांची मंदिरे आहेत. शिरपूर तालुक्यातील करवंद येथील अरुणावती नदीच्या तीरावर वसलेले गोरक्षनाथांचे मंदिर हे त्यातीलच एक होय. प्रत्यक्ष गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात आजही गोरक्षनाथांचे सूक्ष्म रूपात वास्तव्य आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीशैल कर्दलीबन ही नाथ संप्रदायाची उदयभूमी व आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्र ही प्रथम लीलास्थली मानली जाते. गुरू गोरक्षनाथ हे या संप्रदायाचे प्रवर्तक आहेत व मत्स्येंद्रनाथ (मच्छिंद्रनाथ) हे त्यांचे गुरू होत. थोर संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ या ग्रंथानुसार इ.स. १०५० ते ११५० हा गोरक्षनाथांचा काळ आहे. गोरक्षनाथ यांनी ‘अमनस्क’, ‘अमरौघप्रबोध’ आदी संस्कृत तसेच हिंदी भाषेत ग्रंथांचे लेखन केले आहे. ‘गोरखबोध’ हा त्यांच्या तत्त्वविचारांचा सुप्रसिद्ध ग्रंथ आहे. ढेरे यांच्या मते, वज्रयान, सहजयान, शाक्त, कापालिक आदी वामाचारी तंत्रसाधनांविरुद्ध आंदोलन उभे करून गोरक्षनाथांनी भारतीय साधनेचे शुद्धीकरण केले. अशा थोर क्रांतिकारी सिद्धपुरूषाचे करवंद येथील मंदिर नाथ सांप्रदायिकांचे महत्त्वाचे तीर्थ आहे.
करवंद येथील गोरक्षनाथ मंदिर हे सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे आहे. असे सांगितले जाते की शैवउपासक असलेले गोरक्षनाथ यांनी स्वतः येथील शिवमंदिराची स्थापना केली होती. तेव्हापासून येथे गुरु–शिष्य परंपरा कायम आहे. त्यामुळेच मंदिराच्या परिसरात नाथपंथीय परंपरेतील गुरूंच्या दहा संजीवन समाध्या आहेत. येथील गोमुखातून निघणाऱ्या पाण्याने अनेक आजार बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी या गोमुखाजवळ दही, दूध आणि तूप देणाऱ्या तीन अखंड धारा होत्या. कालांतराने त्या बंद झाल्या.
करवंद गावाच्या वेशीवर असलेल्या या मंदिरासमोर तटबंदीविरहीत प्रशस्त व उंच–सखल असे प्रांगण आहे. या संपूर्ण प्रांगणात पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे. प्रांगणाच्या पुढील उंच भागात असलेल्या महादेव मंदिरात जाण्यासाठी सुमारे २५ पायऱ्या व दोन्ही बाजूस सुरक्षा कठडे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चौथऱ्यावर नंदी विराजमान आहे व त्याच्या शेजारी सुमारे १५ फूट उंचीचा त्रिशूळ व डमरू आहेत. या प्राचीन मंदिराला आधुनिक पद्धतीचे रंगकाम केलेले आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे काहीसे अरुंद आहे. गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर असलेली स्वयंभू शिवपिंडी पितळी पत्र्याने मढविलेली आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग व बाजूला त्रिशूल आहे. मागील भिंतीजवळ गणपतीची मूर्ती आहे. या मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे.
शिवमंदिराच्या मागील बाजूने सुमारे १५ पायऱ्या उतरून गोरक्षनाथ मंदिराच्या प्रांगणात येता येते. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात (गूढमंडप) हवा खेळती राहण्यासाठी गवाक्षे आहेत. सभामंडपात मध्यभागी अखंड अग्नी प्रज्वलीत असलेली धुनी आहे. धुनीसमोर भिंतीलगत वज्रपिठावर नाथ संप्रदायातील गुरूंच्या तसबिरी आहेत. पुढे गुंफासदृश गर्भगृहाचे अरूंद प्रवेशद्वार आहे. आतील अरूंद गुंफेत भिंतीलगत असलेल्या वज्रपिठावर नवनाथांचे शेंदूरचर्चित स्वयंभू पाषाण आहेत. वज्रपिठामागे असलेल्या देवकोष्टकात गोरक्षनाथांचे रंगीत चित्र आहे.
मंदिराच्या छतावर चार थरांचे अष्टकोनी शिखर आहे. पहिल्या तीन थरात प्रत्येकी आठ देवकोष्टके व त्यात नाथ गुरूंच्या मूर्तीं आहेत. चौथ्या थरात एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आहे. मंदिरासमोर गोरक्षनाथांच्या शिष्याची समाधी आहे. या मंदिरासमोर सप्तऋषी मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात तिन्ही भिंतीलगत जमदग्नी, विश्वामित्र, अत्री, वसिष्ठ, भारद्वाज, कश्यप आणि गौतम ऋषी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराला लागून बारा ज्योतिर्लिंगांचे स्थान आहे. मंदिराच्या प्रांगणात भाविकांसाठी भक्तनिवास व निवारा छत उपलब्ध आहे.
गोरक्षनाथ मंदिराच्या मागील बाजूने सुमारे २५ पायऱ्या उतरून गोमुखाकडे जाता येते. येथे असलेल्या आयताकृती कुंडाच्या कठड्यावर स्थानिक देवतांच्या दोन प्राचीन मूर्तीं आहेत. कुंडातील गोमुखातून नैसर्गिक जलप्रवाह अखंड वाहत आहे. गोरक्षनाथ मंदिरापासून जवळच करवंद गावात नाथपंथीय मठ आहे. येथे नाथपंथीय गुरु–शिष्य परंपरेतील दहा गुरुंच्या संजीवन समाध्या आहेत. मंदिरात महाशिवरात्री, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती आदी वार्षिक उत्सवांचे आयोजन केले जाते. श्रावणी सोमवार व इतर सणवारास भाविकांची येथे मोठी गर्दी होते.