पुण्यापासून २२ किमी अंतरावर असलेल्या तळेगाव दाभाडे येथील एका उंच डोंगरावर घोरावाडी लेणी आहेत. सुरुवातीला चैत्यगृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोरावाडी लेण्यांची आता शेलारवाडी लेणी, अशी ओळख आहे. या ठिकाणी प्राचीन शिलालेख आणि काही शिल्पेही दिसतात. ही बौद्ध लेणी इ.स.पूर्व काही वर्षे आणि इ.स.नंतरच्या पहिल्या शतकात खोदली गेली असल्याचा अंदाज आहे. या लेण्यांमध्ये एक शिव मंदिरही आहे. या मंदिरालाच घोरावडेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. जवळच असलेल्या एका विहारात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आणि तुकाराम महाराजांची मूर्तीही दिसते.
समुद्रसपाटीपासून ४५० ते ५०० मीटर उंचीवरील या मंदिरात जाण्यासाठी खड्या चढणीच्या पायऱ्या पार कराव्या लागतात. पायथ्याशीच नंदी विराजमान आहे. नंदीचे दर्शन घेऊनच पुढचा प्रवास सुरू करावा लागतो. पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तीन टप्पे पार करावे लागतात. पहिल्या टप्प्यातील पायऱ्या चढून झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दगडांवरून पुढे जावे लागते. त्यानंतर पुन्हा पायऱ्या लागतात. येथे येण्यासाठी आणखी एक वेगळी पायवाट आहे, तिचाही वापर करता येतो. मंदिरात पोहोचण्यास साधारणतः ३० ते ४० मिनिटे लागतात. पायऱ्या असल्याने थोडी दमछाक होते; पण मंदिरात पोहोचून, तो परिसर पाहिल्यावर जी मनशांती मिळते, त्याने आलेला थकवा निघून जातो. पावसाळ्याच्या दिवसात हिरव्यागार डोंगररांगांमधून कोसळणारे असंख्य धबधबे व अंगाला स्पर्शून जाणाऱ्या ढगांचा नजारा पाहण्यासाठीही अनेक पर्यटक येथे येत असतात.
मंदिरात प्रवेश करताच एक नंदीची मूर्ती दिसते. मंदिरांच्या भिंतीवर काही शिलालेख आढळून येतात. संपूर्ण चौकोनी सभागृह हे अखंड दगडात कोरल्यासारखे जाणवते. याच सभागृहाच्या पुढील भागात महादेवाची पिंड आहे. मंदिराच्या आतील भागात बाहेरील वातावरणापेक्षा गारवा जाणवतो.
मंदिराच्या बाहेर छोटेसे हनुमानाचे मंदिरही आहे. तेथेच बाजूला एका गुंफेत विठ्ठल-रखुमाई आणि तुकाराम महाराज यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराला ‘सीता गुंफा’ही म्हणतात. येथे सीतेची नहाणी (अंघोळघर) होती, असे सांगितले जाते. आता मात्र ती बुजून गेली आहे. रामाने वनवासातील काही काळ येथे घालवल्याचे सांगतात. जवळच असलेल्या तळेगाव दाभाडे येथे पांडवकालीन लेणीही आढळतात. त्यामुळे येथे पांडव येऊन गेले असावेत, असेही सांगितले जाते. या प्राचीन मंदिरात संत तुकाराम महाराज ध्यानासाठी येत असल्याचे सांगतात. अर्थात, हे ठिकाण चिंतन, मनन करण्यासाठी अतिशय योग्य भासते. त्यामुळेच अनेक ऋषी, अभ्यासक या ठिकाणी आतापर्यंत येऊन गेले असावेत. इथे पाण्याची सोय व्हावी यासाठी दगडांत पाण्याच्या टाक्या कोरण्यात आल्या आहेत. परिसरात असलेल्या पाच ते सहा टाक्या बाराही महिने पाण्याने भरलेल्या असतात.
घोरावडेश्वर देवस्थान पंचक्रोशीतल्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दर श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या हजारो भाविकांनी हा डोंगर फुलून जातो. मंदिर परिसरात डोंगरात कोरलेली ध्यानगृहे, चैत्यगृह व विहार आहेत. त्यांची रचना साधी असून काही ठिकाणी थोडे नक्षीकाम असल्याचे दिसते. या परिसरातून दिसणारे दृश्य आणि असलेली शांतता अनुभवताना इथे अनेक साधक का येत असत, याचे उत्तर आपसूक मिळून जाते. सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळात भाविकांना मंदिरात दर्शन घेता येते.