लेण्याद्रीचा गिरिजात्मज

गोळेगाव, ता. जुन्नर, जि. पुणे


इसवी सन सुरू होण्याच्या आधीपासूनचा इतिहास असलेली प्राचीन जीर्णनगरी म्हणजे आजचे जुन्नर. सातवाहनांचे राजकीय प्रतिस्पर्धी शकक्षत्रप यांची ती राजधानी होती. शिवछत्रपतींचे जन्मस्थान म्हणून आज हे शहर आणि त्याशेजारील शिवनेरी किल्ला परिचित आहे. याच शहराच्या परिसरात २०७ लेणी असून, त्यातील एक टेकडी तर लेण्यांची म्हणून ओळखली जाते. ती म्हणजेच लेण्याद्री. जुन्नरपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावरील या लेण्याद्रीत अष्टविनायकांतील एक वैशिष्ट्यपूर्ण गणपती वसला आहे.

‘गिरिजात्मज’ असे या विनायकाचे नाव आहे. पार्वतीने आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून लेण्याद्रीच्या डोंगरात तपश्चर्या केली. मन एकाग्र व्हावे याकरीता मातीची मूर्ती बनविली व तिची सेवा केली. पार्वतीच्या अनन्यभावे केलेल्या भक्तीचे फळ म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीविनायक प्रकट झाले. तोच हा गिरिजात्मज, अशी या विनायकाची आख्यायिका सांगितली जाते. गिरिजात्मज अवतारात गणपतीचे येथे १५ वर्षे वास्तव्य होते व या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला, अशी पुराणकथा आहे.

जुन्नर-ओतूर रस्त्यावर गोळेगावच्या नजीक लेण्याद्रीस जाणारा मार्ग आहे. हिरव्यागार द्राक्षबागांतून जाणाऱ्या त्या रस्त्याने सुमारे अडीच किमी अंतरावर लेण्याद्रीचा डोंगर लागतो. त्यावर गणेश मंदिर असून, ते गणेशगुहा किंवा गणेशलेणी म्हणूनही ओळखले जाते. सुमारे ३०० उंच दगडी पायऱ्या चढून दर्शनासाठी जावे लागते. मंदिराच्या पूर्व व पश्चिम बाजूस २८ विहार आहेत, तसेच पाण्याची १५ कुंडे आहेत. मंदिराच्या बाजूच्या लेण्यात एकाच शिळेतून कोरलेला बौद्धस्तूप आहे. तेथून काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपणास भव्य सभामंडप दिसतो. कातळात कोरलेला हा सभामंडप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ५१ फूट रुंद आणि ५७ फूट लांबीच्या या प्रशस्त सभामंडपास कोठेही खांबाचा आधार नाही. तेथे वातावरणात सुखद गारवा असतो. गाभारा दक्षिणाभिमुख आहे. मात्र मूर्ती उत्तराभिमुख आहे. त्यामुळे मंदिरात गणेशाच्या पाठीची पूजा केली जाते. मूर्तीस प्रदक्षिणा करता येत नाही. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूस हनुमान आणि शंकर यांच्या मूर्ती आहेत.

येथे सर्वकाळ भाविकांची मोठी वर्दळ असते. मंदिरात रोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यात येथे अत्यंत उत्साह आणि भक्तिपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो. जुन्नर परिसरात फुलांचीही मोठी शेती होते. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये या मंदिराची फुलांच्या साह्याने आकर्षक सजावट केली जाते. या उत्सवातील देवजन्मकीर्तन सोहळा हा तेथील विशेष सोहळा होय. गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी तेथे सकाळी दहा वाजता देवजन्माचे कीर्तन होते. हजारो भाविक त्यासाठी उपस्थित असतात. गणेशोत्सव काळात तेथे बैलगाड्यांची शर्यत आयोजित केली जाते. माघ महिन्यातही येथे माघ प्रतिपदा ते षष्टी या काळात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्या काळात तेथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो.

मंदिराच्या पायऱ्या चढण्यापूर्वी पुरातत्त्व विभागाचे एक कार्यालय असून, तेथे तिकीट काढावे लागते. ज्या भाविकांना वृद्धापकाळ वा अन्य काही कारणांमुळे डोंगराच्या पायऱ्या चढणे शक्य नसते, अशा लोकांसाठी तेथे डोलीचीही सशुल्क व्यवस्था आहे. डोंगराच्या पायथ्याशी पुष्पहार, गणेशमूर्तीची दुकाने असून, तेथे उत्तम न्याहरीची सोयही आहे. तेथे ग्रामस्थांनी सर्व सोयींनी युक्त असा भक्तनिवासही उभारला आहे. तेथे वास्तव्याची सोय होऊ शकते.

आयएसओ मानांकन मिळालेल्या या देवस्थानाला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंदिरात पहाटे सहा ते साडेसहा वाजता श्रींची पूजा, सकाळी ७, दुपारी १२, सायंकाळी ५.३० वाजता आरती होते. रात्री ८.३० वाजता शेजारती असते. भाविकांना सकाळी ६.३० ते सायंकाळी ९ पर्यंत गिरिजात्मकाचे दर्शन घेता येते. भाविकांना येथील प्रासादालयात दुपारी व रात्री देवस्थानतर्फे महाप्रसादाची सुविधा दिली जाते.

उपयुक्त माहिती:

  • कल्याणपासून ११३ किमी, तर पुण्यापासून १०० किमी अंतरावर
  • पुण्यातील अनेक भागांतून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने लेण्याद्रीच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात.
  • भक्तनिवास व प्रासादालयाची सुविधा
  • संपर्क : देवस्थान ट्रस्ट : ८०८७५७३९२५, ९८८१०५८६६५
Back To Home