गोंदेश्वर मंदिर,

सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक

अवघ्या महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या नाशिकमध्ये विविध कालखंडातील मंदिरे आहेत. त्यातील सिन्नर शहराचे केंद्रबिंदू असलेले यादवकालीन गोंदेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट कलाविष्कार असलेले गोंदेश्वर हे एक ‘शिवपंचायतन’ म्हणजे पाच मंदिरांचा समूह आहे. हे अनोखे दगडी सौंदर्यशिल्प ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराशी साम्य सांगणारे आहे.

गोंदेश्वर मंदिराला यादवकाळातील राजवटीची पार्श्वभूमी आहे. राजे राव सिंघूजी यांनी सिन्नर हे शहर वसविले होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजा राव गोविंदा यांनी बाराव्या शतकात हे मंदिर बांधले होते. या मंदिराचे बांधकाम येथीलच काळ्या बेसॉल्ट खडकापासून करण्यात आले. त्यावेळी मंदिर बांधणीसाठी दोन लाख इतका खर्च झाला होता, असा उल्लेख आहे. त्यांच्या नावावरूनच मंदिराला ‘गोंदेश्वर’ हे नाव पडले. काही इतिहास अभ्यासकांच्या मते, गोंदेश्वराचे हे मंदिर चालुक्य राजवटीतील म्हणजे साधारण ३००० वर्षांपूर्वीचे असावे.

मंदिराला तटबंदी असून दक्षिणेकडे मुखमंडप व प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला आतल्या बाजूने खोल्या आहेत. असे सांगितले जाते की, पूर्वी इथे यज्ञशाला होती. या मंदिराची रचना शैव पंचायतन शैलीची आहे. या शैलीमध्ये मुख्य मंदिराच्या चारही बाजूच्या कोपऱ्यांमध्ये आकाराने काहीशी लहान मंदिरे असतात. गोंदेश्वराचे मंदिर १२५ x ९५ फूट आकाराच्या आयताकृती मोठ्या दगडी व्यासपीठावरील पृष्ठभागावर उभारण्यात आले आहे. पायथ्याशी अनेक हत्तींची मुखशिल्पे असून त्यावर साऱ्या मंदिराचा डोलारा उभा असल्याचा भास होतो. त्यावरील थरात मानवी शिल्पांची कलाकुसर, त्यावरील थर देवकोष्टकांचा व तेथून पुढे नक्षीकाम केलेले आहे.

पूर्वाभिमुख असलेले महादेवाचे मुख्य मंदिर भूमीज शैलीतील आहे. (एकावर एक अशी लहान-लहान शिखरांची रचना म्हणजे भूमीज शैली). आग्नेयेस विष्णू, नैऋत्येस गणपती, वायव्येस देवी आणि ईशान्य दिशेला सूर्य अशी चार मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील पहिले भूमीज शैलीतील मंदिर अंबरनाथ येथे असून त्यानंतर गोंदेश्वर मंदिराचा क्रमांक लागतो. अंबरनाथ आणि गोंदेश्वर या दोन्ही मंदिरांमध्ये अनेक साम्य आढळून येतात. या मंदिरात तीन बाजूंनी म्हणजे पूर्व, पश्चिम व उत्तर दिशेने प्रवेश करता येतो. पूर्वेकडे असलेल्या प्रवेशद्वारातून आत जाताना मुख्य मंदिरासमोर कोरीव दगडी शिल्पयुक्त नंदीमंडप आहे. तेथे अनेक सूरसुंदरी व रामायणातील शिल्पे कोरलेली आहेत. नंदीमंडपाजवळ एक शिवलिंग आहे. तेथून पुढे सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात असलेल्या चार खांबांवर विविध देव-देवता, यक्ष, गंधर्व यांची सुबक शिल्पे आहेत. येथील एका शिल्पात एक प्रेमीयुगुल शृंगार करताना दिसत असून बाजूला एक ललना पाठ करून, तर एक ललना डोळे झाकून उभी आहे. दुसऱ्या शिल्पात एक माता आपल्या बाळाला जोजवतानाचे दृश्य आहे. अशी वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे येथे जागोजागी दिसतात. मंदिराच्या अंतराळातही अशीच कलाकुसर पाहायला मिळते.

अंतराळातून गर्भगृहात जाताना प्रवेशद्वारावर द्वारपालाच्या शिल्पांसोबतच अनेक भौमितिक रचनांचे कोरीव काम दिसते. गर्भगृहात काळ्या पाषाणातील शिवलिंग आहे. रथसप्तमीला (माघ शुद्ध सप्तमी) येथे किरणोत्सव साजरा केला जातो. त्यावेळी चार दिवस सूर्याची किरणे सकाळच्या वेळी काही काळ शिवलिंगावर स्थिरावतात. गाभाऱ्याच्या आतील घुमटाकार भागावर कमलपुष्प कोरलेले दिसतात.

मुख्य मंदिरातून बाहेर पडताना भिंतींवर रामायणातील अनेक प्रसंगांची कोरीव शिल्पे, मैथुनशिल्पे व युद्धशिल्पे दिसतात. मुख्य मंदिर हे पायथ्यापासून शिखरापर्यंत शेकडो शिल्पांनी सजलेले आहे. शिखरावर वेलबुट्टीची नक्षी आहे. तसेच शिखरावर तांडवनृत्य करताना शिव आणि इतर मूर्ती आहेत.

गोंदेश्वर मंदिराच्या बाह्यभागावर अप्सरा, तसेच देवी-देवतांची प्रतिमाशिल्पे, नृत्य करताना नृत्यांगना आणि ब्रह्मदेव, तसेच लोणी घुसळताना स्त्रिया, हंसावर आरूढ असलेली सरस्वती, गजलक्ष्मी अशा देवी-देवतांची आणि तत्कालीन समाजजीवन दर्शविणारी शिल्पे आहेत. मुख्य मंदिरापासून काही अंतरावर गणपती, पार्वती, सूर्य व विष्णू यांची मंदिरे आहेत. स्वतंत्र सभामंडप व गर्भगृह असलेल्या या चारही मंदिरांवर मुख्य मंदिराप्रमाणेच कोरीव कलाकुसर आहे. या मंदिरांच्या आत व बाह्य भिंतींवरही अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. पहिल्या मंदिरात गणेशाची पाषाणातील मूर्ती आहे. दुसऱ्या मंदिरात अलंकार ल्यालेली पार्वती मातेची आकर्षक मूर्ती आहे. सूर्यमंदिर पश्चिमाभिमुखी असून मावळत्या सूर्याची किरणे वर्षातील काही दिवस मूर्तीवर पडतात. विष्णूमंदिरासह ही सर्व मंदिरे कलाकुसरीने युक्त आहेत.


मुख्य मंदिरातील शिवलिंगावरील अभिषेकाचे पाणी बाहेर पडण्याच्या मार्गावर मकरमुख (मगरीचे तोंड) आहे. मकर मुखातून आलेले पाणी आसपासच्या शेतांमध्ये व झाडांसाठी जाईल, अशी रचना केलेली दिसते. असे सांगितले जाते की, चक्रधरस्वामींनी तप करण्याकरिता या मंदिरात चार महिने वास्तव्य केले होते. सरकारच्या पुरातत्त्व विभागाने हे मंदिर संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. मंदिरात श्रावणातील सोमवारी व महाशिवरात्रीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.


उपयुक्त माहिती:

  • नाशिकपासून ३० किमी, तर नाशिक रोड रेल्वेस्थानकापासून २३ किमी अंतरावर
  • नाशिकहून सिन्नरसाठी एसटी व महापालिका परिवहन बसची सुविधा
  • सिन्नर बसस्थानकापासून २ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home