नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील टाकळी हे गाव ‘रामदासांची टाकळी’ म्हणून प्रसिद्ध आहे. गोदावरी आणि नंदिनी नद्यांच्या संगमावर ‘श्री स्वामी समर्थ मठ’ आहे. या मठातच समर्थ रामदासांनी स्थापन केलेली गोमय हनुमानाची मूर्ती आहे. रामनवमीच्या दिवशी १६३३ मध्ये रामदास स्वामींनी स्थापन केलेले हे पहिले मंदिर आहे.
समर्थ रामदास स्वामी (नारायण ठोसर) यांचा जन्म २४ मार्च १६०८ साली रामनवमीच्या दिवशी जालना जिल्ह्यातील जांब या गावात झाला. स्वतः श्रीरामाने त्यांना राममंत्राचा अनुग्रह दिल्याचे म्हटले जाते. स्वत्व जाणण्यासाठी मायामोहापासून ते दूरच राहिले व आजन्म ब्रह्मचारी राहिले. संत तुकाराम महाराजांचे समकालीन व छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरू, अशी समर्थ रामदासांची विशेष ओळख आहे. आध्यात्मिक कार्याबरोबरच तत्कालीन राजकीय व सामाजिक घडामोडींकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. परमार्थ, स्वधर्मनिष्ठा व राष्ट्रप्रेम यांच्या प्रसार व प्रचाराकरिता ते सतत कार्यरत राहिले.
ऐन तारुण्यात १६२० ते १६३३ या काळात समर्थ रामदास घर सोडून टाकळी गावात नाव बदलून राहिले. येथे त्यांनी १२ वर्षे तपश्चर्या केली. श्रीराम व हनुमान यांचे ते निस्सीम भक्त होते. कमरेला लंगोटी, कौपिनदरी, कमंडलू आणि खांद्यावर झोळी असा त्यांचा वेष असे.
टाकळी गावात असताना रोज सकाळी स्नान व सूर्यनमस्कार आटोपून ते नदीपात्रात छातीभर पाण्यात उभे राहून ध्यानधारणा करत असत. दुपारी वैदिक विषयांवर साधूंशी संवाद व चर्चासत्र होत असे. सायंकाळी गावातील राम मंदिरात ते कीर्तन-प्रवचन ऐकायला जात. रात्री पुन्हा उशिरापर्यंत त्यांचे नामस्मरण सुरू असे.
मोरगाव येथील गणपतीला पाहून रामदास स्वामींना ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ ही आरती स्फुरली. या आरतीमुळे जगभरातील गणेशभक्तांच्या मनात समर्थांनी आपले स्थान निर्माण केले.
रामदास स्वामी यांच्याबद्दल एक आख्यायिका अशी की टाकळीत ध्यानधारणा करून परतत असताना अन्नपूर्णा नावाची एक महिला रामदास स्वामींच्या पायांवर पडून रडू लागली. पतीच्या निधनामुळे ती आकांत करत होती. स्वामींनी निपचित पडलेल्या या स्त्रीचा पती गिरीधर कुलकर्णी याच्या चेहऱ्यावर ‘श्रीरामाची इच्छा’ असे बोलून आपल्या कमंडलूतील पाणी शिंपडले. त्याबरोबर झोपेतून उठून बसावे तसे गिरीधर उठून बसले. या घटनेमुळे रामदास स्वामींची कीर्ती सर्वत्र पसरली. कुलकर्णी दाम्पत्याने आपला पहिला पुत्र रामदास स्वामींना अर्पण केला. तो मुलगा म्हणजे स्वामींचा प्रथम शिष्य उद्धव महाराज होय. समर्थांचा शिष्य संप्रदाय येथून पुढे महाराष्ट्रात पसरला.
टाकळी गावचा निरोप घेऊन पुढील कार्यासाठी निघताना रामदास स्वामींनी गोमययुक्त (शेण व माती यांचे मिश्रण) हनुमान मूर्ती स्वतः बनवून त्याची स्थापना केली. तो दिवस होता रामनवमीचा. त्यानंतर पुढे समर्थांनी जेथे जेथे मठ स्थापन केले त्या सर्वाना ‘टाकळी’ हे बिरूद लावले. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात १२ हनुमान मंदिरे स्थापन केली. पर्यावरणविषयक जागृतीसाठी त्यांनी प्रबोधनात्मक लेखन केले. समाजात तरुणांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगाभ्यासाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी हनुमान मंदिरे बांधली आणि योगवर्गही सुरू केले. ते स्वतः रोज १२०० सूर्यनमस्कार घालीत.
टाकळीतील मठ चारशे वर्षांपूर्वीचा असल्याचे मठाच्या बांधकामावरून लक्षात येते. नंदिनी नदीच्या प्रवाहालगतच हा मठ आहे. मठात प्रवेश करताना काही पायऱ्या चढून जावे लागते. आवारात एक मोठे झाड असून तेथे पारावर शिवलिंग व नंदीची मूर्ती आहे. गोमय हनुमान मंदिर २५ x १५ फुटांचे आहे. येथील हनुमानाची ९ फूट उंचीची गोमययुक्त मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. डावा हात छातीवर व उजवा हात अभयमुद्रेत अशी हनुमानाची मूर्ती फारच क्वचित असते. रामदास स्वामींचे शिष्य उद्धव स्वामींनी तहहयात या मंदिराची सेवा केली.
गोमय मारुती मूर्ती आहे त्याच्या तळ मजल्यावर समर्थ साधना करीत ती छोटी गुहा, त्यांच्या पुजेतील रामाची मूर्ती व त्यांचे विश्रांती स्थान आहे. त्यांच्या पादुका व मीटरभर उंचीचा योगदंडही येथे पाहायला मिळतो. मंदिराच्या प्रांगणात राम-सीता, लक्ष्मण, हनुमान, गणपती यांची छोटी मंदिरे आहेत. रामदास स्वामींच्या पादुकांची नित्यनेमाने येथे पूजा केली जाते. मठात दासनवमी, रामनवमी व हनुमान जयंती जल्लोषात साजरी होते.