‘कापसाचे शहर’ अशी ओळख असलेल्या तेल्हारामध्ये गौतमेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. गौतमा नदीच्या तीरावरील हे शिवालय निजामकाळापूर्वीपासून वसलेले आहे. मंदिराजवळच प्राचीन पायविहीरही आहे. तेल्हारा तालुक्यातील सर्वात प्राचीन असलेल्या या मंदिरातील जागृत, स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीनिमित्त येथे सात दिवसांचा उत्सव होतो. त्यादरम्यान येथे १५१ किलोच्या रोठाच्या प्रसादाचे वाटप भाविकांना केले जाते.
सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या तेल्हारा तालुक्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकीच एक असलेले गौतमेश्वर महादेवाचे मंदिर तेल्हारातून जाणाऱ्या गौतमा नदीच्या काठावर आहे. येथील स्वयंभू शिवलिंग केव्हापासून वसलेले आहे, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी; मंदिराच्या मुखमंडपात असलेल्या एका चौथऱ्यावर मोडी लिपीतील शिलालेखात १६९७ या वर्षाची नोंद आहे. त्यामुळे हे मंदिर त्यापूर्वीचे असल्याचे जाणकार सांगतात. गौतमा नदीच्या तीरावर असल्याने या मंदिराला गौतमेश्वर महादेव मंदिर असे नाव पडले.
मंदिराच्या परिसरातच प्राचीन पायविहीर असल्याने हे स्थान ‘श्री गौतमेश्वर महादेव पायविहीर संस्थान’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. अनेक संतांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या या मंदिरात शेगावचे गजानन महाराजही येत असत, असे सांगण्यात येते.
निसर्गरम्य, शांत व प्रसन्न परिसरात गौतमेश्वर महादेव मंदिर स्थित आहे. पश्चिमेकडून वाहत येणारी गौतमा नदी पूर्वेला या मंदिराच्या पायथ्याला स्पर्श करून दक्षिणवाहिनी होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या जिर्णोद्धारानंतर या प्राचीन हेमाडपंती मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. या स्थानाचे वेगळेपण म्हणजे येथील तीन मजली पायविहीर. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडे या प्राचीन पायविहिरीचे दर्शन होते. सुमारे तीन मजल्यांच्या या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी तालुक्यातील बद्रिदास पाडिया यांनी या पायविहिरीचा जीर्णोद्धार केला.
मंदिर परिसरात अनेक वृक्ष आहेत. त्यापैकी मंदिरासमोर, उजवीकडे प्राचीन वटवृक्ष, पिंपळ व कडुलिंबाच्या वृक्षांची मुळे एकत्र आली आहेत. हा वृक्ष त्रिगुणी व दुर्मिळ असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. वटपोर्णिमेच्या दिवशी शहरातील अनेक महिला येथे वटसावित्रीच्या पूजनासाठी येतात. मंदिराच्या उजव्या बाजूला पुरातन हनुमान मंदिर आहे. प्रांगणात शिवशंकरांची भव्य मूर्ती आहे. मंदिरासमोरच असलेली प्राचीन समाधी, येथे सेवा करणाऱ्या एका तपस्वीची असल्याचे सांगितले जाते. समाधीच्या मागील बाजूस महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान रोठ बनवण्यासाठीचे स्थान आहे.
मुखमंडप, सभामंडप व सभामंडपाच्या मध्यभागी गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. प्रांगणातून चार पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपातील चार स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीच्या आकारांनी जोडलेले आहेत. या चार स्तंभांच्या मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर नंदीचे स्थान आहे. याच चौथऱ्यावर मोडी लिपीतील शिलालेख आहे व त्यात १६९७ या वर्षाची नोंद आहे. पुढे संगमरवरी फरसबंदी असलेल्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपात होम कुंड व एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. या सभामंडपाच्या मध्यभागी प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे.
या गर्भगृहाला दर्शनी बाजूकडून जाण्यासाठी व मागील बाजूने बाहेर पडण्यासाठी असे दोन दरवाजे आहेत. गर्भगृहात मध्यभागी मोठ्या शाळुंकेमध्ये गौतमेश्वर महादेवाचे लिंग आहे. त्यावर तांब्याचा पत्रा बसवण्यात आलेला आहे.
पंचक्रोशीतील असंख्य भाविकांची गौतमेश्वर महादेवावर नितांत श्रद्धा असल्याने येथे दर्शनासाठी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. अनेक भाविक येथील जागृत शिवलिंगासमोर नवस बोलतात. दररोज सकाळी ७ आणि सायंकाळी ७ वाजता येथे आरती केली जाते. महाशिवरात्र हा येथील मुख्य उत्सव असतो. त्यानिमित्त येथे भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शेकडो भाविकांकडून गौतमेश्वर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. या दिवशी परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येथे रोठाचा प्रसाद बनविला जातो. त्यामध्ये रवा, सुकामेवा, तुप आणि दुधाचा वापर केला जातो व तो शिजवण्यासाठी गोवऱ्यांचा शेक दिला जातो. हा विशिष्ट प्रकारचा प्रसाद गावातील प्रत्येक घराघरामध्ये पोचविला जातो. पळशी येथील शंकरगिरी महाराज यांनी अनेक वर्षांपूर्वी येथे रोठाचा प्रसाद देण्याची परंपरा सुरू केली होती. त्या काळी ११ किलोचा रोठ बनवला जात असे. भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे आता १५१ किलोचा रोठ बनवला जातो.
गुढीपाडव्याच्या दिवशीही येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. गुढीपाडवा ते वटपौर्णिमेपर्यंत गौतमेश्वर महादेवावर अखंड जलाभिषेक सुरू असतो. येथे हनुमान जयंतीनिमित्तही मोठा सोहळा होता. श्रावण महिन्यात येथील स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक येतात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे मोठी गर्दी असते. शेवटच्या सोमवारी मंदिर संस्थानातर्फे शहरात पालखी व कावड यात्रा काढण्यात येते. अनेक कावडधारी वांगरगाव येथील त्रिवेणी संगमातील जलाने गौतमेश्वर महादेवावर जलाभिषेक करतात. पोळ्याच्या दिवशी परिसरातील अनेक शेतकरी आपल्या बैलांना घेऊन येथे येतात. देवदिवाळीला मंदिरात मोठा दीपोत्सव होतो.