गायत्री शक्तीपीठ

हिंगोली शहर, ता. जि. हिंगोली

हिंदू धर्मात गायत्री मातेला चार वेदांची जननी, अठरा पुराणे व श्रुती-स्मृतींची अधिष्ठात्री तसेच सर्व मंत्रांचे बीज मानले जाते. सृष्टीत निनादलेला पहिला दैवी मंत्र म्हणजे गायत्री मंत्र, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आजघडीला देशात लाखो साधक गायत्री मंत्राचा जप करून आध्यात्मिक उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशभरात हजारो गायत्री शक्तीपीठे कार्यरत आहेत, जिथे नित्य अग्निहोत्र व गायत्री मंत्र साधना केली जाते. असेच एक प्रसिद्ध गायत्री शक्तीपीठ हिंगोली शहरात वसलेले आहे. येथील गायत्री पीठात शेकडो भाविक गायत्री साधना करतात. येथे आल्याने मानसिक समाधान व आत्मिक सुखाची अनुभूती येत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

हिंगोली येथील हे स्थान हरिद्वारच्या गायत्री शक्तीपीठाची एक शाखा आहे. या संस्थेची भारतात सहा हजारांहून अधिक केंद्रे आहेत. ही केवळ संस्था नसून एक लोकचळवळ आहे. अग्निहोत्र, यज्ञ व संस्कृतीची जोपासना हा या चळवळीचा मुख्य उद्देश असल्याचे येथील साधक सांगतात. गायत्रीदेवीबाबत एका पौराणिक कथेनुसार, एकदा ब्रह्मदेव आणि त्यांची पत्नी सावित्री यांच्यात वाद झाल्याने सावित्रीने ब्रह्मदेवांसोबत यज्ञास बसण्यास नकार दिला. यामुळे ब्रह्मदेव क्रोधित झाले. पत्नीशिवाय यज्ञ होऊ शकत नसल्याने त्यांनी इंद्राला आपल्यासाठी दुसरी पत्नी शोधण्याची विनंती केली. इंद्राने एका गवळ्याची सुलक्षणी कन्या ब्रह्मदेवास पत्नी म्हणून सुचवली. विष्णूंच्या सल्ल्याने ब्रह्मदेवाने या कन्येशी विवाह केला. तीच गायत्री माता होय. ती चारी वेदांची जननी व सकल ज्ञानाची अधिष्ठात्री देवता आहे. एका मान्यतेनुसार, दिवसभरात गायत्री देवी तीन रूपांत दर्शन देते. सकाळी रक्तवर्णी, अक्षमाला व कमंडलू धारण केलेली ‘बाला ब्रह्मी’, दुपारी शंख, चक्र, गदा धारण केलेली तरुण ‘वैष्णवी’ व संध्याकाळी वृषभारूढ, त्रिशूल, पाश, कपाल धारण केलेली वृद्ध ‘शिवानी’ या रूपात ती असते.

हे गायत्री शक्तीपीठ शहरातील मुख्य रस्त्यालगत स्थित आहे. मंदिरास भक्कम तटबंदी व कमानसदृश प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्रांगणात सुंदर उद्यान आहे, जिथे विविध प्रकारच्या औषधी व शोभिवंत वनस्पतींची लागवड केलेली आहे. परिसरात भाविकांना बसण्यासाठी आसने बसवली आहेत. येथे तीन मजली सुसज्ज इमारत, उपाहारगृह, भक्तनिवास, अन्नछत्र, ग्रंथालय, महंत व सेवेकऱ्यांची निवासस्थाने, देवस्थानचे कार्यालय व विविध कार्यक्रमांसाठी सभागृह इत्यादी वास्तू आहेत.

प्रांगणात प्रशस्त यज्ञशाळा आहे, त्यात प्रतिदिन यज्ञाचे आयोजन केले जाते. सण व उत्सवांच्या वेळी येथे विशेष यज्ञ होतात. तिन्ही बाजूंनी खुल्या असलेल्या या यज्ञशाळेत मागील भिंतीवर गायत्री मातेचे सुंदर चित्र रंगवले आहे, तर जमिनीवर मध्यभागी यज्ञकुंड आहे. यज्ञशाळेचे छत गोलाकार स्तंभांवर आधारलेले आहे. पुढे दुमजली गायत्री मंदिर आहे. याचा तळमजला तिन्ही बाजूंनी पूर्ण खुला आहे. येथील मागील भिंतीवर कैलास पर्वताचे चित्र रेखाटले आहे. तळमजल्यावर संगमरवरी चौथऱ्यावर शिवपिंडी विराजमान आहे. शिवपिंडीच्या डाव्या व उजव्या बाजूला संगमरवरी पाषाणात बांधलेल्या दोन मेघडंबरी आहेत. प्रत्येक मेघडंबरीत सहा नक्षीदार स्तंभिका आहेत व त्यांवर षटकोनी शिखर आहे. शिखरावर आमलक आणि कळस आहेत. या दोन्ही मेघडंबरींत दिवंगत महंत व गुरुमाता यांच्या समाध्या आहेत. मंदिराच्या वरील मजल्यावर जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रशस्त पायऱ्या आहेत. या पायरीमार्गांच्या दोन्ही बाजूला लोखंडी सुरक्षा कठडे आहेत. वरील मजल्यावर सभामंडप व गर्भगृह अशी रचना आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी खिडक्यांची व्यवस्था आहे. सभामंडपाचे छत भिंतीवर आधारलेले आहे आणि त्याला पितळी घंटा टांगलेल्या आहेत.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर लोखंडी सुरक्षा कठडे लावून अंतराळाची रचना केलेली आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार साधेसे आहे. याला बाह्यबाजूने पारदर्शक जाळीदार, तर आतील बाजूने नक्षीदार लाकडी दरवाजे आहेत. प्रवेशद्वाराच्या अशा रचनेमुळे मंदिर बंद असतानाही भाविकांना देवीचे दर्शन घेणे सुलभ होते. गर्भगृहात संगमरवरी वज्रपीठावर गायत्री मातेची एकमुखी व द्विभुज संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. देवीच्या एका हातात वेद व दुसऱ्या हातात पानपात्र आहे. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या मूर्तीवर सुवर्णमुकुट आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना वज्रपीठावर कुंभाच्या उतरंडी आहेत. वज्रपीठासमोर देवीचे वाहन असलेले हंस शिल्प आहे. गर्भगृहात गुरुमाता व गुरुदेव यांच्या तसबिरी लावल्या आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर निमुळते होत गेलेले चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आणि त्यावर कळस आहे.

गायत्री जयंती हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध एकादशी हा गायत्री प्रकटदिन मोठ्या उत्साहाने येथे साजरा केला जातो. या निमित्ताने विशेष यज्ञ, भजन, संगीत, प्रवचन, कीर्तन व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन होते. याव्यतिरिक्त, शक्तीपीठात यज्ञ, ध्यानधारणा व प्रवचन आदी नित्यक्रम नियमितपणे चालतात. दररोज पहाटे ५ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत भाविकांना या मंदिरात गायत्री देवीचे दर्शन करता येते.

उपयुक्त माहिती:

  • हिंगोली बसस्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून हिंगोलीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९९७५५६१६९६

गायत्री शक्ति पीठ

हिंगोली शहर, तालुका। जिला. हिंगोली

Back To Home