गौरीशंकर महादेव मंदिर

गोंधणखेडा, ता. जाफराबाद, जि. जालना

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात असलेल्या गोंधणखेडा गावातील गौरीशंकर महादेव मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भारतीय संस्कृती आणि मंदिर स्थापत्यकलेमध्ये गौरीशंकर महादेव ही संकल्पना शिव आणि शक्ती यांच्या अद्वैततत्त्वाचे तसेच वैश्विक संतुलनाचे प्रतीक मानली जाते. मूर्तीशास्त्र आणि पौराणिक संदर्भांनुसार हे रूप निसर्ग आणि पुरुष यांच्या एकत्रीकरणाचे दर्शन घडवते. शिल्पशास्त्राच्या दृष्टीने या देवालयाची रचना आणि येथील मूर्तींची घडण वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. शैव आणि शाक्तपंथांचा संगम दर्शवणारे हे चारशे ते पाचशे वर्षे प्राचीन देवालय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांची तपोभूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे.

महादेव व पार्वती हे शैव आणि शाक्तपंथांची प्रमुख दैवते मानली जातात. हे दोन्ही पंथ स्वतंत्र असले तरी एकमेकांना पूरक आहेत. या संकल्पनेवर आधारित गौरीशंकर नावाने भारतात विविध ठिकाणी देवालये उभारली गेली आहेत. दिल्लीच्या चांदनी चौकातील गौरीशंकर मंदिराची स्थापना मराठा सरदार गंगाजी राव यांनी इ.स. १७६१ मध्ये केली होती. हिमाचल प्रदेशातील मनाली शहरात बाराव्या शतकातील गौरीशंकर महादेव मंदिर स्थित आहे. पुरातत्वशास्त्रात या रूपाला प्रामुख्याने ‘उमा-महेश्वर’ किंवा ‘पार्वती-परमेश्वर’ या नावाने संबोधले जाते. शिल्पशास्त्राच्या ग्रंथांमध्ये या मूर्तींच्या घडणीचे नियम दिलेले आहेत. शिवपुराणातील रुद्रसंहितेमध्ये गौरी आणि शंकर यांच्या विवाहाचे वर्णन आढळते. या ग्रंथात शिवाला परमपुरुष आणि गौरीला आदिमाया प्रकृती म्हटलेले आहे. मत्स्यपुराणाच्या २६० व्या अध्यायात उमा-महेश्वर मूर्तीच्या स्थापनेचे आणि तिच्या शारीरिक लक्षणांचे वर्णन आहे. त्यामध्ये शंकराच्या डाव्या मांडीवर बसलेली गौरी आणि त्यांच्या विविध हातांमधील आयुधांची माहिती दिलेली आहे. तसेच स्कंदपुराणातील काशीखंडात आणि लिंगपुराणात शिव आणि शक्ती हे एकाच तत्त्वाचे भाग असल्याचे स्पष्ट केलेले आहे. शिल्पशास्त्राचा ग्रंथ असलेल्या ‘रूपमंडन’ या पुस्तकात गौरी-शंकराच्या मूर्तीचे विविध प्रकार सांगून त्यांच्या हातातील त्रिशूळ, मातुलुंग आणि इतर चिन्हांचा ऐतिहासिक संदर्भ दिलेला आहे. स्थापत्यकलेच्या आणि शिलालेखांच्या अभ्यासातून असे दिसून येते की कलचुरी, चंदेल आणि राष्ट्रकूट राजांच्या काळात गौरी-शंकर मंदिरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. मध्य प्रदेशातील भेडाघाट येथील मंदिर परिसर हे याचे उदाहरण आहे. त्याची नोंद ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस गॅझेटिअरमध्ये’ आढळते. या मंदिरांमधील आणि परिसरातील शिलालेखांमध्ये शैवपंथाच्या परंपरांचा उल्लेख असून त्यात गौरी-शंकराची आराधना केल्याचे संदर्भ आहेत.

गोंधणखेडा येथील हे देवालय सुमारे चारशे ते पाचशे वर्षे जुने आहे. ते राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांची तपोभूमी म्हणून ओळखले जाते. इ.स. १९१४ मध्ये दहिगाव (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे जन्मलेल्या जनार्दन गोडसे यांना लहानपणापासून अध्यात्माची आवड होती. परिसरातील लोकांनी त्यांची आध्यात्मिक वृत्ती ओळखली होती. बालपणीच घरादाराचा त्याग करून जनार्दन स्वामींनी परमेश्वराच्या शोधात प्रवास स्वीकारला. भ्रमण करत ते गोंधणखेडा येथील गौरीशंकर महादेव मंदिरात आले. येथे त्यांनी ध्यानसाधना केली. त्यांनी परिसरात गोसेवा करण्यासाठी गोशाळा आणि आश्रमाची स्थापना केली. स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यासकेंद्रही सुरू केले. १० डिसेंबर १९८९ रोजी नाशिक जिल्ह्यातील कोपरगावजवळील बेटावर स्वामींनी संजीवन समाधी घेतली.

गावाजवळ असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पक्की सडक आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीमध्ये प्रवेशद्वार आहे. पेव्हरब्लॉक लावलेल्या प्रांगणात विविध वृक्ष आणि भाविकांसाठी आसने आहेत. प्रांगणात यज्ञमंडप आहे. याशिवाय भक्तनिवास, अन्नछत्र, पुजारी व सेवेकऱ्यांची निवासस्थाने, विद्यार्थी वसतिगृह आणि गोशाळा या वास्तू येथे आहेत. प्रांगणात समोरील बाजूस गौरीशंकर महादेव मंदिर आहे. तीन दिशांना तीन अर्धमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. हे मंदिर सुमारे तीन फूट उंच चौथऱ्यावर आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या अर्धमंडपांच्या प्रवेशद्वारासमोर चार पायऱ्या आहेत. दर्शनी बाजूच्या अर्धमंडपात वज्रपीठावर नंदीची संगमरवरी मूर्ती आहे. सभामंडपात जमिनीवर मध्यभागी कासवशिल्प कोरलेले आहे. सभामंडपाच्या वितानावर चक्राकृती नक्षीकाम आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी पाच देवकोष्टके आहेत. त्यामध्ये सूर्य, सोम, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू या नवग्रहांच्या मूर्ती तसेच नर्मदादेवीची मूर्ती आहे.

गर्भगृह सभामंडपाच्या पातळीपेक्षा खोल भागात आहे. तेथे खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंड प्रतिष्ठित आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेल्या नागाची तांब्याची प्रतिकृती आहे. वितानाला जलधारेसाठी अभिषेकपात्र टांगलेले आहे. गर्भगृहाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या भिंतींमधील देवकोष्टकांमध्ये गणेश व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या मागील भिंतीतील देवकोष्टकात पार्वतीची मूर्ती स्थापित आहे. मंदिराच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणामार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. शिखराचा खालील थर चौकोनी आकाराचा आहे आणि तो वर निमुळता होत गेला आहे. या थरात चारही बाजूंच्या भिंतींमध्ये एकावर एक अशी प्रत्येकी तीन देवकोष्टके आहेत. त्यामध्ये देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या दुसऱ्या वर्तुळाकार थरात गोलाकार रचनेत आठ देवकोष्टके आहेत. त्यामध्ये देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहेत.

महादेव मंदिराच्या बाजूला जनार्दन स्वामी स्मृती मंदिर आहे. हे मंदिर सुमारे तीन फूट उंच जगतीवर स्थित आहे. अर्धमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या देवालयाची रचना आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या अर्धमंडपाच्या प्रवेशद्वाराला चार पायऱ्या आहेत. अर्धमंडपाच्या पुढे सभामंडप आहे. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपात प्रकाश व हवेसाठी वातायने म्हणजेच खिडक्या आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर वज्रपीठावर जनार्दन स्वामींच्या पद्मपादुका आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर जनार्दन स्वामींची ध्यानस्थ मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणामार्ग बांधलेला आहे. या प्रदक्षिणामार्गावर एक उत्सवरथ आहे. त्या रथात जनार्दन स्वामींची ध्यानस्थ मूर्ती आहे. स्वामींच्या मूर्तीसमोर शिवपिंड आणि नंदीची मूर्ती स्थापित आहे. स्मृती मंदिराच्या सभामंडपातून तळघरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तळघराची रचना वरील मजल्याप्रमाणेच करण्यात आहे. या ठिकाणी असलेल्या सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर वज्रपीठावर स्वामींच्या पद्मपादुका आहेत. गर्भगृहात देखील वज्रपीठावर जनार्दन स्वामींची ध्यानस्थ मूर्ती आहे. येथील प्रदक्षिणामार्गावर स्वामींच्या जीवनप्रसंगांची रेखाटलेली चित्रे पाहायला मिळतात.

मंदिराच्या छतावर सभोवार सुरक्षा कठडा बांधलेला आहे. या कठड्यावर शिवपिंडीच्या प्रतिकृती बसवलेल्या आहेत. सभामंडपाच्या छतावर तीन दिशांना तीन पिरॅमिड आकाराची आणि उतरत्या पायऱ्यांची रचना केलेली चौकोनी शिखरे आहेत. या शिखरांच्या शीर्षभागी आमलक आणि त्यावर कळस बसवले आहेत. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. मंदिरासमोर प्रांगणात प्रवेशद्वाराजवळ मारुती मंदिर आहे. मंदिराच्या समोर पत्र्याचे छत असलेला सभामंडप आहे. गर्भगृहात वज्रपीठावर हनुमानाची काळ्या पाषाणातील मूर्ती प्रतिष्ठित आहे.

महाशिवरात्री हा येथील प्रमुख उत्सव मानला जातो. याशिवाय जनार्दन स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरात जत्रा भरते. श्रावणातील सर्व सोमवारी आणि गुरुपौर्णिमेला दर्शनासाठी अनेक भाविक येतात. देवालयामध्ये नागपंचमी, विजयादशमी आणि दीपावली हे सण व उत्सव साजरे केले जातात. उत्सवांच्या वेळी मंदिरात लघूरुद्र, महाभिषेक, भजन, कीर्तन आणि महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवार, गुरुवार, पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती असते. दररोज सकाळी ५ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात गौरीशंकर महादेवाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • जाफराबाद येथून ५ किमी अंतरावर
  • जालना शहरापासून ५१ किमी अंतरावर
  • जाफराबाद येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४२१५९४३४२, ९४२२७३६७५८

गौरी शंकर महादेव मंदिर

गोंदनखेड़ा, जाफराबाद, जिला. जलना

Back To Home