आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी।। जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।। असे म्हणून संत नामदेवांनी पंढरपूरचे अनादित्व सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी पंढरपूर कधी अस्तित्वात आले असावे, याबाबतचे जास्त पुरावे बाराव्या व तेराव्या शतकातील आहेत. होयसळ राजांच्या सहाव्या शतकातील ताम्रपटात पंडरीगे किंवा पंढरपूर नावाचा उल्लेख सापडतो. त्यावरून सुमारे पाचव्या ते सहाव्या शतकात हे मंदिर अस्तित्वात होते, असे अनुमान काढले जाते. याच पंढरपुरात शेकडो धर्मशाळा, आखाडे व मठ आहेत. संत गजानन महाराज मठ त्यापैकीच एक आहे. साडेआठ एकरावर पसरलेला हा मठ प्रसिद्ध आहे.
शेगावनंतर पंढरपूर येथे गजानन महाराज मठाची पहिली शाखा स्थापन झाली. याबाबत अख्यायिका अशी की गजानन महाराज आपल्या अंतकाळी रावजी पाटलांसोबत शेगावहून आषाढी वारीला पंढरपुरात आले. त्यावेळी त्यांनी वैकुंठनगरी पंढरपुरात समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतू प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना शेगावी निजधाम करण्याचे आदेश दिल्याने महाराजांनी शेगावच्या भूमीत स्वतःला समाधिस्थ करून घेतले. समाधी सोहळ्यानंतर त्यांच्या भक्तांनी महाराजांच्या पंढरपूरवरील भक्तीचे स्मरण ठेऊन गजानन महाराजांची पालखी पंढरपुरास आणली. त्यानंतर येथे मठाची पहिली शाखा स्थापन करण्यात आली.
योग, कर्म व भक्ती या त्रिसूत्रीने परमेश्वराची प्राप्ती करता येते, या महाराजांच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार पंढरपुरातील मठातूनही केला जातो. भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी व उघड्याला वस्त्रे द्यावी ही महाराजांची शिकवण त्यांच्या प्रत्येक मठातून पाळली जाते. सामान्य माणसाला देहातील परमात्म्याचे दर्शन व्हावे म्हणून महाराजांनी अनेक चमत्कार केले. त्या चमत्कारीक प्रसंगांचे वर्णन ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथात आहे. हा मठ त्याच दैवी शक्तीने भारलेला असल्याने पंढरपुरात येणारे भाविक येथे आवर्जून दर्शनासाठी येतात.
मुख्य रस्त्यालगत असलेल्या या मंदिरास भक्कम तटबंदी व त्यात ५१ फूट रूंदीचे मोठे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराची उंची ७२ फूट आहे. राजस्थानच्या धोलपुरी दगडांत घडविलेल्या या प्रवेशद्वारावर विविध प्रकारच्या नक्षी कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वारावरील सज्जावर मेघडंबरी, त्यांवर शिखर व शिखरांवर कळस आहेत. प्रवेशद्वारात देवकोष्टके व महिरपी तोरणे आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात जागोजागी लहान लहान उद्याने विकसित केलेली आहेत. प्रवेशद्वाराजवळील वर्तुळाकार वाटिकेत चौथऱ्यावर हाती ध्वज धरलेल्या वारकऱ्याचा पुतळा आहे. येथून पुढे गजानन महाराजांचे शुभ्र संगमरवरी पाषाणांत बांधलेले देखणे मंदिर आहे. मंदिराभोवती सुंदर उद्यान व मंदिराकडे येणाऱ्या पायवाटेवर संगमरवरी कमान आहे.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या सभोवतीने नाजूक नक्षीकाम असलेली सुमारे तीन फूट उंचीची संगमरवरी तटबंदी आहे. मंदिर उंच चौथऱ्यावर आहे. चौथऱ्यास अर्धचंद्राकार पाच पायऱ्या आहेत. मुखमंडप चौथऱ्यापेक्षा उंच असल्यामुळे वर जाण्यासाठी अकरा पायऱ्या व पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला संगमरवरी सुरक्षा कठडे आहेत. मुखमंडपात नक्षीदार व गोलाकार चार स्तंभ आहेत.
पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला स्तंभ व त्यावर तोरण आहे. सभामंडपास डाव्या व उजव्या बाजूला अशीच रचना असलेले आणखी दोन मुखमंडप आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी संगमरवरी जाळीची वातायने आहेत. पुढे सभामंडपापेक्षा उंच असलेल्या गर्भगृहात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर गजानन महाराजांनी मूर्ती व या मूर्तीच्या मागे विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने सभामंडपातून प्रदक्षिणा मार्ग आहे.
मंदिराच्या तिन्ही मुखमंडपांच्या छतावर पिरॅमिड आकारातील उतरत्या पायऱ्यांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहे. सभामंडपाच्या छतावर चोहोबाजूंनी बाशिंगी कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर गोलाकार व वर निमुळते होत गेलेले उंच शिखर आहे. शिखरात चारही दिशांना एकावर एक अशी पाच देवकोष्टके आहेत. शिखरावर स्तंभनक्षी, शीर्षभागी स्तूपिका व स्तूपिकेवर कळस आहे. मंदिराच्या प्रांगणात दुमजली श्रीराम मंदिर व भक्तनिवासाच्या पाच इमारती आहेत. त्यात सुसज्ज अशा २५२ खोल्या आहेत. प्रांगणात असलेल्या इतर इमारतींमध्ये होमिओपथी रुग्णालय, वारकरी शिक्षण संस्था, संगीत विद्यालय व सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यासाठी सभागृहे आहेत.
आषाढी व कार्तिकी एकादशीला शेगावहून हत्ती-घोडे अशा लवाजम्यासह गजानन महाराजांची पालखी राजेशाही थाटात पंढरपूर येथे येते. हे दोन दिवस येथील मुख्य वार्षिक उत्सव म्हणून साजरे केले जातात. यावेळी सुमारे तीन ते चार लाख भाविकांच्या महाप्रसादाची सोय या मठातर्फे केली जाते. वारीच्या वेळी फिरत्या रुग्णालयाची व्यवस्था केल्याने वीस ते पंचवीस हजार वारकऱ्यांना रुग्ण सेवेचा लाभ घेता येतो. मंदिरात गजानन महाराज प्रकट दीन व पुण्यतिथी सोहळा तसेच गुरू पौर्णिमा इत्यादी सण आणि उत्सव साजरे केले जातात. चातुर्मासात चार महिने प्रवचन, भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दरम्यान दररोज ५०० हून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. दररोज सकाळी ५ ते रात्री ९.३० पर्यंत भाविकांना या मंदिरात गजानन महाराजांचे दर्शन घेता येते.