गोपाळकृष्ण मंदिर

गोपाळपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

पंढरपूर आणि पांडुरंगाचे महत्व विषद करणारे संदर्भ अनेक ग्रंथांत आहेत. छांदयोग, पद्मपुराण आदी ग्रंथांत पांडुरंगाचा उल्लेख येतो. नारद आणि आदिशेष यांच्या चर्चेत पंढरपूर, पांडुरंग आणि भीमा नदीचा उल्लेख आढळतो. नारद मुनी म्हणतात नीरा नरसिंहपूर प्रयागसमान, कोर्टी विष्णुपाद गयेसमान आणि पंढरपूर हे काशी समान पवित्र तीर्थक्षेत्र आहे. स्कंद पुराणात पंढरपूर हे सर्व तीर्थांहून श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. अशा या पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूर येथील प्राचीन गोपाळकृष्ण मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या वर्षातील चार प्रमुख एकादशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी गोपाळकाला सेवनासाठी भाविक या मंदिरात येतात.
हे मंदिर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला समकालीन असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते तेराव्या शतकातील असावे, असा अंदाज वर्तविला जातो. मंदिराबाबत अख्यायिका अशी की राधेला देवाच्या मांडीवर बसलेली पाहून रुक्मिणीला राग अनावर झाला व ती द्वारका सोडून पंढरपुरातील दिंडीरवनात येऊन बसली. तिला शोधण्यासाठी आलेला श्रीकृष्ण आपल्यासोबत गाई घेऊन आला. येताना तो विष्णुपाद येथे गाईंसोबत नाचला. त्यामुळे येथे श्रीकृष्णाच्या व गाईंच्या पावलांचे ठसे उमटले
आहेत. येथून देव गोपाळपूर येथील गोवर्धन पर्वतावर गेले. तेथे देवाने कृष्णरूपाचा त्याग करून विठ्ठलरूप धारण केले. त्यामुळे येथील मूर्तीत विठ्ठल व श्रीकृष्ण यांच्या रूपांचा संगम पहायला मिळतो. म्हणून हे मंदिर धार्मिक दृष्ट्या महत्वाचे मानले जाते. याच ठिकाणी रुक्मिणीचे आई-वडील तिला भेटायला कौंडिण्यपुरातून आले होते.
दुसऱ्या अख्यायिकेनुसार, संत जनाबाईंची किर्ती ऐकून संत कबीर या मंदिर परिसरात त्यांना भेटले होते. जनाबाई या संत नामदेवांच्या घरी राहायच्या. त्यांच्याकडे कामे करीत असताना त्या गोपाळपुरात गोवऱ्या थापण्यासाठी येत असत. संत कबीर जनाबाईच्या शोधात भीमा नदीच्या काठी गोपाळपुरात आले असता तेथे जनाबाईंसोबत एक महिला गोवऱ्या चोरल्याचा आरोप करून भांडत होती. त्यावर जनाबाईंनी संत कबीरांना मध्यस्ती करण्याची विनंती केली. ज्या गोवरीतून ‘विठ्ठल, विठ्ठल’ असा आवाज येईल ती गोवरी माझी असेल, असे तिने सांगितले. कबीरांनी गोवऱ्या कानाला लावल्या असता त्यातून ‘विठ्ठल… विठ्ठल…’ असा आवाज येत होता. असे सांगितले जाते की ही घटना या मंदिर परिसरात घडली होती.
पंढरपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर गोपाळपूर येथील गोवर्धन टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेला प्रशस्त पायरीमार्ग आहे. पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूस लोखंडी नळ्या लावून सुरक्षा कठडा तयार करण्यात आलेला आहे. सुमारे दहा पायऱ्यांवर संत नामदेवांचे वडील दामाजी शेट यांची मूर्ती आहे. यांच्याच पदरी संत जनाबाई यांनी सेवा केली होती. मंदिराभोवती भक्कम तटबंदी व या तटबंदीत खिडक्यांची व्यवस्था आहे. तटबंदीतील मोठ्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडी बांधणीच्या दीपमाळा आहेत. प्रांगणात तटबंदीला लागून चारही बाजूंना ओवऱ्या आहेत. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी गोपाळकृष्ण मंदिराची संरचना आहे. प्रांगणापेक्षा उंच असलेल्या सभामंडपात येण्यासाठी मुखमंडपात पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे व त्यावर नक्षीदार स्तंभ आहेत. सभामंडपाची समोरील बाजू खुली आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत व स्तंभांच्या शीर्षभागी कणी, त्यावर हस्त, तुळई व छत आहे.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पर्णलता, पुष्पलता व स्तंभनक्षी आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारावरील तोरणात शिखरशिल्पे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर असलेल्या नक्षीदार मखरात विठ्ठलाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. हातात बासरी असलेली ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशी मान्यता आहे की येथेच देवाने बासरी खाली ठेऊन श्रीकृष्णरूप त्यागले व विठ्ठलरूप धारण केले. याच ठिकाणी श्रीकृष्णाने साधूसंत व इतर भक्तांच्या सोबत काला करून प्रसादभक्षण केला होता. या मूर्तीच्या मागील प्रभावळीतील नक्षीत पानेफुले व पशुपक्षी कोरलेले आहेत. ही मूर्ती नक्षीदार मखरात विराजमान आहे. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे गोलाकार शिखर व शिखराच्या प्रत्येक थरांत चार दिशांना चार देवकोष्टके आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक, त्यांवर कळस व ध्वजपताका आहे.
गोपाळकृष्ण मंदिरासमोर खुल्या स्वरूपाचा दगडी मंडप आहे. या मंडपातील चौथऱ्याच्या वर छताला टांगलेल्या पितळी हंडीतील लाह्यांचा प्रसाद भाविक श्रद्धेने ग्रहण करतात. असे सांगितले जाते की पंढरपुरात आल्यानंतर येथील काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय वारीचे पुण्य प्राप्त होत नाही. या मंदिराच्या बाजूला महादेवाचे मंदिर व त्यासमोर नंदीमंडप आहे. येथे काळ्या पाषाणातील नंदीच्या दोन मूर्ती आहेत. याबाबत अख्यायिका अशी की यातील एक नंदी हा महादेवाचा व दुसरा रुक्मिणीच्या आई वडिलांनी म्हणजेच राजा भीष्मक व राणी शुद्धमती यांनी महादेवास अर्पण केलेला आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी पश्चिममुखी महादेव मंदिराची रचना आहे. मंदिर प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे मुखमंडपात येण्यासाठी पायऱ्या आहेत. सभामंडप समोरील बाजूने खुला आहे. डाव्या व उजव्या बाजूला भिंतीत दरवाजे आहेत. मुखमंडपात दोन स्तंभ व सभामंडपात प्रत्येकी चार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत व ते स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध आकारांत आहेत. सभामंडपात शनिदेवाची मूर्ती व त्यापुढे रामेश्वराची पिंडी आहे. गर्भगृहात पश्चिममुखी शिवपिंडी व मागील भिंतीलगत रुक्मिणी, वडील राजा भीष्मक व आई शुद्धमती यांच्या पितळी मूर्ती आहेत. असे सांगितले जाते की याच ठिकाणी रुक्मिणी व तिच्या आई-वडिलांनी महादेवाचा अभिषेक केला होता. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे चौकोनी शिखर व शिखरात स्तंभ रचना आहे. शिखराच्या वरील थरात घुमट व त्याभवती सहा घुमटाकार लघू शिखरे आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.
महादेव मंदिराच्या शेजारी दत्त मंदिर आहे. येथील वज्रपिठावर त्रिमूर्ती दत्तात्रयांची मूर्ती आहे. येथून पुढे बंदिस्त ओवरीत जनाबाईचा संसार आहे. येथे मातीची चूल, मडक्यांची उतरंड, गोवऱ्या, पाटी, टोपली आदी वस्तू व बाजूच्या ओवरीत जनाबाईंचे जाते ठेवलेले आहे. भाविक श्रद्धेने हे जाते फिरवतात. येथून पुढे दुसऱ्या एका ओवरीत श्रीकृष्णाचा पाळणा टांगलेला आहे. श्रावण वाद्य अष्टमीस कृष्णजन्मोत्सव साजरा केला जातो. प्रांगणात मध्यभागी भुयारी कक्ष आहे. अशी मान्यता आहे की जनाबाई देवावर रुसून येथे बसली होती तेव्हा देव जनाबाईंचा रुसवा काढण्यासाठी येथे आले होते. येथे वज्रपिठावर संत जनाबाई व विठ्ठल यांच्या मूर्ती आहेत. गोपाळकृष्ण मंदिरापासून काही अंतरावर एका प्राचीन पाषाणी मंडपात ताकाची घुसळण आहे. असे सांगितले जाते की संत जनाबाई येथे ताक घुसळून देवाला लोणी देत असे. येथे आलेले भाविक श्रद्धेने ही घुसळण फिरवतात.
आषाढ शुद्ध दशमी ते आषाढ शुद्ध चतुर्दशी या काळात आलेल्या सर्व पालख्यांचा मुक्काम पंढरपूरात असतो. पंढरपूर मुक्कामी रोज सकाळी पादुकापुजन, सकाळी व संध्याकाळी कीर्तन आणि रात्री जागर होतो. द्वादशीच्या दिवशी सकाळी उपवास सोडला जातो व रात्री किर्तनानंतर खिरापत होते. त्रयोदशी, चतुर्दशीलाही भजन, किर्तन असे कार्यक्रम होतात. वारकरी परंपरेत सर्व उत्सवांची सांगता काल्याने होत असते. आषाढी वारीही त्याला अपवाद नाही. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पंढरपूरहून पालख्या गोपाळपूरला काल्यासाठी येतात. या काल्यानंतर वारीची सांगता होते. कार्तिकी वारीची समाप्तीही कार्तिक पौर्णिमेला येथील काल्याने होते.
गोकुळाष्टमी, आषाढी व कार्तिकी एकादशी हे येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांतून लाखो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. वर्षभरातील सर्व सण व उत्सव येथे साजरे केले जातात. प्रत्येक एकादशीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते. उत्सवकाळात सकाळी ४ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत हे मंदिर खुले असते.

उपयुक्त माहिती

  • पंढरपूर बस स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • पंढरपूर रेल्वे स्थानकापासून ३.५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून पंढरपूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home