जाळीचा देव

जयदेववाडी, ता. भोकरदन, जि. जालना

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात जयदेववाडी येथे वसलेले श्रीक्षेत्र जाळीचा देव हे महानुभाव पंथाचे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. बाराव्या शतकामध्ये सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या वास्तव्याने या भूमीला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. हे मंदिर स्वामींच्या त्या विशेष घटनेचे प्रतीक आहे, जेथे त्यांनी एका वाघिणीला शांत केले होते. डोंगररांगांमध्ये आणि निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनाला येतात. महानुभाव पंथातील पाच अवतारांपैकी एक असलेल्या श्रीचक्रधर स्वामींच्या चरणांकित स्थानामुळे या क्षेत्राला महाराष्ट्राच्या धार्मिक नकाशावर मानाचे स्थान आहे. महाराष्ट्र सरकारने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्गाचा दर्जा दिलेला आहे.

महाराष्ट्राच्या धार्मिक इतिहासात बारावे शतक हे मराठी भाषेला आणि संस्कृतीला नवी दिशा देणारे ठरले. या काळात समाजात जातीभेद आणि लिंगभेद मोठ्या प्रमाणावर होते. अशा काळात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली आणि मानवतावादाचा पुरस्कार केला. श्रीचक्रधर स्वामींच्या अवताराची कथा वैशिष्ट्यपूर्ण आहे. गुजरात मधील भरवस नगरीत राजा विशालदेव आणि राणी माल्हाईसा यांचा राजपुत्र हरीपाळदेव याचा तारुण्यात मृत्यू झाला होता. संपूर्ण नगरी शोकाकुल असताना, अंत्यविधीसाठी हरीपाळदेवाचा देह चितेवर ठेवला जात होता. त्याच वेळी एक घटना घडली आणि हरीपाळदेव पुन्हा जिवंत झाले. अशी मान्यता आहे की द्वारवती येथील चांगदेव राऊळ यांनी योगसामर्थ्याने हरीपाळदेवाच्या मृत शरीरामध्ये प्रवेश करून नवीन अवतार स्वीकारला होता. देहाचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर स्वामींचे लक्ष राजमहालातील सुखात लागले नाही. त्यांनी रामयात्रेचे निमित्त करून भरवस नगरी सोडली आणि ते थेट रिद्धपूरला आले. येथे त्यांची भेट श्री गोविंदप्रभू बाबांशी झाली. त्यांनी त्यांना ‘चक्रधर’ हे नाव दिले आणि ज्ञान प्रदान केले. स्वामींनी समानता आणि मानवतेचा संदेश देत देशभर भ्रमण केले. महाराष्ट्रात वावरत असताना ते कनाशी, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, चांगदेव, हारताळा आणि सावळदाबारा अशा विविध गावांमध्ये गेले. शके ११९३ च्या सुमारास वैशाख वद्य दशमीच्या दिवशी स्वामी सावळेश्वरहून वाळसावंगीकडे जात होते. सह्याद्रीच्या या घनदाट माळमाथ्यावर वावरताना त्यांना करवंदीच्या जाळीमध्ये वाघिणीची दोन लहान पिल्ले खेळताना दिसली. स्वामींनी वात्सल्याने त्या पिल्लांना जवळ घेतले. हे पाहताच त्यांची माता असलेली वाघीण स्वामींच्या अंगावर धावून आली. मात्र, स्वामींनी तिच्याकडे पाहताच त्या वाघिणीचा हिंस्रपणा नष्ट झाला. ती एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे स्वामींचे पाय चाटू लागली. स्वामींनी त्या पिल्लांना पुन्हा वाघिणीच्या स्वाधीन केले आणि तिला ‘बाई, सांभाळ आपली पिल्ले’ असे सांगून तेथून प्रयाण केले. या घटनेमुळेच या स्थानाला ‘जाळीचा देव’ असे नाव पडले. या क्षेत्रावरील मंदिराच्या बांधकामाचा इतिहासही प्रेरणादायी आहे. १९३६ च्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील वाघोदा येथील लक्ष्मणराव पाटील नावाचे गृहस्थ कुष्ठरोगाने त्रस्त होते. त्यांनी या आजारातून मुक्त होण्यासाठी जाळीच्या देवाची सेवा सुरू केली. उपासनेच्या एकवीसव्या दिवशी त्यांना परमेश्वराचा दृष्टांत झाला आणि त्यानंतर त्यांचा रोग पूर्णपणे बरा झाला. या कृतज्ञतेतून त्यांनी येथे मंदिर उभारण्याचा संकल्प केला. मात्र, त्यावेळी या भागावर निजामाच्या राजवटीचे नियंत्रण होते. बांधकामाची परवानगी मिळवण्यासाठी लक्ष्मणराव पाटील यांना हैदराबादला निजामाच्या दरबारात जावे लागले. परवानगी मिळाल्यावर त्यांनी मंदिराच्या कामाला गती दिली आणि १९४२ मध्ये मंदिराच्या सभामंडपाचे काम पूर्ण झाले. काळाच्या ओघात मंदिराची झीज झाल्याने २०१० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला आधुनिक आणि भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिराच्या भौगोलिक स्थानाचा विचार केला तर हे ठिकाण जालना आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. बुलढाणा-अजिंठा मुख्य रस्त्यावरून जयदेववाडीकडे वळल्यानंतर मंदिराची पहिली भव्य स्वागत कमान दिसते. या कमानीवर श्रीचक्रधर स्वामींची मूर्ती असून तिच्या दोन्ही बाजूंना दोन व्याघ्र शिल्पे कोरलेली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूजा साहित्य व प्रसाद विक्रीची अनेक दुकाने आहेत. याशिवाय सावळदाबारा गावाकडून मंदिराकडे येण्यासाठी डोंगर पायथ्यापासून कोरीव पाषाणात बांधलेला सुंदर पायरी मार्गही उपलब्ध आहे. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा कठडे असून पायरी मार्गाच्या शेवटी दुमजली स्वागत कमान आहे. मंदिराचे मुख्य प्रांगण पेव्हर ब्लॉकने सुशोभित केलेले आहे. प्रांगणात भाविकांसाठी एक खुले सभागृह आणि अन्नछत्र आहे. येथे भाविकांसाठी एक मोठा मंडप बांधलेला आहे. या मंडपाच्या स्तंभांना भाविक श्रद्धेने नवसाचे नारळ बांधतात.

मंदिराची वास्तुरचना पारंपारिक आणि आधुनिक शैलीचा संगम दर्शवते. मुख्य मंदिराची विभागणी मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशा तीन भागांमध्ये केलेली आहे. मुखमंडपाचे छत दोन गोलाकार स्तंभांवर तोललेले असून सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर दोन चौकोनी स्तंभ आहेत. या स्तंभांना महिरप तोरणाने जोडलेले असून त्यावर नक्षीकाम पाहावयास मिळते. सभामंडपाला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर कोरीव नक्षीकाम असून द्वारशाखांवर द्वारपाल, द्वारपालिका आणि श्रीकृष्णाची शिल्पे कोरलेली आहेत. ललाटपट्टीवर श्रीकृष्णाचे पाच अवतार दर्शवलेले आहेत. महानुभाव पंथात श्रीकृष्णाचे हे पाच अवतार अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

गर्भगृहात मध्यभागी श्रीचक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान दिसते. हे स्थान एका चौथऱ्यावर आहे. त्याच्या चारही बाजूंनी सोन्याचा मुलामा असलेला कठडा आहे. या चौथऱ्यावर श्रीचक्रधर स्वामींची चांदीची प्रसन्न मूर्ती आहे. या मूर्तीला वस्त्रे, अलंकार आणि सोन्याचा मुकुट परिधान केला जातो. गर्भगृहाच्या मागील भिंतीत तीन देवकोष्टके आहेत. त्यापैकी मध्यभागी असलेल्या कोष्टकात स्वामींची बछड्यांसह असलेली प्रतिमा आहे. डाव्या आणि उजव्या बाजूच्या देवकोष्टकांमध्ये स्वामींच्या वापरातील वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग उपलब्ध आहे. मंदिराच्या शिखराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सभामंडपाच्या छतावर गोल घुमटाकार शिखर असून गर्भगृहावर उंच चौकोनी शिखर आहे. या शिखराच्या चारही बाजूंना अंगीशिखरे, अर्धआमलक आणि पांढऱ्या रंगाचा धर्मध्वज आहे.

येथे वर्षभर विविध धार्मिक सण आणि उत्सव साजरे होतात. माघ पौर्णिमा म्हणजेच दांडी पौर्णिमा हा येथील सर्वात मोठा वार्षिक उत्सव आहे. या निमित्ताने सात दिवस यात्रा असते. यावेळी देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. उत्सवाच्या काळात मंदिरात ग्रंथवाचन, भजन, कीर्तन आणि प्रवचन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्वामींच्या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. मुख्य यात्रेव्यतिरिक्त श्रीकृष्ण जन्मोत्सव, श्रीचक्रधर स्वामी जयंती, गोविंद प्रभू जयंती आणि गुढीपाडवा यांसारखे सणही श्रद्धेने साजरे केले जातात. दररोज दुपारी १२ ते २.३० व सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत भाविकांना महाप्रसाद दिला जातो. दररोज पहाटे ३ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • भोकरदन येथून ४६ किमी अंतरावर
  • जालना येथून १०४ किमी अंतरावर
  • भोकरदन शहरापासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क – मंदिर कार्यालय, मो. ९२८४७६८०२७

मेष के देवता

जयदेवडी, भोकरदन, जिला. जलना

Back To Home