दत्तात्रेयांचा तिसरा पूर्णावतार म्हणून अक्कलकोटचे स्वामी समर्थ प्रसिद्ध आहेत. स्वामी समर्थांचे समकालीन भक्त बाळाप्पा यांच्या शिवपुरी येथील वाड्यात समर्थांनी दीर्घकाळ वास्तव्य केले होते. त्यामुळे आपोआपच वाड्याचे रूपांतर मठात झाले. या मठाचे उत्तराधिकारी गजानन महाराज यांनी एका स्वतंत्र मठाची स्थापना करून अग्निहोत्राच्या प्रचार आणि प्रसाराचे महत्त्वाचे कार्य केले. श्री गजानन महाराज मठ किंवा विश्व फाऊंडेशन नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मठात हजारोंच्या संख्येने एकत्र जमून भाविक सामुदायिक अग्निहोत्र करतात. अग्निहोत्रामुळे मानवी जीवनातील ताणतणाव, दुःखे, व्याधी व वेदना दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
अक्कलकोटपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर १५० एकर जागेत हा मठ आहे. १९५३ साली येथील जमीन खरेदी करून गजानन महाराजांनी मठाची मुहूर्तमेढ रोवली. अशी मान्यता आहे की १७ मे १९१८ साली पिता शिवानंद योगी व माता सोनाबाई यांच्या पोटी देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने प्रत्यक्ष महादेवाने गजानन महाराजांच्या रूपात जन्म घेतला. शिवानंद यांचा जन्म राजघराण्यातला असला तरी ते महान योगी होते. त्यांचे पुत्र गजानन महाराजांना अवघ्या तेवीसाव्या वर्षी, २५ मे १९४१ रोजी स्व:स्वरूपाचा आत्मबोध झाला. २७ सप्टेंबर १९४४ साली दसऱ्याच्या दिवशी भगवान परशुराम यांनी त्यांना दृष्टांत दिला. भगवान परशुरामाच्या साक्षीने त्यांनी वेदांचे ज्ञान सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला. गजानन महाराजांना त्यांचे भक्त कलियुगातील विष्णू म्हणजेच कल्की अवतार मानतात. महाराजांनी शिवपुरी येथे केलेले सामयागाचे आयोजन अत्यंत दुर्मिळ समजले जाते. आज जगभरातील लाखो भाविक स्वामींचे अनुयायी आहेत. आश्रमात चालणाऱ्या अग्निहोत्र आरोग्य चिकित्सेचा लाभ दररोज हजारो भाविक घेत आहेत. ४ मे १९८४ साली परशुराम जयंतीच्या दिवशी त्यांनी आपल्या अवतार कार्याला पूर्णविराम देऊन इहलोकीची यात्रा संपवली व ते शिवतत्वात विलीन झाले. दीडशे एकर जागेवर गर्द वृक्षराजीत हा मठ विसावला आहे. शिवमंदिर ही येथील मुख्य वास्तू आहे.
शिवमंदिरास स्वतंत्र तटबंदी व तटबंदीत चार नक्षीदार स्तंभांवर तीन अर्धचंद्राकार कमानी असलेले प्रवेशद्वार आहे. मंदिरासमोर असलेल्या नंदीमंडपात नंदीची मूर्ती आहे. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या शिवमंदिराच्या सभामंडपाच्या द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. प्रवेशद्वाराच्या सज्जावर परशुरामाची मूर्ती, शिवपिंडी व कामधेनू शिल्प आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीतील देवकोष्टकांत मारुती व इतर देवतांच्या मूर्ती आहेत.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या आतील भिंती व जमीन शुभ्र संगमरवरी फरशी आच्छादित आहे. जमिनीवर मध्यभागी संगमरवरी शिवपिंडी आहे. मंदिरात मागील भिंतीलगत घारापुरी येथील त्रिमूर्तीची प्रतिकृती व भिंतीतील देवकोष्टकात श्रीरामाची मूर्ती आणि शिवपिंडी आहे. देवकोष्टकावरील सज्जावर शिवपार्वतीच्या मूर्ती आहेत. मंदिरात डाव्या बाजूच्या देवकोष्टकात नृसिंह भगवान व लक्ष्मी यांच्या मूर्ती व उजवीकडे त्रिमुखी दत्तात्रेयांची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे द्रविडी शैलीतील चौकोनी शिखर आहे. संपूर्ण शिखरावर विविध देवी देवतांची शिल्पे व स्तंभनक्षी आहेत. शिखराच्या वरील घुमटाकार भागावर स्तुपिका व कळस आहे. या मंदिराच्या शेजारी गजानन महाराजांचे पिता शिवानंद स्वामी यांचे समाधीमंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला दोन नक्षीदार चौकोनी स्तंभ व त्यांवर सज्जा आहे. सज्जावर शेषशाही विष्णू व विष्णूच्या पायाजवळ लक्ष्मी असे शिल्प आहेत. या शिल्पाच्या दोन्ही बाजूस दोन ऋषीशिल्पे आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या सभामंडपात गजाजन महाराज यांची प्रतिमा आहे. गर्भगृहात शिवानंद स्वामी यांच्या चैतन्य पादुका, शेजारी गजानन महाराजांचा संगमरवरी पूर्णाकृती पुतळा व सवत्स कामधेनू शिल्प आहे. या मंदिराच्या बाजूला महाराजांच्या मातोश्री सोनामाता यांचे समाधीमंदिर आहे.
येथून पुढे काही मीटर अंतरावर परशुराम मंदिर आहे. बाह्य बाजूने आठ स्तंभांवर सभामंडपाचे छत व मध्यभागी गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी आणि ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारास चांदीच्या नक्षीदार झडपा आहेत.
गर्भगृहात वज्रपिठावर भगवान परशुराम यांची संगमरवरी मूर्ती आहे. सभामंडपाच्या छतावर बाशिंगी कठडा व त्यातील देवकोष्टकांत देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर द्रविडी शैलीतील चौकोनी शिखर, त्यावर स्तूपिका व कळस आहे.
मंदिराच्या प्रांगणात असलेले अनेक चौथरे व मंडपांमध्ये विविध प्रकाराची शिल्पे आहेत. प्रांगणात जागोजागी असलेल्या अर्धभिंतींवर संस्कृत श्लोक, सुभाषिते व त्यांचे अर्थ लिहिलेले आहेत. प्रांगणात अग्निहोत्र प्रतिकृती शिल्प आहे. मठात अग्निहोत्र यज्ञमंडप आहे. येथे एकावेळी शेकडो भाविक अग्निहोत्र करतात. मठात भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवास व अन्नछत्र सभागृह आहे. मठात गोशाळा, सेंद्रिय शेती, प्रदूषणमुक्त शाश्वत निसर्ग इत्यादी उपक्रम राबविले जातात.
१७ मे हा स्वामींचा जन्मदिन व २५ डिसेंबर हा आत्मबोध दिवस शिवपुरी येथे उत्साहात साजरा केला जातो. स्वामींची पुण्यतिथी म्हणून आश्रमात परशुराम जयंती साजरी केली जाते. मठात वर्षभर नित्यनेमाने सकाळी व संध्याकाळी अग्निहोत्र केले जाते. अग्निहोत्र ही वेदांची मुळ उपासना असल्याचे सांगितले जाते. सूर्योदय आणि सूर्यास्ताला तांब्याच्या पात्रामध्ये गाईच्या गोवऱ्यांनी अग्नि प्रज्वलित करून मंत्रोच्चार करताना गायीच्या तुपाने भिजविलेल्या तांदळाची आहूती देणे म्हणजे अग्निहोत्र होय. वेदांमध्ये अग्निहोत्रासंदर्भातील वर्णन असे की अग्निहोत्राच्या नित्य आचरणाने अनुयायास मनःशांती, सुख, समृद्धी, आरोग्य व चैतन्य प्राप्त होते. मंदिराचे दैनिक कार्य सकाळी पाच वाजता व्यहीत यज्ञाने सुरू होते. याच वेळी पहाटेचे अग्निहोत्र केले जाते. दिवसभर होम-हवन, मंत्र, जप सुरू असतात. संध्याकाळी पुन्हा अग्निहोत्र व इतर विधी केल्या जातात. दररोज सकाळी पाच ते रात्री ९ पर्यंत भाविक या मंदिरात दर्शनासाठी येऊ शकतात.