शेगावच्या श्री गजानन महाराजांनी योगसामर्थ्याने सजल केलेल्या विहिरीचे दर्शन तेल्हारा तालुक्यातील अकोली जहागीर येथे घडते. गजानन महाराजांनी भास्कर पाटील जायले यांच्या शेतातील कोरड्या विहिरीतील झरे पुन्हा जिवंत केले. या लीलेनंतर भास्कर पाटील जायले हे गजानन महाराजांचे पट्टशिष्य बनले व त्यांनी महाराजांची आमरण सेवा केली. संतकवी दासगणू महाराज विरचित ‘गजानन विजय ‘ग्रंथात या विहिरीचा उल्लेख आहे. ‘शांतीवन अमृततीर्थ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या विहिरीचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून शेकडो भाविक येथे येतात.
एका सरदाराच्या घरात इ.स. १८०० मध्ये गीता जयंतीच्या दिवशी भास्कर पाटील जायले त्यांचा जन्म झाला. कर्ताजी पाटील जायले हे त्यांच्या वडिलांचे नाव, तर पार्वतीबाई हे आईचे नाव. कर्ताजी पाटील हे नागपूरच्या रघुजीराजे भोसले (द्वितिय) यांचे सरदार होते. त्यांना रघुजीराजे यांनी अकोट-अंजनगाव मार्गावर असलेल्या अकोली या गावाची जहागिरी दिली होती. पाटील जायले कुटुंबीय वंशपरंपरेने नित्यनेमाने देहू-आळंदी-पंढरपूरची वारी करत. भास्कर महाराजांच्या जन्मानंतर तीन वर्षांनी, १८०३मध्ये दुसरे इंग्रज-मराठे युद्ध झाले.
त्यात २९ नोव्हेंबर रोजी ब्रिटिश सेनापती लॉर्ड वेलस्ली आणि व्यंकोजी ऊर्फ मन्याबापू भोसले-दौलतराव शिंदे यांच्या फौजेची मोठी लढाई अडगाव येथे झाली. त्या रणकंदनात मराठ्यांचा पराभव झाला. अनेक मराठा वीर मारले गेले. त्यात कर्ताजी पाटील यांनाही वीरगती प्राप्त झाली.
या नंतर कर्ताजी पाटील यांच्या पश्चात पार्वतीबाईंनी लहानग्या भास्करला वाढवले. त्यांना शस्त्रास्त्रे चालवण्याचे शिक्षण दिले. पुढे गजानन महाराजांनी विहिर सजल करण्याची लीला दाखविल्यानंतर ते महाराजांचे शिष्य बनले. याची सविस्तर हकीकत अशी की एकदा ऐन वैशाखाच्या प्रखर उन्हाळ्यात शेगावकरांची नजर चुकवून गजानन महाराज अडगावी जाण्यास निघाले. वाटेत तहानेने त्यांस कंठशोष पडला. आजुबाजूस कोठेही पाणी दिसेना. तेव्हा अकोलीच्या शिवारात असलेल्या शेतात (सर्वे क्रमांक ५२) एक वृद्ध शेतकरी त्यांना दिसले. ते भास्कर पाटील होते. त्यांच्याकडे गजानन महाराजांनी पाणी मागितले. भास्कर पाटील यांनी शेतावर एका घागरीतून पाणी आणले होते. परंतु दिगंबरावस्थेतील महाराजांना पाहून भास्कर पाटील यांनी त्यांना पाणी देण्याचे नाकारले व हुसकावून दिले. त्या शेतातून जात असताना गजानन महाराजांना एक विहिर दिसली. ते तिकडे चालले असताना भास्कर पाटील त्यांना म्हणाले की ‘वृथा तिकडे कशास जातोस? ती विहिर कोरडी ठणठणीत आहे.’ मात्र गजानन महाराज त्या बारा वर्षांपासून कोरड्या पडलेल्या विहिरीपाशी आले. तेथे त्यांनी देवाची प्रार्थना केली आणि त्याबरोबर त्या विहिरीतून पाण्याचा झरा फुटला. काही क्षणांत ती विहिर पाण्याने भरून गेली. हे पाहून भास्कर पाटील यांना गजाजन महाराज हे थोर योगी असल्याची खात्री पटली. त्यांनी महाराजांना साष्टांग दंडवत घातला आणि त्यांचे शिष्यत्व पत्करून ते शेगावला गेले. गजानन महाराज सन १८७८ मध्ये शेगावी प्रकट झाले. त्याच वर्षी ही विहिर सजल करण्याची घटना घडली, असे सांगण्यात येते.
यानंतर तब्बल २९ वर्षे शेगावी वास्तव्य करत भास्कर महाराजांनी गजानन महाराजांची सेवा केली. त्या दरम्यान गजानन महाराजांनी त्यांची अनेकदा परीक्षा घेतली. त्या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले भास्कर महाराज हे गजानन महाराजांचे पट्टशिष्य बनले. वयाच्या १०७व्या वर्षी, २५ जुलै १९०७ रोजी, चैत्र कृष्ण पंचमीच्या दिवशी भास्कर महाराजांनी समाधी घेतली.
त्यासमयी स्वतः गजानन महाराज उपस्थित होते व त्यांनी त्यांच्या हस्ते भास्कर महाराजांना समाधी दिली. अडगाव येथे भास्कर महाराजांचे समाधी मंदिर आहे. अकोलीतील ‘सर्वे क्र. ५२’ या शेतात गजानन महाराजांनी सजल केलेली विहिर आहे. गजानन महाराज (विहीर) संस्थान म्हणून येथील मंदिर ओळखले जाते.
अकोली जहागीर या गावात आजूबाजूला असलेल्या शेतांच्या मध्यभागी ही विहीर व मंदिर आहे. विहिरीभोवती तारेचे कुंपण व विहिरीच्या भिंतीवर १० नक्षीदार स्तंभ आहेत. हे स्तंभ वरील बाजूने महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. या स्तंभांवर गोलाकार छप्पर आहे. आजही या विहीरीला भरपूर पाणी असते व त्यात कासव व मासेही आहेत. या विहिरीवर गजानन महाराजांनी नृसिंह जयंतीच्या दिवशी, शके १८१० (वैशाख शुद्ध चतुर्दशी), गुरुवारी, २४ मे १८७८ रोजी ही विहीर सजल केल्याचे नमूद असलेला फलक आहे. या विहिरीपासून सुमारे १०० मिटर अंतरावर श्री गजानन महाराज व भास्कर महाराज या गुरू शिष्यांचे मोठे मंदिर आहे.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस मोठ्या आकारातील मयूर नक्षी कोरलेली आहे. प्रांगणातून तीन पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात प्रवेशद्वाराजवळ उजवीकडे व डावीकडे दोन संगमरवरी देवळ्या आहेत. त्यांमध्ये गरूड व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. या सभामंडपाच्या भिंतींमध्ये असलेल्या मोठमोठ्या खिडक्यांना सुरक्षेसाठी जाळ्या लावलेल्या आहेत. संगमरवरी फरसबंदी असलेल्या या सभामंडपात अनेक गोलाकार स्तंभ आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांवरील देवकोष्टकांत द्वारपाल मूर्ती आहेत. गर्भगृहात उंच वज्रपिठावर गजानन महाराज व त्यांचे शिष्य भास्कर महाराज यांच्या शुभ्र संगमरवरी मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींच्या डोक्यावर फेटे आहेत. या मूर्तींच्या मागे काळ्या पाषाणातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. मागील भिंतीवर छताकडील बाजूस गजानन महाराजांची मोठी प्रतिमा आहे. मंदिराच्या छतावर कठडा आहे व गर्भगृहावर निमुळते होत जाणारे शिखर आहे. या शिखराच्या वरच्या बाजूल कमळाच्या प्रतिमेत आमलक व कळस आहेत.
या मंदिरात वैशाख पोर्णिमेला येथे जलसंजीवन सोहळा होतो. येथे गजानन महाराज प्रकटदिन, ऋषीपंचमी, रामनवमी, कोजागिरी पोर्णिमेसह अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. या मंदिरापासून चार किमी अंतरावर गजानन महाराज संस्थानतर्फे चालविले जाणारे आणखी एक गजानन महाराज मंदिर आहे.