नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध असलेले ‘नांदूर मध्यमेश्वर’ हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. इथेच गोदावरी व कादवा नद्यांच्या संगमावर चक्रधर स्वामींनी वास्तव्य केलेले गंगामध्यमेश्वर शिव मंदिर आहे. नांदूर मध्यमेश्वरचे ग्रामदैवत असलेले हे मंदिर गोदावरीच्या पात्रात एका लहानशा टेकडीवर स्थानापन्न आहे. नदीपात्राच्या मधोमध मंदिर असल्याने त्याचे ‘मध्यमेश्वर’ हे नाव प्रचलित झाले.
सायखेडामार्गे निफाड तालुक्यातील खानगावथडीला जाता येते. तेथून पुढे ‘नांदूर मध्यमेश्वर’ हे गाव लागते. हा परिसर अश्मयुगातील पुरातन लोकवस्तीचा होता, हे येथे झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननातून स्पष्ट झाले आहे. खानगावथडीतून ‘नांदूर मध्यमेश्वर’ बंधाऱ्याच्या रस्त्याने नांदूर मध्यमेश्वर गावात जाता येते. धरणाच्या बॅकवॉटर परिसरात संगमेश्वर, तर धरणाच्या खाली गोदावरी नदी तीरावर गंगामध्यमेश्वर शिव मंदिर आहे. नांदूर मध्यमेश्वर या गावातून या मंदिरात जायचे झाल्यास नदीपात्रातून जावे लागते. पावसाळ्याच्या दिवसांत या नदीपात्रात ३ ते ४ फूट वाहते पाणी असते. मात्र पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी या नदीपात्रातून सहज पायी जाता येते. याशिवाय खानगावात येऊन बंधाऱ्यावर न जाता त्याखालील उजवीकडील नदीपात्रातील रस्त्याने श्री गंगामध्यमेश्वर मंदिराकडे जाता येते.
या मंदिराभोवती १५ फूट उंचीची भक्कम दगडी तटबंदी आहे. नदीच्या प्रवाहापासून मंदिराचे संरक्षण व्हावे, या हेतूने ती बांधली असावी. मंदिराच्या तटबंदीचे प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासते. आत प्रवेश केल्यावर २५ फूट उंचीची दीपमाळ पाहायला मिळते. या दीपमाळेवर मराठी शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख ‘नांदूर मध्यमेश्वर’ हे नाव कसे पडले असावे, याबाबतचे कोडे उलगडतो. या शिलालेखात ‘मौजे नांदूर’ असा उल्लेख आहे. म्हणजेच गावाचे नाव पूर्वी फक्त ‘नांदूर’ असेच होते. मध्यमेश्वर मंदिरामुळे या गावाला ‘नांदूर मध्यमेश्वर’ म्हटले जाऊ लागले. मात्र, हा शिलालेख आता अस्पष्ट झाला आहे. मध्यमेश्वर मंदिरासमोर पाषाणात कोरलेला नंदी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुबक नक्षीकाम आहे.
मंदिरात प्रवेश केल्यानंतर नक्षीदार कमान असलेले सभामंडप लागते. सभामंडपाच्या पुढे अर्धमंडप असून त्यापुढे गर्भगृह आहे. गर्भगृहात पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहात पाषाणातील शिवलिंग असून ते पितळेच्या धातूने मढवण्यात आले आहे. या गोलाकृती शिवलिंगावर चारही बाजूने मुखवटा कोरलेला आहे. सभामंडपात चक्रधर स्वामींचे आसनस्थान आहे. असे सांगितले जाते की, या मंदिरात काही काळ चक्रधर स्वामी वास्तव्यास होते. मंदिराभोवती प्रशस्त पटांगण असून तेथे एक तुळशी वृंदावन व छोटे मंदिर आहे. मंदिराच्या आतील भागाप्रमाणेच मंदिराबाहेरील बाजूवरही फुलांची नक्षी कोरलेली पाहायला मिळते. गोदावरी नदीच्या दोन्ही तटांवर अनेक प्राचीन मंदिरे आहेत. मात्र, हे मंदिर गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध असल्याने त्याचे वेगळेपण उठून दिसते.
मंदिर परिसरातून गोदावरी नदीचे विशाल पात्र दिसते. गंगामध्यमेश्वर मंदिराच्या आजूबाजूला लहान-लहान मंदिरे आहेत. असे सांगितले जाते की, सुवर्णमृगाचे रूप घेतलेल्या मारीच राक्षसाचा पाठलाग करताना श्रीराम हे मध्यमेश्वर शिव मंदिरात आले होते. प्रत्येक श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला मंदिरात उत्सव होतो. यावेळी भाविकांची येथे गर्दी होते. सकाळी ५ ते सायंकाळी ६ या वेळेत मंदिरात जाऊन मध्यमेश्वर म्हणजेच महादेवाचे दर्शन घेता येते.