विघ्नहर्ता गणराय हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत. कोकणात तर गणेशावरील प्रेम आणि भक्ती येथील सागराएवढीच. होळीप्रमाणेच गणेशोत्सवात अवघे कोकण गणेशमय होऊन जाते. आपल्या ‘लाडक्या बाप्पा’च्या या उत्सवासाठी कोकणी माणूस कोठूनही, काहीही व कसेही करून त्याच्या मूळ गावी कोकणात येण्याचा प्रयत्न करतोच. गणेशावरील या अशा भक्तिमय प्रेमातूनच मालवणातील एका गणेशभक्ताने येथे चक्क सुवर्ण गणेशाचे मंदिर उभारले आहे. या गणेशभक्ताचे नाव आहे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर.
ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांना ‘कालनिर्णय’कार म्हणूनही महाराष्ट्र ओळखतो. इ.स. १९७२ मध्ये सुरू केलेली ही दिनदर्शिका आज कोट्यवधी घरांच्या भिंतीवर झळकताना दिसते. ज्योतिर्भास्कर साळगावकर हे मूळचे मालवणचे. ज्योतिषी, शब्दकोडेकार, संपादक, लेखक तसेच पंचांगकर्ते असलेले साळगावकर हे मोठे गणेशभक्तही होते. १९८९ च्या कालनिर्णयमध्ये त्यांनी गणपतीबद्दल लिहिले होते, ‘रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये त्रिखंडात मान्य झाली आहेत ती त्यांचे नायक असे लोकोत्तर महापुरुष आहेत म्हणून. अशीच एक लोकोत्तर विभूती म्हणजे श्रीगणेश. परमेश्वर–पार्वतीचा हा पराक्रमी पुत्र दुष्टदुर्जनांचे निर्दालन करून विश्ववंद्य झाला. गजानन गणेश हा देवांचा सेनापती. केवळ रणक्षेत्रातच नव्हे तर कलाक्षेत्रातही अग्रस्थानाचा अधिकारी. संगीत, नृत्य, नाट्य इत्यादी सर्व कलांचा प्रथमपदाचा मानकरी. आपण त्याला पूजतो ते तो असा गुणाधीश आहे म्हणून.’
या गुणाधीशाची सेवा ते अनेक पद्धतीने करीत असत. गणेश ही विद्या आणि कलेची देवता आहे. त्याचबरोबर गणेशाने प्रसंगी युद्ध करून असुरांचा वधही केला आहे. हे लक्षात घेऊन साळगावकर यांनी पत्रकारिता, सैनिकी शिक्षण आणि रंगभूमी या क्षेत्रासाठी ‘श्रीगणेश महानिधी’ या विश्वस्त संस्थेची स्थापना केली होती. ते महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष होते व त्या नात्याने मुंबईतील गणेशोत्सवास विधायक व शिस्तीचे वळण लावण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर संस्थेचे ते विश्वस्तही होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांतील ‘दूर्वाक्षरांची जुडी’ व ‘गणाधीश जो ईश’ या पुस्तकांत त्यांनी गणेशाविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. गुणाधीश गणपतीची अशा विविध मार्गांनी सेवा करीत असतानाच त्यांनी २००४ साली मालवणच्या प्राचीन मेढा या भागात गणेशाचे अत्यंत देखणे व स्थापत्यशास्त्राबरहुकूम असलेले मंदिर उभारले. या गणेशाने आपल्या भक्तांस जयवंत करावे, या भावनेने त्यांनी या गणेशाचे नाव ‘जय गणेश’ असे ठेवले होते. मात्र सुवर्ण गणेश या नावानेच येथील गणपती ओळखला जातो. कोकणातील सुवर्ण गणेश या नावाने ओळखले जाणारे हे दुसरे मंदिर आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगार येथील गणपतीचे मंदिरही याच नावाने सुपरिचित आहे. त्या मंदिरात गणेशाचा सोन्याचा मुखवटा आहे. मालवणमधील या मंदिरात मात्र गणेशाची सोन्याची मूर्ती आहे.
सभामंडप, त्यातूनच प्रदक्षिणा मार्ग असलेले गर्भगृह, त्यांवर दोन शिखरे असे या टुमदार मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर आमलक आणि कळस आहे. सभामंडपावर घुमटाकार शिखर व त्यावर चपट्या तबकडीच्या आकाराचा आमलक व कळस आहे. गर्भगृहावरील मुख्य शिखर नागर शैलीतील अर्धोध्वर म्हणजे वरपर्यंत सरळ; परंतु शीर्षस्थानी आमलकाच्या खाली अचानक आतील बाजूस वळलेले आहे. या मंदिराच्या रंगकामात मुख्यतः पांढऱ्या रंगाचा व ठिकठिकाणी कलात्मक पद्धतीने सोनेरी रंगाचा नयनसुखद वापर करण्यात आला आहे.
मंदिराच्या प्रांगणात डावीकडे एक मोठा मंडप बांधण्यात आलेला आहे. या ठिकाणी होमहवनादी धार्मिक कार्यक्रम केले जातात. त्याकरीता येथे होमकुंडही बांधण्यात आलेले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारी, सोंडीने कमलपुष्प पकडलेले दोन पांढरे हत्ती आहेत. तेथून पाच पायऱ्या उंचावर मंदिराचा सभामंडप आहे. सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. गोलाकार खांब, त्यावर सुंदर कोरीवकाम केलेले तरंगहस्त, त्यावर अष्टकोनी घुमट, घुमटाच्या आतून खालच्या बाजूस गणेशाच्या आठ रूपांतील आठ मूर्ती आणि मध्यभागी सुंदर झुंबर असे या सभामंडपाचे रूप आहे. येथे त्रिमुखी गणपती पाहावयास मिळतो. गर्भगृहाच्या दंडगोलाकार द्वारचौकटीलगत चंदेरी रंग दिलेले व सुंदर कोरीव काम केलेले स्तंभ आहेत. त्यावर मयुरतोरण आहे. आत दोन हत्तींच्या मस्तकावर उभारलेल्या गजपीठावर गणरायाची मांडी घालून बसलेली सुंदर मूर्ती विराजमान आहे. सुमारे दीड किलो शुद्ध सोन्याचा मुलामा दिलेल्या या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी आहेत. प्रभावळीच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांवर गणेशवाहन मूषकाची उभी, हातात व्यजनं म्हणजे पंखा धारण केलेली प्रतिमा आहे. गणेशाच्या या मूर्तीसमोर एक छोटी चलमूर्ती प्रतिष्ठापित केलेली आहे.
या मंदिरात माघी गणेशोत्सव अत्यंत उत्साहाने व धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. माघी गणेशोत्सवाचा चौथा दिवस हा या मंदिराचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. सुवर्ण गणेश मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मकर संक्रांतीच्या सकाळी गाभाऱ्यातील सुवर्णमूर्तीवर थेट सूर्यकिरणे पडतात.