पौराणिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंडगाव येथील गजानन महाराज पादुका संस्थानात शेगावच्या गजानन महाराजांच्या दोन मूळ पादुकांचे दर्शन घडते. त्यापैकी एक प्रासादिक पादुका त्यांनी १९०६ मध्ये आपले निस्सिम भक्त पुंडलिक भोकरे यांना झामसिंह (झ्यामसिंग) या भक्ताकरवी दिल्या, तर दुसऱ्या पादुका त्यांनी झामसिंग यांना १९०८ मध्ये दिल्या. झामसिंग यांच्या आग्रहावरून १९०८ मध्ये मुंडगाव येथे आलेल्या गजानन महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. त्या रथाचा अवशेषही या मंदिरात पाहावयास मिळतो.
‘श्री गजानन विजय ग्रंथा’तील आख्यायिकेनुसार, गजानन महाराजांचे निस्सिम भक्त असलेले पुंडलिक भोकरे नित्यनेमाने शेगावला जात. १९०६ मध्ये गावातील भागाबाई नावाच्या महिलेने त्यांना ‘तू गजानन महाराजांच्या मार्गी लागू नकोस. त्याऐवजी तू माझ्यासोबत अंजनगाव येथे ये. आपण केजाजीचा शिष्य काशीनाथ यांना गुरू करू,’ असे सांगितले. त्यामुळे पुंडलिक यांच्या मनात विचारांचे काहूर उठले. त्या रात्री गजानन महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला. ‘दंभाचाराच्या नादी लागू नकोस’ असे सांगत गजानन महाराजांनी त्यांना ‘गण गण गणात बोते’ हा मंत्र दिला. त्यांनी ‘आणखी काही आस आहे का’, अशी विचारणा केल्यावर पुंडलिक यांनी नित्यपूजेसाठी पादुका देण्याची विनंती केली. त्यावर ‘उद्यापासून पादुकांची पूजा कर’, असे महाराजांनी सांगितले.
त्याच सुमारास मुंडगावचेच रहिवासी असलेले झामसिंग डोंगरसिंह शेखावत (राजपूत) हे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी गेले होते. दादाजी म्हणून ओळखले जाणारे झामसिंह परिसरातील वयस्कर व श्रीमंत शेतकरी होते. ते गावी परत जाण्यासाठी निघाले असता, महाराजांनी त्यांच्याकडे आपल्या प्रासादिक पादुका सुपूर्द करत त्या पुंडलिक यांना देण्यास सांगितले. मुंडगावच्या वेशीपाशीच झामसिंग यांची पुंडलिक यांच्याशी भेट झाली. त्यावेळी ‘गजानन महाराजांनी माझ्यासाठी काही प्रसाद पाठवला आहे का,’ अशी विचारणा पुंडलिक यांनी केली. त्यामुळे चकित झालेल्या झामसिंग यांनी ‘तुला कसे समजले’, अशी पृच्छा केली असता पुंडलिक यांना गजानन महाराजांनी दिलेल्या दृष्टांताबाबत सांगितले. याच पादुका आजही मुंडगाव येथे आहेत.
या घटनेनंतर, १६ जानेवारी १९०८ रोजी झामसिंग यांनी गजानन महाराजांना मुंडगाव येथे येण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार गजानन महाराज मुंडगावी आले. याबाबत आख्यायिका अशी की १७ जानेवारीला चतुर्दशीची रिक्त तिथी असल्याने या दिवशी भंडारा ठेवू नये, असे महाराजांनी ग्रामस्थांना बजावले. त्यानंतरही ग्रामस्थांनी भंडारा आयोजित केला. तसेच महाराजांची रथातून मिरवणूक काढली. मात्र, त्याचवेळी अचानक वादळ येऊन भंडाऱ्यासाठी बनवलेल्या अन्नात माती मिसळली गेली. चुकीची जाणीव झालेल्या ग्रामस्थांनी महाराजांची माफी मागितल्यावर आकाश पुन्हा निरभ्र झाले. दुसऱ्या दिवशी, पौष पर्णिमेला महाराजांच्या सांगण्यावरून पुन्हा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. तेव्हापासून या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. मुंडगावच्या याच भेटीदरम्यान गजानन महाराजांनी झामसिंग यांना आपल्या लाकडी पादुका दिल्या.
यानंतर झामसिंग राजपूत यांनी पुंडलिक भोकरे यांच्यापुढे असा प्रस्ताव ठेवला की ‘गजानन महाराजांनी मलाही त्यांच्या पादुका दिल्या आहेत. तुझे घर कुडाचे आहे. गजानन महाराजांच्या दिव्य पादुका सुरक्षित राहाव्यात म्हणून आपण दोन्ही पादुकांची माझ्या वाड्यात प्रतिष्ठापना करू. त्यासाठी मी माझा वाडा तसेच शेतजमीन दान करेन.
पादुकांची पालखी उचलण्याचा मान तुझाच असेल.’ हा प्रस्ताव पुंडलिक यांनी मान्य केल्यावर झामसिंग यांच्या ५५०० चौरस फूट भागात पसरलेल्या वाड्यात दोन्ही पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. अलिकडेच या वास्तूचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. राज्य सरकारने या संस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा दिला आहे.
शेगावपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या मुंडगावला पौराणिक महत्त्वही आहे. महाभारतकाळात विदर्भनृपती भीष्मकाची कन्या रुक्मिणीचे श्रीकृष्णाने कौंडण्यपूर येथून तिच्या स्वयंवरातून हरण केले. त्यावेळी रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याने त्या दोघांचा पाठलाग केला. त्यावेळी येथे झालेल्या घनघोर युद्धात रुक्मीचा पराभव झाला. मात्र, रुक्मिणीच्या विनंतीनुसार श्रीकृष्णाने रुक्मीचा शिरच्छेद न करता त्याचे केशमुंडण केले. त्यामुळे या क्षेत्राला ‘मुंडगाव’ असे नाव पडल्याची आख्यायिका आहे. या प्रसंगाची स्मृती म्हणून गावात हेमाडपंती स्थापत्यशैलीत लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधण्यात आले असावे, असेही सांगण्यात येते. हे मंदिर पादुका संस्थानापासून काही अंतरावरच आहे. गजानन महाराजही या मंदिरात दर्शनासाठी येत असत, असे सांगण्यात येते. शके १८२५ मध्ये (इ.स. १९६०) गणेश वासुदेवराव ठोकळ यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. सध्या लक्ष्मीनारायण संस्थान हे पादुका संस्थानाच्या अधिनस्थ संस्थान आहे व त्याचे व्यवस्थापन पादुका संस्थानाकडूनच केले जाते.
या गावात पुंडलिक भोकरे आणि झामसिंह राजपूत यांच्याप्रमाणेच बायजाबाई नावाच्या संतही होऊन गेल्या. त्यांचाही उल्लेख ‘गजानन विजय ग्रंथा’त आढळतो. याखेरीज या गावातील काशीनाथपंत कुलकर्णी हे सुद्धा गजानन महाराजांचे निस्सिम भक्त होते. असे सांगितले जाते की त्यांचे भजन ऐकण्यासाठी गजानन महाराजांनी त्यांना शेगावला बोलावून घेतले होते. या गावास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तसेच संत गाडगेबाबा यांनीही भेट दिली होती. त्यामुळे या गावाला ‘संतनगरी मुंडगाव’ असेही संबोधण्यात येते.
गजानन महाराज झामसिंग यांच्या वाड्यात थांबले होते.
तेव्हा त्यांनी त्यांच्या सेवेत तल्लीन झालेल्या विष्णुपंत गोविंद पाठक यांना प्रसादाच्या रूपात आपली चिलिम दिली. साडेसहा इंच लांबी असलेल्या या चिलिमीवर अष्टधातूचे वेष्टण आहे. त्यावर बारीक रंगीत तारेचे नक्षीकाम आहे. मृत्युपूर्वी पाठक यांनी ती चिलिम विश्वासू सहकारी त्र्यंबकराव वडाळकर यांच्याकडे सोपवली. वडाळकर यांच्या अकोट येथील घरात आजही ती चिलिम जतन करून ठेवण्यात आलेली आहे. वडाळकर हे गजानन महाराजांचे सेवेकरी असल्याचा चांदीचा बिल्ला तसेच त्र्यंबकराव यांच्या मातोश्री यांनी गजानन महाराजांना चरणस्पर्श करून घेतलेल्या चांदीच्या पादुकाही या घरात काचेच्या पेटीत जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
पादुका संस्थानाच्या प्रांगणात एका पिंपळवृक्षाजवळ शिवलिंग तसेच नंदीची मूर्ती आहे. प्रांगणात मध्यभागी असलेल्या या दोनमजली मंदिराचे बांधकाम राजस्थानी धौलपुरी पाषाण तसेच संगमरवराचा वापर करून केलेले आहे. त्यामुळे मंदिराची रचना एखाद्या राजवाड्याप्रमाणे भासते. या मंदिराच्या तळमजल्यावर एका खोलीत गजानन महाराजांची गादी आहे. येथे महाराजांनी झामसिंह राजपूत यांना दिलेल्या पादुका तसेच महाराज विश्रांतीसाठी वापरत असलेला जुना पलंग आहे. त्यामागील बाजूला गजानन महाराजांची मूर्ती व डावीकडे बाळकृष्णाची छोटी मूर्ती आहे. येथे संत बायजाबाई तसेच पुंडलिक भोकरे यांच्याही प्रतिमा आहेत.
नजीकच गजानन महाराज, भास्कर महाराज (अडगाव बुद्रुक) तसेच झामसिंग शेखावत यांचे मूळ छायाचित्र आहे. झामसिंग राजपूत यांच्या आग्रहावरून १९०८ मध्ये मुंडगाव येथे आलेल्या गजानन महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. त्या रथाचा एक अवशेष तळमजल्यावर पाहायला मिळतो. त्यात गजानन महाराजांची प्रतिमा आहे.
दुसऱ्या मजल्यावरील मंदिरात जाण्यासाठी सुमारे २५ पायऱ्यांचे दोन मार्ग आहेत. मंदिराच्या दर्शनी भागातील सज्जामध्ये कलाकुसर केलेले स्तंभ आहेत. त्यापुढे सभामंडप व गर्भगृह आहे. प्रशस्त सभामंडपात मध्यभागी असलेल्या येथील गर्भगृहात उंच वज्रपिठावर गजानन महाराजांची शुभ्र संगमरवरी बैठी मूर्ती आहे. या मूर्तीच्या मागील सोनेरी नक्षीदार प्रभावळीवर मयूर व सूर्य नक्षी कोरलेल्या आहेत. महाराजांच्या मूर्तीसमोर काचेच्या पेटीत गजानन महाराजांनी पुंडलिक भोकरे यांना दिलेल्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत. या गर्भगृहाच्या दोन्ही बाजूने तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी सुमारे २० पायऱ्या असलेले दोन मार्ग आहेत. या पायऱ्या चढून तिसऱ्या मजल्यावर प्रवेश होतो. या मजल्यावरील गर्भगृहात श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. या मजल्यावरील पारायण सभागृहात गजानन महाराजांचा जुना पलंग तसेच गजानन महाराजांची प्रतिमा आहे. प्रांगणात मंदिरानजीकच ‘अमृततीर्थ’ म्हणून ओळखली जाणारी प्राचीन विहीर आहे. तिला लागून पूर्व दिशेला गजानन महाराजांची धुनी आहे. असे सांगितले जाते की १९०८ मध्ये गजानन महाराज झामसिंग यांच्या वाड्यात आले होते तेव्हा त्यांनी येथे ही धुनी पेटवली होती. मंदिरासमोर झामसिंग सदन आहे. दररोज शेकडो भाविक तसेच पर्यटक या मंदिराला भेट देतात. दर गुरुवारी येथे भाविकांना महाप्रसाद देण्यात येतो. एकादशीला फराळाचे वाटप करण्यात येते. येथे रामनवमी, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी, गजानन महाराज प्रगट दिन, समाधी सोहळा (ऋषीपंचमी) आदी उत्सव होतात. पौष पोर्णिमेला येथे यात्रा महोत्सव होतो. संस्थानाच्या विश्वस्त मंडळातर्फे परिसरात अनेक सामाजिक उपक्रमही राबवण्यात येतात. दररोज सकाळी ५ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.