मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा म्हणजेच थळ घाटात श्री घाटनदेवी मंदिर आहे. या मंदिराला वैदिक काळापासूनचा इतिहास आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर हरिहर, दुर्वर, उंटवड व त्र्यंबक या शिखरांच्या कोंदणात आणि त्रिंगळवाडी किल्ल्याजवळ हे मंदिर स्थित आहे. ‘श्री दुर्गासप्तशती’ या ग्रंथात दुर्गामातेच्या नऊ रूपांचे माहात्म्य वर्णन करण्यात आले आहे. त्यात शैलपुत्री, ब्रह्माचारिणी, कालरात्री, महागिरी, महासिद्धी, महागौरी, रिद्धी, सिद्धी, दुर्गा या रूपांचा समावेश आहे. घाटनदेवी ही ‘शैलपुत्री’ रूपातील देवी आहे. मंदिराची आख्यायिका अशी की वज्रेश्वरी येथून भीमाशंकरकडे प्रयाण करीत असताना देवीने विश्रांतीसाठी या जागेची निवड केली. डोंगराचा लळा असल्यामुळे डोंगराच्या कुशीतील निसर्गसौंदर्याने नटलेली ही जागा देवीला अतिशय आवडली व तेथेच श्री घाटनदेवीच्या स्वरूपात ती स्थिरावली. दुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’ म्हणून ओळखले जाते. ही देवी नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा मानली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या देवीची विशेष पूजा आणि आराधना केली जाते. हिमालयाचा राजा हिमावत यांची ही पुत्री व त्यामुळेच डोंगररांगांच्या प्रेमात पडणारी देवी म्हणून तिला ‘हिमावती’ असेही संबोधले जाते.
असे सांगितले जाते की, शिवाजी महाराज कल्याणचा खजिना लुटून मार्गस्थ होताना त्यांना एक दरी लागली. ज्या उंटांवरून खजिना आणण्यात आला होता, त्या उंटांना तिथे मोकळे करून सोडून देण्यात आले, म्हणून ती जागा ‘उंटदरी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. उंटदरीतच भातसा नदीचा उगम होतो. उंटदरीच्या जवळ घाटनदेवी मंदिर आहे. शिवाजी महाराजांनी लुटलेल्या खजिन्याची या मंदिरातच मोजदाद करण्यात आली. त्यावेळी महाराजांनी घाटनदेवीची विधिवत व शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली, अशी ऐतिहासिक नोंद आहे. म्हणूनच या मंदिराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.
मंदिरात जाताना एक कमान लागते, जिच्या मधोमध गणपतीची मूर्ती कोरलेली पाहायला मिळते. मंदिरात प्रवेश करताना दोन्ही बाजूला सिंहाच्या दोन प्रतिकृती आहेत. चारी बाजूंनी गोल घुमटाकार असलेले मंदिर पूर्ण बंदिस्त नसल्याने मंदिराचा खुला मंडप वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. गाभाऱ्यात संगमरवरी शुभ्र देवीची मूर्ती प्रसन्न, तेजोमय भासते. सिंहावर विराजमान झालेली देवी अष्टभुजाधारी आहे. तिच्या प्रत्येक हातात आयुध आहे. उजव्या हातात त्रिशूळ व डाव्या हातात कमळाचे फूल आहे. या मूर्तीच्या पायाजवळ तांदळा स्वरूपातील (शेंदूर लावलेली विशिष्ट आकार नसलेली शिळा, ज्यावर मुख्य अवयवांची रचना केलेली असते) मूर्तीही आहे. हे मूळ स्वरूपातील देवीचे रूप आहे.
तेथूनच काही अंतरावर मूळ घाटनदेवी मंदिराचे ठाणे आहे. झाडांच्या गर्दीत वेढलेले हे छोटेखानी मंदिर आहे. तिथे देवीच्या गाभाऱ्यासमोर नंदीच्या स्थानाप्रमाणे सिंहाची मोठी मूर्ती आहे. डोंगरकडे, दऱ्या व क्षितिजापर्यंत दिसणाऱ्या डोंगरांच्या रांगा यामुळे हा परिसर सुखद वाटतो.
ही देवी आत्मज्ञानवर्धिनीही आहे. आत्मज्ञान प्राप्त करण्यास प्रवृत्त करणारी म्हणून स्थानिकांची या देवीवर अजोड श्रद्धा आहे. देवीच्या आशीर्वादाने गावावर अरिष्ट कोसळत नाही व रस्त्यावरही अपघात होत नाहीत, अशी स्थानिकाची भावना आहे. लहान मुलांचे जावळ काढणे, सत्यनारायण घालणे, दुर्गासप्तशती पठण व इतर धार्मिक ग्रंथांची पारायणे असे कार्यक्रम या मंदिरात होत असतात. ही देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे देवीला नवस केला जातो व त्याची पूर्तता करण्यासाठी पितळी घंटा वाहण्याची प्रथा आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी देवीला नारळ फोडून तिचा आशीर्वाद घेण्यात येतो.
इगतपुरी तालुक्याची ग्रामदेवता म्हणून श्री घाटनदेवी मानली जाते. जागृत देवस्थान असल्याने दररोज शेकडो भाविक येथे दर्शनाला येतात. नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते. महानवमी व विजयादशमी या दिवशी येथे भाविकांची जास्त गर्दी असते. या मंदिराचा १९८० मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला.