गजानन महाराज मंदिर

देवाची आळंदी, पुणे


शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानातर्फे आळंदी येथे गजानन महाराजांचे भव्य व आकर्षक मंदिर उभारण्यात आले आहे. माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीत येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी आणि भागवत धर्माचा प्रसार व्हावा, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या मंदिरात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे मंदिर गजबजलेल्या परिसरात आणि मुख्य मार्गावर आहे; परंतु तरीही येथील वातावरण मनःशांतीसाठी उत्तम आहे.गजानन महाराज संस्थानातर्फे १९९८ साली आळंदीमध्ये हे मंदिर बांधण्यात आले. मंदिर परिसरात प्रवेश करताच येथील बांधकामातली नक्षीदार कलाकुसर नजरेत भरते. धोलपुरी दगडांचा वापर करून या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. आधुनिक वास्तुशास्त्राचा वापर करून बनविण्यात आलेले हे मंदिर पाहण्यासाठी हजारो भाविक दररोज येथे भेट देतात.

गजानन महाराजांचे मुख्य मंदिर काहीसे उंचीवर आहे. साधारणतः ५० पायऱ्या चढून सभामंडपात जाता येते. तेथे जाण्यासाठी व येण्यासाठी दोन पायरी मार्ग आहेत. पायरी मार्ग व परिसर यादरम्यान असलेले सुंदर उद्यान मंदिराची शोभा वाढविते. खाली सभामंडप आणि वरच्या बाजूला गजानन महाराजांची मूर्ती, असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपात महाराजांची प्रतिमा व पादुका आहेत. येथेच अनेक भाविक नामस्मरण, पारायण करतात. सभामंडपात सर्वत्र शुभ्र संगमरवराचा वापर करण्यात आला आहे. येथील खांबांवरील संगमरवरी नक्षीकाम अप्रतिम आहे. राजस्थानमधील खास कारागीरांनी मंदिराची उभारणी आणि त्यावर कलाकुसर करण्याचे काम केले आहे.

मंदिर संस्थानातर्फे परिसरातील नागरिकांसाठी अनेक सेवा-सुविधा पुरविल्या जातात. ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जातात. त्याशिवाय अपंग पुनर्वसन केंद्र, नेत्र शस्त्रक्रिया शिबिर, ग्रामीण भागासाठी फिरते रुग्णालय अशा सेवाही पुरविल्या जातात. संस्थानातर्फे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांचा आतापर्यंत पावणेदोन कोटी रुग्णांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली. त्याशिवाय संस्थेतर्फे पंढरपूर, आळंदी व त्र्यंबकेश्वर येथे मोफत औषधोपचार केंद्रे सुरू आहेत आणि वारकरी शिक्षण संस्थाही चालविली जाते. लहान मुलांकरिता व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, प्रवचन, कीर्तन, दिंडी यात्रा व व्याख्यानाद्वारे आध्यात्मिक प्रबोधन, संत साहित्याचा प्रचार, योगासन शिबिर असे कार्यक्रमही राबविले जातात.

येथे सुसज्ज भक्त निवास व प्रसादालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये अल्प दरात निवासाची व्यवस्था होते. त्याशिवाय दुपारी व सायंकाळी भाविकांसाठी प्रसादाची सुविधा उपलब्ध आहे. दरवर्षी १३ फेब्रुवारीला येथे गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा केला जातो. यावेळी भजन, कीर्तन, प्रवचने होतात. कार्तिक वद्य त्रयोदशीला होणाऱ्या श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा उत्सवाच्या वेळी सुमारे एक लाख भाविकांना मंदिर संस्थानातर्फे महाप्रसाद दिला जातो. कार्तिकी यात्रेदरम्यान येथील दवाखान्यात विनामूल्य आरोग्य तपासणी आणि उपचार केले जातात.

पहाटे ५ वाजता भाविकांसाठी मंदिराची दारे उघडली जातात. त्यानंतर पहाटे ५ ते ५.३० या वेळेत मंगल वादन केले जाते. ५.३० ते ६ या वेळेत काकडा, ६ ते ७ या वेळेत पूजा व अभिषेक झाल्यानंतर सकाळी ७.१५ वाजता श्रींची आरती होते. त्यानंतर ११ ते ११.३० यादरम्यान आरती होते. सूर्यास्ताच्या वेळी सायंकालीन आरती होते. एकादशीला, सोमवारी व गुरुवारी भाविक रात्री १० वाजेपर्यंत मंदिरात दर्शन घेऊ शकतात; तर इतर दिवशी ती वेळ रात्री ९.३० वाजेपर्यंत आहे.

उपयुक्त माहिती:

  • पुणे रेल्वेस्थानकापासून २० किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक भागांतून एसटी व पुण्यातून पीएमपीएमएलची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येण्यासाठी व्यवस्था
  • भक्त निवास व प्रसादालयाची सुविधा
Back To Home